सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Sunday, February 21, 2016

सुशीलकुमारवर अन्याय होत नाही ना?


 
सुशीलकुमार 
रोहित वेमुला या हैद्राबाद विद्यापीठात समाजशास्र विषयात डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्याने दि. १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली. संपूर्ण देशभर या घटनेने मोठे वादळ निर्माण केले. आपल्या देशांत राजकारण कशाचेही होऊ शकते, पण या घटनेमुळे देशातील सामाजिक सौहार्दावरच आघात झाल्याची अनेकांची भावना झाली आहे. रोहित ज्या आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे काम करायचा, त्या संघटनेने तर या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग देऊन हे प्रकरण धगधगते राहील, याची पुरेपूर व्यवस्था केली.

आजगायत या घटनेचे विविध कंगोरे आणि त्यामुळे उमटणारे सामाजिक पडसाद आपण अनुभवले आहेत. पण ज्यामुळे रोहितला विद्यापीठाने निलंबित केले, ते कारण नेमके काय होते? या सगळ्या प्रकरणी सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांवर आणि नंतर केंद्र सरकारच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांवर ठपका ठेवला गेला. परिणामी या घटनेची संवेदनशीलता देखील वाढली. अभाविपचा हैद्राबाद विद्यापीठ अध्यक्ष आणि त्याच विद्यापीठात डॉक्टरेट करणारा सुशीलकुमार हा विद्यार्थी आणि आंबेडकर विद्यार्थी संघटनेत असे काय घडले होते? रोहितला आपले जीवन का संपवावे लागले असेल? सुशीलकुमारवर अन्याय तर होत नाही ना? वाचा सुशीलकुमारच्याच शब्दांत....

याकुब मेमनच्या फाशीवरून अभाविप आणि आंबेडकर विद्यार्थी संघटनेत वाद झाला हे खरे आहे काय? नेमके काय घडले?    
याकुब मेमनला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आंबेडकर विद्यार्थी संघटनेने हैद्राबाद विद्यापीठात नमाज जनान्याचे आयोजन केले होते. साधारण ०१-०२ ऑगस्टच्या सुमारास या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. त्याबद्दल निषेध नोंदविणे सुद्धा मान्य होऊ शकेल. पण याकुब कोणताही क्रांतिकारक नव्हता. त्याच्या समर्थनार्थ आंबेडकर विद्यार्थी संघटनेने केलेल्या निदर्शनात दिलेल्या घोषणा जास्त चिंताजनक होत्या. “किती याकुबना ठार माराल? त्याच्यासारखे कित्येक याकुब घरोघरी जन्माला येतील.” अशा प्रकारच्या घोषणा, पोस्टर्स आणि सोशल मीडिया पोस्ट या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी उचलून धरल्या होत्या. ज्याच्याविरोधात अभाविपने ०४ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचे ठरविले.

आम्ही देखील आमच्या फेसबुक स्टेटसवर आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा निषेध करणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. त्यात या संघटनेचा उल्लेख ‘गुंड टोळी’ असा करण्यात आला होता. जो वरील पार्श्वभूमीवर केला होता. ०३ ऑगस्टच्या मध्यरात्री आमच्या विद्यार्थी वसतीगृहात आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे सुमारे ४० कार्यकर्ते जमले. माझ्या खोलीच्या बाहेर येऊन त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्या सगळ्यांनी मला खेचत वसतीगृहाच्या बाहेर नेले आणि मारायला सुरुवात केली. या मंडळींनी माझ्यासमोर तीन मागण्या ठेवल्या. फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर आम्ही ज्या पोस्ट टाकल्या त्या डिलीट करायच्या, विद्यापीठ प्रांगणात लावलेले आंदोलनाची माहिती देणारे पोस्टर्स काढून टाकायचे आणि आमची माफी मागायची. अर्थातच पहिल्या दोन मागण्यांना साफ नकार देऊन तिसऱ्या मागणीबद्दल मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावे लागेल, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला इतक्या मध्यरात्री माझ्या सहकाऱ्यांशी बोलायला सांगितले. ती संधी साधून मी पोलिसांना फोन करून झाल्या प्रकारची माहिती दिली. मात्र पोलीस या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी विद्यापीठाचे सुरक्षारक्षक त्यांच्या गाडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करून मला त्यांच्या गाडीत बसवले. जेमतेम तीन सुरक्षारक्षक समोर उभ्या असलेल्या ४०-५० विद्यार्थ्यांच्या आक्रमक घोळक्याला सांभाळू शकत नव्हते. या विद्यार्थ्यांनी मला गाडीतून खेचून बाहेर काढले. अखेर सुरक्षारक्षकांनी देखील मला या संघटनेच्या आग्रहानुसार त्यांची लेखी माफी मागण्यास सांगितले. नाईलाज झाल्यामुळे मी तसे पत्र त्यांना लिहून दिले.

