सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Saturday, December 11, 2010

देशद्रोही आझमी


समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य अबू आझमी यांनी सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बेलगाम वक्तव्ये करून, आपल्या उद्दामपणाचे प्रदर्शन घडविले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आझमींच्या बिनबुडाच्या आरोपांचा समाचार प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा सहित शिवसेना आणि मनसेने देखील घेतला. इतकेच नव्हे तर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी सुद्धा आझमींना कानपिचक्या दिल्या.

आझमींची बेजबाबदार वक्तव्ये करण्याची खोड जुनीच आहे. परंतु समाजवादी पार्टीच्या एककलमी अजेंड्याप्रमाणे त्यांच्या आरोपांचा मुख्य रोख नेहमीच हिंदुत्ववादी संघटनांवर आणि प्रामुख्याने संघावर असतो; आणि अशा माकडाच्या हाती एखादे कोलीत मिळालेच तर मग विचारायलाच नको..!!

सध्या जगभर विकीलीक्स या संकेतस्थळाचे कारनामे गाजत आहेत. अमेरिकेच्या स्वार्थी आणि क्रूर परराष्ट्र धोरणांचा पर्दाफाश करणारी कागदपत्रे उघड करून, विकीलीक्सने जगभर खळबळ माजवली आहे. अमेरिका तर या धडाक्याने सुन्न झाली आहे. विकीलीक्सने आत्तापर्यंत उघड केलेल्या कागदपत्रांचा रोख प्रामुख्याने अमेरिकेच्या मध्य-पूर्व आशियातील राजकारणाकडे आहे. ओघाने पाकिस्तान, भारत, इंग्लंड आदी देशांचा जरी यात उल्लेख आलेला असला तरी या संदर्भातील महत्वाची आणि अधिक खळबळजनक कागदपत्रे विकीलीक्सने अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहेत. याच कागदपत्रात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या आजघडीच्या जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली अशासकीय संघटनेचा उल्लेख असून, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने संघ आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनेची तुलना केली असल्याचा जावईशोध पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी लावला. हे आरोप जरी बाष्कळ असले तरी एका अर्थाने 'भारतीय राष्ट्रवादा'ची थट्टा पाकिस्तानी माध्यमांनी केली होती. भारतीय परराष्ट्र खात्याने किमानपक्षी भारतीय प्रसारमाध्यमांनी तरी याची दखल घेऊन, पाकिस्तानी कांगावे हाणून पाडणे गरजेचे होते. पण सत्ताधारी काँग्रेस आणि त्यांची बटीक असलेली बहुतांश भारतीय प्रसारमाध्यमे यांनी याबाबत अळीमिळी गुपचिळी असे धोरण स्वीकारले. तथापि ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी मात्र पाकिस्तानी माध्यमांचा खोटारडेपणा उघड करताना, जगातील महत्वाच्या देशांचे संघाबाबत असले कुठलेही गैरसमज नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र अबू आझमींसारख्या विखारी राजकारण्याला हे आयतेच कोलीत मिळाले. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि तेही संघाची कर्मभूमी असलेल्या नागपुरातचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना आझमींना गरळ ओकायला संधी मिळाली. अबू आझमी यांच्या विधानसभेतील आत्तापर्यंतच्या भाषणांचा आढावा घेतला तर त्यांनी सभागृहाचा बहुतांश वेळ असे निराधार विषय घेऊन चर्चा करण्यातच घालविला आहे. ते ज्या 'भिवंडी' मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तेथील जनतेच्या समस्या आझमींनी अभावानेच मांडल्या आहेत. २००९ साली विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनात अबू आझमी यांनी मुद्दाम उर्दू भाषेत शपथ घेऊन, अकारण वादाला तोंड फोडले. त्यानंतर मनसे आणि आझमी यांच्यातील विस्तव जात नसल्याचे चित्र आहे.

इशरत जहां या कॉलेजवयीन 'सुसाईड बॉम्बर'चे (आत्मघातकी अतिरेकी) गुजरात पोलिसांनी केलेले एन्काऊंटर आझमींनी असेच वादग्रस्त ठरविले. इशरत 'निष्पाप' असल्याचे प्रमाणपत्र देऊन, आझमी यांनी तिच्या कुटुंबियांसमवेत नक्राश्रू ढाळून, गुजरातचे मुख्यमंत्री मोदींवर अश्लाघ्य टीका केली. इतकेच नव्हे इशरतच्या कुटुंबियांना आझमींनी सुमारे एक लाख रुपयांची मदत केली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने 'डेव्हिड हेडली' या पाकिस्तानी गुप्तचरास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. नंतर भारताच्या विशेष तपास पथकासमोर दिलेल्या कबुलीजबाबात हेडलीने इशरत जहां ही पाकपुरस्कृत दहशतवादी असल्याचे स्पष्ट केले.

योगायोगाने हेडलीने दिलेली ही महत्वाची कबुली विधानभवनाच्या २०१० सालच्या पावसाळी अधिवेशनाआधी काही दिवस प्रसिद्ध झाली. संकेताप्रमाणे प्रत्येक अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांची पत्रकार परिषद होत असते. या परिषदेत सर्व पक्ष आपली संसदीय रणनीती आणि अधिवेशनातील आपापले अजेंडे स्पष्ट करत असतात. अबू आझमींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस मी स्वत: उपस्थित होतो. त्यावेळी मनसे आमदारांचे निलंबन काँग्रेस मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा असल्यामुळे त्या आमदारांच्या निलंबनास कारण ठरलेले अबू आझमी यांना पत्रकारांनी त्याचसंदर्भात प्रश्न विचारणे पसंत केले. तर आझमींनी उर्दू भाषा, मुस्लीम समाजाच्या विकासासाठी सरकारने अधिक निधी द्यावा, अशाच मागण्या करण्यात मश्गुल होते. अखेरीस मी इशरत जहां प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तिच्याबद्दल आपल्याला अजुनही सहानुभूती वाटत असून, ती निरपराध असल्याची “री” आझमींनी ओढली. मात्र मग निर्वासित काश्मिरी पंडित, भिवंडी पोलीस ठाण्यात क्रूरपणे हत्या झालेले पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल प्रश्न विचारताच अडचणीत आलेले आझमी पत्रकार परिषसंपल्याचे जाहीर करून उठले. या सर्व घटना आणि आझमींनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांची सांगड कशी घालायची..??

खरे तर समाजवादी पार्टीचे सर्व दिग्गज नेते आझमींसारखेच खोटारडे आहेत. यांना देशाच्या विकासाची जराही चाड नाही. ज्या मुस्लीम समाजाच्या नावावर हे राजकारण करतात, त्या समाजाला विकासापासून जाणून-बुजून वंचित ठेवतात. तथापि यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवलेली परिपक्वता पाहता सपा सारख्या पक्षांचे भवितव्य काय असेल याचा अंदाज लावता येतो. खरे तर अशाच पक्षावर बंदी आणण्याची प्रकर्षाने गरज आहे. जर नियमांचे कारण पुढे करून निवडणूक आयोग तशी कारवाई करणार नसेल तर जनतेनेचं या नेत्यांना आपली जागा दाखवली पाहिजे.