सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Sunday, February 21, 2016

सुशीलकुमारवर अन्याय होत नाही ना?


 
सुशीलकुमार 
रोहित वेमुला या हैद्राबाद विद्यापीठात समाजशास्र विषयात डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्याने दि. १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली. संपूर्ण देशभर या घटनेने मोठे वादळ निर्माण केले. आपल्या देशांत राजकारण कशाचेही होऊ शकते, पण या घटनेमुळे देशातील सामाजिक सौहार्दावरच आघात झाल्याची अनेकांची भावना झाली आहे. रोहित ज्या आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे काम करायचा, त्या संघटनेने तर या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग देऊन हे प्रकरण धगधगते राहील, याची पुरेपूर व्यवस्था केली.

आजगायत या घटनेचे विविध कंगोरे आणि त्यामुळे उमटणारे सामाजिक पडसाद आपण अनुभवले आहेत. पण ज्यामुळे रोहितला विद्यापीठाने निलंबित केले, ते कारण नेमके काय होते? या सगळ्या प्रकरणी सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांवर आणि नंतर केंद्र सरकारच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांवर ठपका ठेवला गेला. परिणामी या घटनेची संवेदनशीलता देखील वाढली. अभाविपचा हैद्राबाद विद्यापीठ अध्यक्ष आणि त्याच विद्यापीठात डॉक्टरेट करणारा सुशीलकुमार हा विद्यार्थी आणि आंबेडकर विद्यार्थी संघटनेत असे काय घडले होते? रोहितला आपले जीवन का संपवावे लागले असेल? सुशीलकुमारवर अन्याय तर होत नाही ना? वाचा सुशीलकुमारच्याच शब्दांत....

याकुब मेमनच्या फाशीवरून अभाविप आणि आंबेडकर विद्यार्थी संघटनेत वाद झाला हे खरे आहे काय? नेमके काय घडले?    
याकुब मेमनला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आंबेडकर विद्यार्थी संघटनेने हैद्राबाद विद्यापीठात नमाज जनान्याचे आयोजन केले होते. साधारण ०१-०२ ऑगस्टच्या सुमारास या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. त्याबद्दल निषेध नोंदविणे सुद्धा मान्य होऊ शकेल. पण याकुब कोणताही क्रांतिकारक नव्हता. त्याच्या समर्थनार्थ आंबेडकर विद्यार्थी संघटनेने केलेल्या निदर्शनात दिलेल्या घोषणा जास्त चिंताजनक होत्या. “किती याकुबना ठार माराल? त्याच्यासारखे कित्येक याकुब घरोघरी जन्माला येतील.” अशा प्रकारच्या घोषणा, पोस्टर्स आणि सोशल मीडिया पोस्ट या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी उचलून धरल्या होत्या. ज्याच्याविरोधात अभाविपने ०४ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचे ठरविले.

आम्ही देखील आमच्या फेसबुक स्टेटसवर आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा निषेध करणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. त्यात या संघटनेचा उल्लेख ‘गुंड टोळी’ असा करण्यात आला होता. जो वरील पार्श्वभूमीवर केला होता. ०३ ऑगस्टच्या मध्यरात्री आमच्या विद्यार्थी वसतीगृहात आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे सुमारे ४० कार्यकर्ते जमले. माझ्या खोलीच्या बाहेर येऊन त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्या सगळ्यांनी मला खेचत वसतीगृहाच्या बाहेर नेले आणि मारायला सुरुवात केली. या मंडळींनी माझ्यासमोर तीन मागण्या ठेवल्या. फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर आम्ही ज्या पोस्ट टाकल्या त्या डिलीट करायच्या, विद्यापीठ प्रांगणात लावलेले आंदोलनाची माहिती देणारे पोस्टर्स काढून टाकायचे आणि आमची माफी मागायची. अर्थातच पहिल्या दोन मागण्यांना साफ नकार देऊन तिसऱ्या मागणीबद्दल मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावे लागेल, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला इतक्या मध्यरात्री माझ्या सहकाऱ्यांशी बोलायला सांगितले. ती संधी साधून मी पोलिसांना फोन करून झाल्या प्रकारची माहिती दिली. मात्र पोलीस या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी विद्यापीठाचे सुरक्षारक्षक त्यांच्या गाडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करून मला त्यांच्या गाडीत बसवले. जेमतेम तीन सुरक्षारक्षक समोर उभ्या असलेल्या ४०-५० विद्यार्थ्यांच्या आक्रमक घोळक्याला सांभाळू शकत नव्हते. या विद्यार्थ्यांनी मला गाडीतून खेचून बाहेर काढले. अखेर सुरक्षारक्षकांनी देखील मला या संघटनेच्या आग्रहानुसार त्यांची लेखी माफी मागण्यास सांगितले. नाईलाज झाल्यामुळे मी तसे पत्र त्यांना लिहून दिले.

