सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Wednesday, June 29, 2016

कहाणी दुर्दम्य जिद्दीची..


मराठवाडा आणि दुष्काळ हे जणू समानार्थी शब्द झाले आहेत. महाराष्ट्रातील तब्बल ९ जिल्हे समाविष्ट असलेला हा विभाग हळूहळू वाळवंटात परिवर्तीत होत असल्याची भीती डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासारखे जलतज्ञ देखील व्यक्त करीत आहेत. मध्ययुगीन काळात आंतराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र असलेल्या या विभागाचे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात आजही मोठे योगदान आहे. मात्र गेली ३ वर्षे अवर्षण परिस्थिती असल्यामुळे त्याचा शेती, उद्योग आणि आनुषंगिक
रोजगारांवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. खरे तर अशा परिस्थितीला शरण जाऊन जर या प्रदेशातील रहिवाशांनी स्थलांतर केले असते तर त्यांना दोष देता आला नसता. परंतु या दुष्काळावर मात करण्याच्या त्यांच्या दुर्दम्य संकल्पामुळे आज मराठवाड्यात चमत्कार घडण्यास सुरुवात झाली आहे. या चमत्काराचे अध्वर्यु म्हणून रा.स्व.संघाच्या जनकल्याण समिती सारख्या संस्था-विविध संघटनांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

मराठवाडा विभाग नैसर्गिकदृष्ट्या पर्जन्यछायेचा प्रदेश असला तरीही सध्याचा दुष्काळ मानवनिर्मित कारणांमुळेच पडल्याचे बोलले जाते. गेली तीन वर्षे पावसाने चकवा दिला आहे. गोदावरीसारख्या मोठ्या नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. जायकवाडी धरणात पाण्याचा एकही थेंब नाही. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतून वाहणारे मांजरासारखे तब्बल ४५० किमी लांबीचे नदीपात्र देखील पूर्ण सुकले आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे बोअरवेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला असल्यामुळे आता जमिनीत २०० फूट खोल खोदून सुद्धा पाणी सापडत नाही. अशावेळी नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचा शेवटचा पर्याय स्थानिकांनी अवलंबला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या इटकुर गावात असलेली वाशिरा नदी ही खऱ्या अर्थाने इतिहासजमा झाली होती. पावसाळ्यात वाहणारा नाला इतकीच तिची ओळख गेल्या काही वर्षात सांगितली जात असे. नदीपात्रात साचून राहिलेला गाळ आणि त्याखाली असलेल्या मुरूमाच्या खडकांमुळे पावसाचे पाणी नदीत साठून राहण्याऐवजी वेगाने वाहून जायचे. जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी इटकुरवासियांना या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव दिला आणि गावकऱ्यांनीही तो आनंदाने स्वीकारला. तज्ञांच्या मदतीने नदीपात्राचे सर्वेक्षण करून त्यातील २ किमीचे पात्र रुंदीकरण व खोलीकरण करण्यासाठी निवडण्यात आले. यातील निम्मे काम जनकल्याण समितीने करायचे तर उर्वरित काम इतर संस्थांच्या मदतीने करायचे ठरले. पुण्यातील आय.टी.कंपन्यांशी बोलणे करून जनकल्याण समितीने या कामाला प्रारंभ केला. नदीतील गाळ उपसल्यावर त्याचे काय करायचे हा प्रश्न होताच. मात्र गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी हा गाळ स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन त्याचा सदुपयोग केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या गाळामुळे त्यांची शेतीसुद्धा सुपीक होणार असून, चांगला पाऊस झाल्यास पुढील काही वर्षांची त्यांची चिंता मिटणार आहे.

नदीपात्राचे खोलीकरण करताना काही निकष निश्चित करण्यात आले. पात्रातील गाळ आणि मुरूम यांचाच उपसा केला जाईल. वाळू आणि दगड हे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी, त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि पत्रातील पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाळू आणि दगडांचा उपसा करायचा नाही. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना उर्वरित गाळाच्या भिंती करून आजूबाजूच्या शेतांना पूराच्या पाण्याचा उपसर्ग होऊन द्यायचा नाही. नदीचे सरळीकरण अजिबात करायचे नाही. कारण त्यामुळे पात्रातील पाणी वेगाने पुढे वाहून जाते. नदीचा नैसर्गिक भूगोल अजिबात बदलायचा नाही. हे निकष पाळूनच जनकल्याण समितीची दुष्काळी भागातील कामे सुरू असल्यामुळे दीर्घकालीन धोरण म्हणून त्याची निश्चितच उपयुक्तता आहे.