हे झाल्यावर शांत होण्याऐवजी हा घोळका आणखी आक्रमक झाला. आता या माफीनाम्याच्या झेरॉक्स प्रती संपूर्ण विद्यापीठात लाव, असा हुकुम त्यांनी मला दिला. मी म्हटले की, यावेळी झेरॉक्स कोठे काढणार? मी हे काम उद्या करीन. मात्र त्यांनी मला सुरक्षारक्षक चौकीत नेऊन त्या ठिकाणी मला माझा माफीनामा माझ्याच फेसबुक स्टेटसवर टाकायला लागला. जुन्या पोस्ट देखील त्यांनी डिलीट केल्या. त्यानंतर पुन्हा असे करशील तर याद राख अशी धमकी देऊन आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी निघून गेले. मी देखील माझे स्वत:चे फेसबुक अकाऊंट डिलीट केले. कारण मला माझ्या अकाऊंटवरून या संघटनेचा अजेंडा राबवायचा नव्हता. मला मारपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांत रोहित वेमुलाचा समावेश होता.
 
रोहित आणि त्याचे सहकारी याकुबच्या फाशीविरोधात आंदोलन करताना 
मग पुढे नेमके कायकाय घडले?
या सगळ्या घटनेनंतर मी माझ्या भावाला फोन करून बोलावून घेतले. तो मला घेऊन विद्यापीठाच्या रुग्णालयात निघाला असताना २ विद्यार्थी धावत आले आणि त्यांनी आम्हाला बाहेरच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. मी माझे फेसबुक अकाऊंट डिलीट केल्यामुळे खवळलेल्या आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा माझा शोध सुरू केला होता. अखेर मी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. दुसऱ्या दिवशी अभाविपच्या विद्यापीठ सचिवाने मला मारहाण झाल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली. मात्र त्याच्याकडे काही पुरावे नसल्यामुळे दोन्ही संघटनांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले.

शिक्षकांची पक्षपाती भूमिका
त्यानंतर हे प्रकरण विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीकडे गेले. विशेष म्हणजे या समितीने काहीही  चौकशी सुरू करण्यापूर्वीच विद्यापीठातील काही शिक्षकांनी मला (सुशीलकुमार) मारहाण झाल्याची अफवा असल्याचे व वास्तवात तसे काहीही घडले नसल्याचे पत्र प्रशासनाला लिहिले. वैचारिक वाद असले तरी अशा विषयात शिक्षक तटस्थ असतात, या माझ्या धारणेलाच या ठिकाणी धक्का बसला.

मात्र मी रुग्णालयातून परत आल्यावर प्रशासनाकडे निवेदन दिले की, झाल्या घटनेची माहिती देणारे पुरावे आणि साक्षीदार माझ्याकडे आहेत. तरी तुम्ही याबाबत सखोल चौकशी करावी. दि. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या या चौकशीत माझ्याबाजुने काही विद्यार्थी साक्ष देण्यासाठी उपस्थित होते. अभाविप कोणाच्याही जातीचे उल्लेख करणे टाळते. मात्र माझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी उभे असणारे देखील दलित जातींचेच होते, हे या ठिकाणी नमूद करणे आवश्यक ठरते. या चौकशीत समोर आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य मानून आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या ६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातूनच निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्यांना विद्यापीठ प्रांगणातून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले.