हे झाल्यावर शांत होण्याऐवजी हा घोळका आणखी आक्रमक झाला. आता या माफीनाम्याच्या झेरॉक्स प्रती संपूर्ण विद्यापीठात लाव, असा हुकुम त्यांनी मला दिला. मी म्हटले की, यावेळी झेरॉक्स कोठे काढणार? मी हे काम उद्या करीन. मात्र त्यांनी मला सुरक्षारक्षक चौकीत नेऊन त्या ठिकाणी मला माझा माफीनामा माझ्याच फेसबुक स्टेटसवर टाकायला लागला. जुन्या पोस्ट देखील त्यांनी डिलीट केल्या. त्यानंतर पुन्हा असे करशील तर याद राख अशी धमकी देऊन आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी निघून गेले. मी देखील माझे स्वत:चे फेसबुक अकाऊंट डिलीट केले. कारण मला माझ्या अकाऊंटवरून या संघटनेचा अजेंडा राबवायचा नव्हता. मला मारपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांत रोहित वेमुलाचा समावेश होता.
 
रोहित आणि त्याचे सहकारी याकुबच्या फाशीविरोधात आंदोलन करताना 
मग पुढे नेमके कायकाय घडले?
या सगळ्या घटनेनंतर मी माझ्या भावाला फोन करून बोलावून घेतले. तो मला घेऊन विद्यापीठाच्या रुग्णालयात निघाला असताना २ विद्यार्थी धावत आले आणि त्यांनी आम्हाला बाहेरच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. मी माझे फेसबुक अकाऊंट डिलीट केल्यामुळे खवळलेल्या आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा माझा शोध सुरू केला होता. अखेर मी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. दुसऱ्या दिवशी अभाविपच्या विद्यापीठ सचिवाने मला मारहाण झाल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली. मात्र त्याच्याकडे काही पुरावे नसल्यामुळे दोन्ही संघटनांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले.

शिक्षकांची पक्षपाती भूमिका
त्यानंतर हे प्रकरण विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीकडे गेले. विशेष म्हणजे या समितीने काहीही  चौकशी सुरू करण्यापूर्वीच विद्यापीठातील काही शिक्षकांनी मला (सुशीलकुमार) मारहाण झाल्याची अफवा असल्याचे व वास्तवात तसे काहीही घडले नसल्याचे पत्र प्रशासनाला लिहिले. वैचारिक वाद असले तरी अशा विषयात शिक्षक तटस्थ असतात, या माझ्या धारणेलाच या ठिकाणी धक्का बसला.

मात्र मी रुग्णालयातून परत आल्यावर प्रशासनाकडे निवेदन दिले की, झाल्या घटनेची माहिती देणारे पुरावे आणि साक्षीदार माझ्याकडे आहेत. तरी तुम्ही याबाबत सखोल चौकशी करावी. दि. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या या चौकशीत माझ्याबाजुने काही विद्यार्थी साक्ष देण्यासाठी उपस्थित होते. अभाविप कोणाच्याही जातीचे उल्लेख करणे टाळते. मात्र माझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी उभे असणारे देखील दलित जातींचेच होते, हे या ठिकाणी नमूद करणे आवश्यक ठरते. या चौकशीत समोर आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य मानून आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या ६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातूनच निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्यांना विद्यापीठ प्रांगणातून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले.

आता या निलंबित झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले. या प्रकरणातील प्राथमिक तक्रारीनंतर (अभाविप विद्यापीठ सचिवाने केलेल्या तक्रारीचा संदर्भ) दोन्ही संघटनांना इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर सुशीलकुमारच्या तक्रारीवरून खोट्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप आंबेडकर विद्यार्थी संघटनेने केला. अखेर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आर.पी.शर्मा यांनी या आरोपांची आणि मूळ घटनेची चौकशी करण्यासाठी सुधाकरन समिती गठीत केली. यावर अभाविपनी देखील मागणी केली की, समिती गठीत करून पुन्हा चौकशी करण्यास हरकत नाही. पण या चौकशीची कालमर्यादा निश्चित केली जावी. या समितीने काही तांत्रिक मुद्यांमुळे या प्रकरणाचा तपास आपण करू शकत नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे विद्यापीठ कायद्याला अनुसरून आम्ही विद्यापीठाच्या कार्यकारी समितीकडे दाद मागितली. कार्यकारी समितीच्या उपसमितीने देखील संपूर्ण प्रकरणाची छाननी करून या विद्यार्थ्यांवर पूर्वी केलेली कारवाई योग्य ठरवून तसा अहवाल कार्यकारी समितीला सुपूर्द केला.

