सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Saturday, August 21, 2010

संघशाखेवर हल्ला करण्याचे प्रयोजन काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताने दि.१६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत शाखा विस्तार सप्ताहाचे आयोजन केले होते. साहजिकच कोकणातील संघ कार्यकर्त्यांनी या काळात काही नवीन शाखा सुरु केल्या. संघाच्या टीकाकारांच्या मते जरी शाखा पद्धतीत काही 'विशेष' नसले (?) तरी देवरुख शहरातल्या (रत्नागिरी जिल्हा) काही समाजकंटक मुस्लिमांना तसे वाटत नसावे. त्यामुळेच शुक्रवारी सायंकाळी शहरातील एका सायं (संध्याकाळी लागणाऱ्या) शाखेवर काही धर्मांध मुस्लीम युवकांनी हल्ला केला. त्यांनी शाखेत खेळणाऱ्या शालेयवयीन बालकांना अमानुष मारहाण केली. तर एका बालाला तेथील खुर्चीला बांधून ठेवले. हे कमी की काय म्हणून शाखेच्या ठिकाणी उभारण्यात आलेला भगवा ध्वज आणि शेजारीच असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची देखील या मंडळींनी विटंबना केली.

संघ शाखेत न जाणाऱ्यांना असा प्रश्न पडू शकतो की, त्या समाजकंटक मुस्लिमांनी (लहान मुलांच्या)बाल शाखेवर हल्ला करण्याचे कारण काय? पण गेले काही महिने देशात अशा प्रकारच्या अनेक चिंताजनक घटना घडत आहेत. केरळ मध्ये हिंदू आणि विशेषत: संघ कार्यकर्त्यांच्या खुलेआम होत असलेल्या हत्या सर्वश्रुत आहेत. महाराष्ट्रातही भिवंडी, मालेगाव सारख्या संवेदनशील ठिकाणी बऱ्याचदा देवरुख सारख्या घटना घडत असतात. या शिवाय देशभरातील हिंदू समाजावर ठिकठिकाणी अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत आहेत. काश्मीर मधल्या शीख समाजाला "मुस्लीम धर्म स्वीकारा अथवा काश्मीर मधून निर्वासित व्हाल", अशा धमक्या मिळू लागल्या आहेत. हे सर्व का घडत असावे?

सध्या देशभरच नव्हे तर जगभर हिंदू तत्वज्ञानाला मोठी मान्यता मिळत असल्याचे चित्र आपण पहातो. मृगजळाप्रमाणे असणाऱ्या भौतिक सुखाच्या पाठी छाती फुटेपर्यंत धावूनही हाताला काहीच लागत नाही, हे ज्यांच्या लक्षात येते, ते मग शाश्वत सुखाचा म्हणजेच सत्याचा आणि शांतीचा शोध सुरु करतात. यातील बहुतेक पांथस्थ अखेर हिंदू विचारांकडेच आकर्षित होतात. नेमकी हीच गोष्ट जगभरातील आसुरी वृत्तीच्या लोकांना जाचते आणि मग ही मंडळी हिंदुविरोधी कारस्थाने आणि कारवाया सुरु करतात. मुळात अशा प्रकारचे हल्ले केवळ संघ शाखेवर होत आहेत, हिंदू समाजाला त्यामुळे काय फरक पडतो? असा संकुचित अर्थ कोणीही काढू नये. कारण हा हल्ला हिंदूंच्या शक्तीकेंद्रावर झालेला हल्ला आहे. या शक्तीकेंद्रातून निर्माण होणारी ऊर्जाच आपल्याला भारी पडणार आहे हे ओळखून या मंडळींनी आपला डाव साधला आहे.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार नामक महापुरुषाने १९२० च्या दशकात हिंदू संघटनेचा विचार मांडला तेव्हा त्यांना वेड्यात काढणारे हजारो 'हिंदू' या हिंदुस्थानातच होते. पण डॉ. हेडगेवारांनी मात्र जिद्दीने आणि शांतपणे आपले कार्य सुरु ठेवत या कार्याचा वटवृक्ष केला. शाखा नावाच्या सोप्या परंतु अतिशय प्रभावी तंत्राचा वापर करून त्यांनी अवघ्या १५ वर्षात संपूर्ण देशभरात हिंदू संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. १९२५ साली नागपूर शहरात त्यांनी पहिली संघ शाखा लावली. आजच्या घडीला देशभरात ४० हजारहून अधिक शाखा लागतात. शाखेत चालणारे खेळ, बौद्धिक कार्यक्रम यांची हेटाळणी करणारे त्या काळातही कमी नव्हते. पण याच कार्यक्रमातून 'घडणारा' स्वयंसेवक हिंदू समाजावर आलेल्या संकटाचा प्रतिकार करू लागला तेव्हा या टीकाकारांना सुद्धा संघाच्या कार्याचे महत्व लक्षात आले.

शाखेची कार्यपद्धती ही अतिशय सकारात्मक, शांत परंतु प्रभावी अशी आहे. स्थानिक समाजावर संघ शाखेचा थेट प्रभाव आहे असे दृश्य आजही क्वचितच दिसेल. पण त्या शाखेतून तयार झालेला स्वयंसेवक तेथील हिंदू समाजाचा निर्विवाद संरक्षक म्हणून काम करताना दिसतो. नेमकी हीच गोष्ट हिंदू विरोधकांना आवडत नाही. त्यांना हिंदू समाज सुप्तावस्थेत असलेला अधिक आवडतो. कारण त्या समाजावर आघात करणे सोपे असते. मात्र संघ त्या निद्रिस्त हिंदू समाजाला जागे करत असल्यामुळेच विरोधकांचा संघावर राग असतो.

लोकप्रबोधनाचे कार्य ज्यांच्याकडे सोपवले आहे ती प्रसारमाध्यमेच देशद्रोह्यांना सामील झाली आहेत. त्यामुळेच की काय प्रसारमाध्यमांचा संघावर पारंपारिक रोष आहे. संघ करत असलेल्या देशोपयोगी कार्याकडे दुर्लक्ष करून, संघाला 'खिंडीत' गाठण्याची धडपड ही माध्यमे सदैव करत असतात. सध्या गाजत असलेली तथाकथित 'हिंदू दहशतवाद' ही संकल्पना त्यातूनच जन्माला आली आहे. अशा प्रकारचा धादांत अपप्रचार करून माध्यमे काय साधतात ते देव जाणे पण हा सकल हिंदू समाजाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न आहे.

पण एवढे करूनही हिंदू समाजाची ताकद वाढते आहे, तो अधिकाधिक एकजूट होतो आहे. त्याचा प्रभाव सुद्धा वाढत आहे. त्यामुळे उद्वीग्न झालेल्यांनीच देवरूखच्या संघ शाखेवर भ्याड हल्ला केला आहे. ही सुरुवात आहे. जर या घटनेवर हिंदू समाजाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तर या मंडळींची भीड चेपून ते पुन्हा पुन्हा असे हल्ले करतील. तेव्हा हिंदू समाजाने 'विवेकी' मार्गाने या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करावी. जेणेकरून या समाजकंटकांना चांगली जरब बसेल.