आता या निलंबित झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले. या प्रकरणातील प्राथमिक तक्रारीनंतर (अभाविप विद्यापीठ सचिवाने केलेल्या तक्रारीचा संदर्भ) दोन्ही संघटनांना इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर सुशीलकुमारच्या तक्रारीवरून खोट्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप आंबेडकर विद्यार्थी संघटनेने केला. अखेर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आर.पी.शर्मा यांनी या आरोपांची आणि मूळ घटनेची चौकशी करण्यासाठी सुधाकरन समिती गठीत केली. यावर अभाविपनी देखील मागणी केली की, समिती गठीत करून पुन्हा चौकशी करण्यास हरकत नाही. पण या चौकशीची कालमर्यादा निश्चित केली जावी. या समितीने काही तांत्रिक मुद्यांमुळे या प्रकरणाचा तपास आपण करू शकत नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे विद्यापीठ कायद्याला अनुसरून आम्ही विद्यापीठाच्या कार्यकारी समितीकडे दाद मागितली. कार्यकारी समितीच्या उपसमितीने देखील संपूर्ण प्रकरणाची छाननी करून या विद्यार्थ्यांवर पूर्वी केलेली कारवाई योग्य ठरवून तसा अहवाल कार्यकारी समितीला सुपूर्द केला.

कुलगुरूंनी दोषी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले !!
कुलगुरू डॉ. अप्पा राव यांनी कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, अशी भूमिका घेतली आणि या विद्यार्थ्यांना केवळ वसतीगृहातून निलंबित करण्याचा नवीन निर्णय जाहीर केला.

शैक्षणिक निलंबन मागे घेताना या विद्यार्थ्यांनी राजकीय चळवळीत भाग घेऊ नये, अशी अट घालण्यात आली. आंबेडकर विद्यार्थी संघटनेने याविरोधात देखील ‘सामाजिक बहिष्कार’ वगैरे नावाने निषेध नोंदविण्यास सुरुवात केली. पुढे वसतीगृहातून निलंबित झाल्यावर १५ दिवसांनी त्यांनी विद्यापीठाच्या शॉपिंग कॉप्म्लेक्समध्ये धरणे आंदोलनास सुरूवात झाली.

तुझ्या आईने या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे का ठोठावले? न्यायालयाकडे नेमकी कोणत्या विषयात दाद मागितली?
मला झालेल्या मारहाणीनंतर माझी आई कुलगुरूंना भेटण्याकरिता त्यांच्या कचेरीत गेली. त्या ठिकाणी तिला त्याच कचेरीत आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी धमकावण्यास सुरुवात केली. जर प्रत्यक्ष कुलगुरूंच्या कचेरीत मला एक पालक असूनही असा उपद्रव होत असेल, तर माझा मुलगा कसा सुरक्षित राहील, या विचाराने माझ्या आईने न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्याचा निर्णय घेतला.

माझ्या मुलाला विद्यापीठात सुरक्षा मिळावी, अशी माझ्या आईने याचिका केली होती. केवळ माझीच आई नव्हे तर माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थ्याला झोडपले होते. त्या अन्यायग्रस्त विद्यार्थ्याच्या आईने देखील या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली आहे.  

दरम्यान आंबेडकर विद्यार्थी संघटनेने देखील न्यायालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या निलंबनाची कारवाई करणाऱ्या विद्यापीठाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र यावर झालेल्या ‘नोटीस ऑफ मोशन’ मध्ये असा निर्णय घाईने देण्याचे न्यायालयाने अमान्य केले होते. दि. १८ जानेवारी रोजी न्यायालयात या विषयी पुढील सुनावणी होणार होती. मात्र दि. १७ जानेवारी रोजीच रोहितने आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी समजली. न्यायालयाने देखील यामुळे सुनावणी दि. १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली.   