कुलगुरूंनी दोषी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले !!
कुलगुरू डॉ. अप्पा राव यांनी कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, अशी भूमिका घेतली आणि या विद्यार्थ्यांना केवळ वसतीगृहातून निलंबित करण्याचा नवीन निर्णय जाहीर केला.

शैक्षणिक निलंबन मागे घेताना या विद्यार्थ्यांनी राजकीय चळवळीत भाग घेऊ नये, अशी अट घालण्यात आली. आंबेडकर विद्यार्थी संघटनेने याविरोधात देखील ‘सामाजिक बहिष्कार’ वगैरे नावाने निषेध नोंदविण्यास सुरुवात केली. पुढे वसतीगृहातून निलंबित झाल्यावर १५ दिवसांनी त्यांनी विद्यापीठाच्या शॉपिंग कॉप्म्लेक्समध्ये धरणे आंदोलनास सुरूवात झाली.

तुझ्या आईने या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे का ठोठावले? न्यायालयाकडे नेमकी कोणत्या विषयात दाद मागितली?
मला झालेल्या मारहाणीनंतर माझी आई कुलगुरूंना भेटण्याकरिता त्यांच्या कचेरीत गेली. त्या ठिकाणी तिला त्याच कचेरीत आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी धमकावण्यास सुरुवात केली. जर प्रत्यक्ष कुलगुरूंच्या कचेरीत मला एक पालक असूनही असा उपद्रव होत असेल, तर माझा मुलगा कसा सुरक्षित राहील, या विचाराने माझ्या आईने न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्याचा निर्णय घेतला.

माझ्या मुलाला विद्यापीठात सुरक्षा मिळावी, अशी माझ्या आईने याचिका केली होती. केवळ माझीच आई नव्हे तर माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थ्याला झोडपले होते. त्या अन्यायग्रस्त विद्यार्थ्याच्या आईने देखील या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली आहे.  

दरम्यान आंबेडकर विद्यार्थी संघटनेने देखील न्यायालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या निलंबनाची कारवाई करणाऱ्या विद्यापीठाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र यावर झालेल्या ‘नोटीस ऑफ मोशन’ मध्ये असा निर्णय घाईने देण्याचे न्यायालयाने अमान्य केले होते. दि. १८ जानेवारी रोजी न्यायालयात या विषयी पुढील सुनावणी होणार होती. मात्र दि. १७ जानेवारी रोजीच रोहितने आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी समजली. न्यायालयाने देखील यामुळे सुनावणी दि. १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली.   

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्तक्षेपाची नेमकी हकीगत काय?
आमची तक्रार दाखल झाल्यावर न्यायालयाने विद्यापीठाला नोटीस पाठवून या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने काय कारवाई केली, याचे उत्तर मागविले. दुसरीकडे आंबेडकर विद्यार्थी संघटनेने विद्यापीठात मोठे आंदोलन सुरू केले होते. त्यांना साथ देण्यासाठी असरुद्दिन ओवैसी यांच्या एम.आय.एम. पक्षाचे कार्यकर्ते देखील विद्यापीठात आंदोलन करू लागले. या सगळ्या राजकीय घडामोडी बघता आम्ही याची तक्रार केंद्र सरकारकडे करायचे ठरविले. कारण हैद्राबाद विद्यापीठ हे केंद्रिय विद्यापीठ आहे. आम्ही भाजपकडे दाद मागितली असा या ठिकाणी दुष्प्रचार केला जातो. मात्र आम्ही कोणत्याही पक्षाकडे नव्हे तर लोकनियुक्त सरकारकडेच दाद मागितली आहे. या ठिकाणी केंद्राच्या सत्तेत काँग्रेस पक्ष असता तरीही आम्ही ही तक्रार केंद्र सरकारकडेच केली असती. कोणत्याही पक्षाकडे नव्हे.