इटकुर गावातील तसेच इतरही प्रकल्पांना भेट दिल्यावर आणखी एक लक्षात आले की, जनकल्याण समिती केवळ पैसा पुरवून थांबत नाही. त्यांचे कार्यकर्ते गावातील तरुण व अनुभवी मंडळींना एकत्र करून त्यांची एक गावसमिती गठीत करतात. ज्या समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकल्पांचे संचालन होते. तसेच प्रत्येक गावाच्या क्षमतेनुसार त्यांच्याकडूनही या कामांसाठी येणाऱ्या खर्चात आर्थिक वाटा मागितला जातो. किंबहुना जनकल्याण समितीच्या सर्व प्रकल्पांचे हेच सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. प्रत्येक गावाचा आपापल्या प्रकल्पात श्रमदान आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून सहभाग असल्यामुळे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव होते. प्रकल्पाचा खर्च कमी होतो आणि त्याचे ठराविक वेळेत अंमलबजावणी होते.         

वाशिरा नदीतील गाळ काढण्यासाठी आवश्यक मशिनरी पुरवू शकणारे कंत्राटदार देखील सेवाभावी वृत्तीने काम करणारे असल्यामुळे शासकीय कामाच्या तुलनेत निम्म्या दरांत आणि दुप्पट वेळ काम करण्याची तयारी त्यांनी दाखविली. त्यांचे गाव इटकुरपासून त्यांचे गाव १५ किमींवर आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर त्यांनी ठरलेल्या रकमेत आणखी सूट दिली. त्याचे कारण विचारल्यावर या प्रकल्पामुळे आमच्या गावाच्या विहिरी देखील भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कळंब गावात सुरू असलेल्या मांजरा नदीच्या कामात देखील हाच अनुभव आला. या गावात अनेक संपन्न व्यापारी राहतात. रोटरी क्लबची एक शाखा देखील या गावात सक्रीय आहे. जनकल्याण समितीने प्रथम एक किमी नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करायचे ठरविले. मात्र रोटरी क्लब आणि गावातील इतर व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन आणखी निधी जमवला व तब्बल साडेतीन किमी लांबीच्या पात्राचे अवघ्या महिन्याभरात खोलीकरण करून दाखवले. हे काम होण्यापूर्वी मांजरा नदीचे येथील पात्र जेमतेम १० फूट रुंद होते. ते आता १५ मीटर रुंद झाले असून, ५ मीटर खोल झाले आहे. तब्बल ५ हजार हेक्टर शेती या कामामुळे ओलिताखाली येणार असून एका मोठ्या पावसात पुढील तीन वर्षांसाठीचा पाणीसाठा या ठिकाणी साठवला जाणार आहे.

या कामाचा गावकऱ्यांवर असलेला प्रभाव त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होता. नदीचे, जलस्त्रोतांचे आणि पाण्याचे महत्व त्यांच्या पुरते लक्षात आले आहे. त्यामुळेच आता गावाचे अवजल थेट नदीत सोडण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. तसेच नदीच्या दोन्ही बाजूंना असलेला गाळ भविष्यात पुन्हा नदीत येऊ नये म्हणून दोन्ही किनाऱ्यांवर बांबू, गवत आणि माती धरून ठेवणारी झाडे लावण्याचे देखील त्यांचे नियोजन आहे. थोडक्यात वर्ष-दोन वर्षात या नदीकिनारी एखादी चौपाटी उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको.
लातूर जिल्ह्यात देखील मांजरा नदीवर लोकसहभागातून असेच विक्रमी काम उभे राहिले आहे. लातूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा नदीच्या साडेचौदा किमी पात्राचे काम करण्याचे ठरले. शासनाने देखील हे काम करायची तयारी दर्शवून त्याचा अंदाजित खर्च काढला. हा खर्च तब्बल ८५ कोटी रूपये इतका अपेक्षित होता. जनकल्याण समिती आणि इतर १६ सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हे काम करण्याचे ठरविले. अवघ्या साडेसहा कोटी रूपयांत आणि तीन महिन्यांच्या कालावधीत हे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या कामामुळे केवळ लातूर शहराचीच तहान भागणार नसून, आजूबाजूच्या किमान २५ चौ.किमी. परिसरातील हजारो हेक्टर शेती आणि उद्योगांनाही यामुळे संजीवनी मिळणार आहे.     