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्तक्षेपाची नेमकी हकीगत काय?
आमची तक्रार दाखल झाल्यावर न्यायालयाने विद्यापीठाला नोटीस पाठवून या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने काय कारवाई केली, याचे उत्तर मागविले. दुसरीकडे आंबेडकर विद्यार्थी संघटनेने विद्यापीठात मोठे आंदोलन सुरू केले होते. त्यांना साथ देण्यासाठी असरुद्दिन ओवैसी यांच्या एम.आय.एम. पक्षाचे कार्यकर्ते देखील विद्यापीठात आंदोलन करू लागले. या सगळ्या राजकीय घडामोडी बघता आम्ही याची तक्रार केंद्र सरकारकडे करायचे ठरविले. कारण हैद्राबाद विद्यापीठ हे केंद्रिय विद्यापीठ आहे. आम्ही भाजपकडे दाद मागितली असा या ठिकाणी दुष्प्रचार केला जातो. मात्र आम्ही कोणत्याही पक्षाकडे नव्हे तर लोकनियुक्त सरकारकडेच दाद मागितली आहे. या ठिकाणी केंद्राच्या सत्तेत काँग्रेस पक्ष असता तरीही आम्ही ही तक्रार केंद्र सरकारकडेच केली असती. कोणत्याही पक्षाकडे नव्हे.

बंडारू दत्तात्रेय जरी केंद्रिय मंत्री असले तरी ते सिकंदराबाद लोकसभा क्षेत्राचे केंद्रात प्रतिनिधित्व करतात. त्या पार्श्वभूमीवर आम्ही दत्तात्रेय यांच्याकडे रीतसर तक्रार केली. पुढे खासदार या नात्याने त्यांनी आमची तक्रार केंद्रिय मनुष्यबळ विभागाकडे वर्ग केली.

या संपूर्ण प्रकरणात आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व रोहित वेमुला करीत होता हे खरे आहे काय?
अजिबात नाही. रोहित या सगळ्या प्रकरणाचे नेतृत्व करीत नव्हता. मला मारहाण करताना तो या सगळ्यांसोबत होता. मलाही आश्चर्य वाटते की, त्याच्या मृत्यूनंतर अचानक सगळेच जण या आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ‘रोहितचे समर्थक’ असे संबोधत आहेत.

तुमच्यात (संघटना / विद्यार्थी पातळीवर) समेटाचे प्रयत्न झाले नाहीत का?
अरूण पटनायक हे आमच्या विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. ते जाहीरपणे आपण डाव्या विचारांचे समर्थक असल्याचे सांगतात. असे असूनही त्यांनी माझ्याशी व आंबेडकर विद्यार्थी संघटनेशी बोलणी करून आमच्यात संवाद घडविण्याचा प्रयत्न केला होता. माझी व अभाविपची असा संवाद साधण्याची तयारी होती. मात्र आंबेडकर विद्यार्थी संघटनेने याही विषयात नकारघंटा वाजवून संवाद प्रक्रिया सुरू होऊच दिली नाही. जर रोहितने याच कारणामुळे आत्महत्या केली असेल, तर विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी चर्चेची तयारी का नव्हती?


इतकेच नव्हे तर वसतीगृहातून निलंबित झालेले विद्यार्थी कोठे राहणार हा प्रश्न सुद्धा होताच. अभाविपने आपणहून या विषयात पुढाकार घेऊन विद्यापीठ प्रशासनाने गेस्ट हाऊस किंवा अन्यत्र या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करून द्यावी, असे प्रयत्न चालवले होते. परंतु याही विषयात आंबेडकर विद्यार्थी संघटनेने मोडता घालून निलंबित विद्यार्थ्यांना शॉपिंग कॉप्म्लेक्समध्येच तंबू थाटून देऊन प्रशासनाविरोधात आंदोलन करीत राहण्यासाठी उद्युक्त केले.
 