बंडारू दत्तात्रेय जरी केंद्रिय मंत्री असले तरी ते सिकंदराबाद लोकसभा क्षेत्राचे केंद्रात प्रतिनिधित्व करतात. त्या पार्श्वभूमीवर आम्ही दत्तात्रेय यांच्याकडे रीतसर तक्रार केली. पुढे खासदार या नात्याने त्यांनी आमची तक्रार केंद्रिय मनुष्यबळ विभागाकडे वर्ग केली.

या संपूर्ण प्रकरणात आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व रोहित वेमुला करीत होता हे खरे आहे काय?
अजिबात नाही. रोहित या सगळ्या प्रकरणाचे नेतृत्व करीत नव्हता. मला मारहाण करताना तो या सगळ्यांसोबत होता. मलाही आश्चर्य वाटते की, त्याच्या मृत्यूनंतर अचानक सगळेच जण या आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ‘रोहितचे समर्थक’ असे संबोधत आहेत.

तुमच्यात (संघटना / विद्यार्थी पातळीवर) समेटाचे प्रयत्न झाले नाहीत का?
अरूण पटनायक हे आमच्या विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. ते जाहीरपणे आपण डाव्या विचारांचे समर्थक असल्याचे सांगतात. असे असूनही त्यांनी माझ्याशी व आंबेडकर विद्यार्थी संघटनेशी बोलणी करून आमच्यात संवाद घडविण्याचा प्रयत्न केला होता. माझी व अभाविपची असा संवाद साधण्याची तयारी होती. मात्र आंबेडकर विद्यार्थी संघटनेने याही विषयात नकारघंटा वाजवून संवाद प्रक्रिया सुरू होऊच दिली नाही. जर रोहितने याच कारणामुळे आत्महत्या केली असेल, तर विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी चर्चेची तयारी का नव्हती?


इतकेच नव्हे तर वसतीगृहातून निलंबित झालेले विद्यार्थी कोठे राहणार हा प्रश्न सुद्धा होताच. अभाविपने आपणहून या विषयात पुढाकार घेऊन विद्यापीठ प्रशासनाने गेस्ट हाऊस किंवा अन्यत्र या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करून द्यावी, असे प्रयत्न चालवले होते. परंतु याही विषयात आंबेडकर विद्यार्थी संघटनेने मोडता घालून निलंबित विद्यार्थ्यांना शॉपिंग कॉप्म्लेक्समध्येच तंबू थाटून देऊन प्रशासनाविरोधात आंदोलन करीत राहण्यासाठी उद्युक्त केले.
 
रोहितशी कधी व्यक्तीगत बोलणे झाले होते का? तुमच्यात मैत्री किंवा वैमनस्य होते का? तो डिप्रेशनमध्ये होता असे जाणवले का?
आमच्यात मैत्री किंवा वैर असे कधीच नव्हते. हे सर्व प्रकरण घडल्यावर जेव्हा विद्यापीठ प्रांगणात आमची गाठ पडत असे, तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघून स्वागतपर हसत असू इतकेच.

रोहित डिप्रेशनमध्ये होता हे खरे मानायचे तर त्याच्याबरोबर जवळपास एक महिना राहणाऱ्या त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना किंवा या आंदोलनात भाग घेऊन निलंबित विद्यार्थ्यांच्यासोबत त्यांच्या तंबूत राहणाऱ्या एकाही प्राध्यापकाला हे जाणवले कसे नाही? जे प्राध्यापक आम्हाला रोज आत्महत्येच्या लक्षणांची माहिती सांगतात, त्यांच्यापैकी एकालाही रोहितमध्ये ही लक्षणे दिसू नयेत? हे विद्यार्थी निलंबित झाले असताना एकट्या रोहितला या मंडळींनी विद्यार्थी वसतीगृहाकडे कसे काय पाठवले? त्याला कोणी कर्मचाऱ्याने पाहिले असते तर त्याच्यावर आणखी कारवाई झाली नसती का? निदान कोणी अन्य विद्यार्थी अथवा प्राध्यापक त्याच्यासोबत या वसतीगृहात का गेले नाहीत?

हे आणि असे अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. मात्र माझी कोणावर आरोप करण्याची इच्छा नसून, या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी होऊन त्यातून सत्य समोर यावे, अशी माझी मागणी आहे.   