जनकल्याण समितीच्या या पुढाकाराव्यतिरिक्त देखील काही कामांचा उल्लेख आवश्यक वाटतो. सध्या बहुतेक संस्थांनी आपले लक्ष मराठवाड्यातील पाणी प्रश्नाच्या निर्मूलनावर केंद्रित केले आहे. यात चूक काहीच नाही. मात्र या सर्व भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील तीव्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपली जनावरे कत्तलीसाठी विकणे भाग पडत होते. याचे ग्रामीण अर्थकारणावर दूरगामी परिणाम होत असतात. एकतर भविष्यात पाणी प्रश्न सुटल्यानंतरही शेतकऱ्यांकडे त्यांची हक्काची जनावरे नसल्यामुळे शेती करणे अवघड होऊन बसते. शिवाय या जनावरांच्या आधारावर होत असलेले शेतीपूरक व्यवसाय करणे देखील कठीण होऊन बसते. त्यामुळे या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देणे भाग होते.

जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने थेट पुणे जिल्ह्यातील बारामती व अन्य ठिकाणी संपर्क साधून दर्जेदार चारा मिळवण्याची व्यवस्था केली. हा चारा त्या ठिकाणाहून वाहून आणणे, त्याचे समन्यायी वाटप करणे या जबाबदाऱ्या देखील कार्यकर्त्यांनी पेलल्या. चारा ज्या किमतीला उपलब्ध होईल त्याच्या केवळ २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेऊन उर्वरित रक्कम जनकल्याण समितीने भरायची, असा हा उपक्रम. शासन देखील जी कामे करू शकत नाही, त्या कामांचे उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्या जनकल्याण समितीशी आज शेकडो गावातील हजारो शेतकरी जोडले गेले आहेत. सुमारे २५ हजार जनावरांकरिता चारा पुरविण्याचे कार्य गेल्या तीन महिन्यांत झाले आहे.

नद्या आणि विहिरींचे पुनर्भरण झाले असले तरीही प्रत्येक गावात पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था सुद्धा आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जनकल्याण समितीने शेकडो गावात पाण्याच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या बसवल्या आहेत. अगदी शासन आणि आपलेही दुर्लक्ष होणाऱ्या भटके-विमुक्त समाजाच्या पालांवर देखील या टाक्या बसविण्यात आल्यामुळे महिन्यातून एकदा टँकरने मिळणारे पाणी साठवून ठेवण्याची मोठी सोय त्यांना उपलब्ध झाली आहे.
 
मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी विविध महाविद्यालये व विद्यापीठात शिकत असतात व याच ठिकाणी वस्तीस राहात असतात. गेल्या काही महिन्यात या विद्यार्थ्यांच्या गावातील स्थिती खालावल्यामुळे त्यांना त्यांच्या घरून मिळणारी रसद देखील खंडित झाली. खानावळीचे बिल आणि हॉस्टेलचे भाडे देणेसुद्धा शेकडो विद्यार्थ्यांना अशक्य वाटू लागले. आता शिक्षण सोडायचे या निर्णयाप्रत येत असतानाच अशा विद्यार्थ्यांनाही जनकल्याण समितीने मदतीचा हात दिला. त्यांच्या निवासाचा, भोजनाचा आणि अभ्यासासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च त्यांना तातडीने मिळण्याची व्यवस्था जनकल्याण समितीने केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू आहे. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले जनकल्याण समितीचे कार्यकर्ते आपल्या या कामांचा उल्लेखही करणे टाळतील. मात्र समाजाला स्वावलंबी करण्यासाठी जनकल्याण समिती करीत असलेल्या कामातून आज मराठवाड्यातील शेकडो गावे आणि अनेक संस्थांनी प्रेरणा घेतली असून, सेवाकार्याची ही मशाल लाखो हातांतून पुढेपुढेच जाणार आहे. महाराष्ट्रात वरुणराजाचे आगमन झाले असून, भविष्यात या सर्व कामांची उपयुक्तता देखील सर्वांना जाणवेल, यात शंकाच नाही. तूर्तास या भगीरथ प्रयत्नांबद्दल जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन.    


-          प्रणव भोंदे