रोहितशी कधी व्यक्तीगत बोलणे झाले होते का? तुमच्यात मैत्री किंवा वैमनस्य होते का? तो डिप्रेशनमध्ये होता असे जाणवले का?
आमच्यात मैत्री किंवा वैर असे कधीच नव्हते. हे सर्व प्रकरण घडल्यावर जेव्हा विद्यापीठ प्रांगणात आमची गाठ पडत असे, तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघून स्वागतपर हसत असू इतकेच.

रोहित डिप्रेशनमध्ये होता हे खरे मानायचे तर त्याच्याबरोबर जवळपास एक महिना राहणाऱ्या त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना किंवा या आंदोलनात भाग घेऊन निलंबित विद्यार्थ्यांच्यासोबत त्यांच्या तंबूत राहणाऱ्या एकाही प्राध्यापकाला हे जाणवले कसे नाही? जे प्राध्यापक आम्हाला रोज आत्महत्येच्या लक्षणांची माहिती सांगतात, त्यांच्यापैकी एकालाही रोहितमध्ये ही लक्षणे दिसू नयेत? हे विद्यार्थी निलंबित झाले असताना एकट्या रोहितला या मंडळींनी विद्यार्थी वसतीगृहाकडे कसे काय पाठवले? त्याला कोणी कर्मचाऱ्याने पाहिले असते तर त्याच्यावर आणखी कारवाई झाली नसती का? निदान कोणी अन्य विद्यार्थी अथवा प्राध्यापक त्याच्यासोबत या वसतीगृहात का गेले नाहीत?

हे आणि असे अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. मात्र माझी कोणावर आरोप करण्याची इच्छा नसून, या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी होऊन त्यातून सत्य समोर यावे, अशी माझी मागणी आहे.   

रोहितच्या आत्महत्येमागे नेमके काय रहस्य असावे?
मला खरोखरच याचा अंदाज नाही. मात्र वसतीगृहातून निलंबित झाला एवढ्याच कारणामुळे रोहित आत्महत्या करील असे वाटत नाही. कारण तो लढवय्या स्वभावाचा होता. किंबहुना त्याने आपले जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या संपूर्ण प्रकरणी अभाविपला दोषी धरलेले नाही. उलट ज्या चळवळीत त्याने काम केले, त्याबद्दलच आपल्या अंतिम चिठ्ठीत त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहितच्या आधी देखील हैद्राबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्याबद्दल काय सांगू शकशील?
मी या विद्यापीठात २००७ साली प्रवेश घेतला. तेव्हापासून आत्तापर्यंत साधारणपणे १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे मी पाहिले आहे. यात काही विद्यार्थी दलित तर काही इतर जातींचे सुद्धा होते. एक विद्यार्थी तर काश्मिरी मुस्लीम सुद्धा होता. आम्ही अभाविप म्हणून या सर्वच प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी अनेकदा विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

आंबेडकर विद्यार्थी चळवळीचे कार्यकर्तेच आत्महत्या करतात तेव्हा?
आंबेडकर विद्यार्थी संघटनेचीच कार्यकर्ती असलेल्या स्वाती नामक विद्यार्थिनीने सुद्धा २०१० साली अशीच आपली जीवनयात्रा अकाली संपवून घेतली होती. तिच्या पालकांनी तर जाहीरपणे आपल्या मुलीच्या आत्महत्येला आंबेडकर विद्यार्थी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सुद्धा आम्ही या घटनेची चौकशी होण्याची मागणी करणारी निदर्शने केली होती. मात्र आंबेडकर विद्यार्थी संघटनेने आमची ही निदर्शने उधळण्याचे प्रयत्न केले होते. पोलिसांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नव्हती. उलट दुसऱ्या दिवशी आम्ही “स्वातीला न्याय द्या,” अशा आशयाची पोस्टर्स फेसबुकवर टाकल्याबद्दल पोलिसांनी आमच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता.