रोहितच्या आत्महत्येमागे नेमके काय रहस्य असावे?
मला खरोखरच याचा अंदाज नाही. मात्र वसतीगृहातून निलंबित झाला एवढ्याच कारणामुळे रोहित आत्महत्या करील असे वाटत नाही. कारण तो लढवय्या स्वभावाचा होता. किंबहुना त्याने आपले जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या संपूर्ण प्रकरणी अभाविपला दोषी धरलेले नाही. उलट ज्या चळवळीत त्याने काम केले, त्याबद्दलच आपल्या अंतिम चिठ्ठीत त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहितच्या आधी देखील हैद्राबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्याबद्दल काय सांगू शकशील?
मी या विद्यापीठात २००७ साली प्रवेश घेतला. तेव्हापासून आत्तापर्यंत साधारणपणे १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे मी पाहिले आहे. यात काही विद्यार्थी दलित तर काही इतर जातींचे सुद्धा होते. एक विद्यार्थी तर काश्मिरी मुस्लीम सुद्धा होता. आम्ही अभाविप म्हणून या सर्वच प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी अनेकदा विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

आंबेडकर विद्यार्थी चळवळीचे कार्यकर्तेच आत्महत्या करतात तेव्हा?
आंबेडकर विद्यार्थी संघटनेचीच कार्यकर्ती असलेल्या स्वाती नामक विद्यार्थिनीने सुद्धा २०१० साली अशीच आपली जीवनयात्रा अकाली संपवून घेतली होती. तिच्या पालकांनी तर जाहीरपणे आपल्या मुलीच्या आत्महत्येला आंबेडकर विद्यार्थी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सुद्धा आम्ही या घटनेची चौकशी होण्याची मागणी करणारी निदर्शने केली होती. मात्र आंबेडकर विद्यार्थी संघटनेने आमची ही निदर्शने उधळण्याचे प्रयत्न केले होते. पोलिसांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नव्हती. उलट दुसऱ्या दिवशी आम्ही “स्वातीला न्याय द्या,” अशा आशयाची पोस्टर्स फेसबुकवर टाकल्याबद्दल पोलिसांनी आमच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता.

आज माझ्यावर रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मी त्याबद्दलच्या चौकशीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे. मग तुमच्याच संघटनेच्या कार्यकर्तीने आत्महत्या केल्यावर तुम्ही त्याची चौकशी व्हावी म्हणून असा तत्परपणा का दाखविला नाही? निवडक आत्महत्यांच्या बाबतीत मात्र आंबेडकर विद्यार्थी संघटना न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करते. पूर्वी व्यंकटेश नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर त्याची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी याच संघटनेने आंदोलने केली होती. हाच न्याय सर्वच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला लावण्याला त्यांचा विरोध का असावा? रोहित आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शासन व्हावे, अशी माझी व अभाविपची मागणी आहे.


उपसंहार
रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या निश्चितच दुर्दैवी म्हटली पाहिजे. कारण सामाजिकदृष्ट्या वंचित समाजातून आलेला एखादा विद्यार्थी डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण घेणे व युवा पिढीच्या एखाद्या प्रतिनिधीने आत्मकेंद्रित राहण्याऐवजी सामाजिक व राजकीय मुद्यांवर सक्रीय असणे, हे संदर्भ अतिशय महत्वाचे असतात. एखाद्या विशिष्ट राजकीय मताच्या आग्रहापायी कोणालाही आपला जीव गमवावा लागणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

मात्र रोहितच्या मृत्यूची एकांगी आणि राजकीयदृष्ट्या सोयीची मांडणी गेले काही दिवस सातत्याने सुरू आहे, हे सुशीलकुमारची मुलाखत वाचून जाणवते. आधी हैद्राबाद विद्यापीठ व त्यानंतर जे.एन.यू. सारखे प्रतिष्ठित विद्यापीठ राजकीय व विशेषत: फुटीरतावादी विचारांचे केंद्र बनल्याचे सलग घटनाक्रमांतून स्पष्टपणे समोर येते. अर्थात याकुब मेमन किंवा अफझल गुरूला फाशी देण्याला विरोध होणे, इतकी सोपी ही संपूर्ण घटना मानता येणार नाही. या विरोधाच्या मागे नेमके काय दडले आहे, याचा शोध घेणे सुद्धा सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने आवश्यक ठरते.

या पार्श्वभूमीवर  सुशीलकुमार या विद्यार्थ्याची मुलाखत सुद्धा या घटनेचा एक वेगळा पदर उलगडून दाखवते. विवेकी वाचकाला हा अज्ञात घटनाक्रम विचारप्रवण करेल, हे नक्की !!



-          (मुलाखत व शब्दांकन - प्रणव भोंदे)





No comments:

Post a Comment