आज माझ्यावर रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मी त्याबद्दलच्या चौकशीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे. मग तुमच्याच संघटनेच्या कार्यकर्तीने आत्महत्या केल्यावर तुम्ही त्याची चौकशी व्हावी म्हणून असा तत्परपणा का दाखविला नाही? निवडक आत्महत्यांच्या बाबतीत मात्र आंबेडकर विद्यार्थी संघटना न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करते. पूर्वी व्यंकटेश नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर त्याची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी याच संघटनेने आंदोलने केली होती. हाच न्याय सर्वच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला लावण्याला त्यांचा विरोध का असावा? रोहित आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शासन व्हावे, अशी माझी व अभाविपची मागणी आहे.


उपसंहार
रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या निश्चितच दुर्दैवी म्हटली पाहिजे. कारण सामाजिकदृष्ट्या वंचित समाजातून आलेला एखादा विद्यार्थी डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण घेणे व युवा पिढीच्या एखाद्या प्रतिनिधीने आत्मकेंद्रित राहण्याऐवजी सामाजिक व राजकीय मुद्यांवर सक्रीय असणे, हे संदर्भ अतिशय महत्वाचे असतात. एखाद्या विशिष्ट राजकीय मताच्या आग्रहापायी कोणालाही आपला जीव गमवावा लागणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

मात्र रोहितच्या मृत्यूची एकांगी आणि राजकीयदृष्ट्या सोयीची मांडणी गेले काही दिवस सातत्याने सुरू आहे, हे सुशीलकुमारची मुलाखत वाचून जाणवते. आधी हैद्राबाद विद्यापीठ व त्यानंतर जे.एन.यू. सारखे प्रतिष्ठित विद्यापीठ राजकीय व विशेषत: फुटीरतावादी विचारांचे केंद्र बनल्याचे सलग घटनाक्रमांतून स्पष्टपणे समोर येते. अर्थात याकुब मेमन किंवा अफझल गुरूला फाशी देण्याला विरोध होणे, इतकी सोपी ही संपूर्ण घटना मानता येणार नाही. या विरोधाच्या मागे नेमके काय दडले आहे, याचा शोध घेणे सुद्धा सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने आवश्यक ठरते.

या पार्श्वभूमीवर  सुशीलकुमार या विद्यार्थ्याची मुलाखत सुद्धा या घटनेचा एक वेगळा पदर उलगडून दाखवते. विवेकी वाचकाला हा अज्ञात घटनाक्रम विचारप्रवण करेल, हे नक्की !!



-          (मुलाखत व शब्दांकन - प्रणव भोंदे)





Thursday, February 18, 2016

विलोभनीय आसाम


ईशान्य भारतात फिरायला जायचे, हे गेली दहा वर्षे ठरवत होतो. नोव्हेंबर महिन्यात अवचित योग जुळून आला आणि 12 जणांचा आमचा समूह दिवाळीनंतर लगोलग आसामकडे रवाना झाला.

जाताना एक दिवस कलकत्त्याला मुक्काम ठरवला होता. दक्षिणेश्‍वर येथे कालीमातेचे दर्शऩ घेऊन, बेलूर
रामकृष्ण मठाचे मुख्यालय असलेला बेलूर मठ 
येथील रामकृष्ण मठात गेलो. अत्यंत शांत व पवित्र वातावरणातील या मठात श्री रामकृष्ण परमहंस
, स्वामी विवेकानंद व रामकृष्णांचे इतर नामवंत शिष्य यांच्या समाध्या आहेत. गंगेच्या किनार्‍यावर असलेल्या या मठाच्या आवारात असलेली सदाहरित बाग आणि त्या आसमंतात कुंजन करणारे शेकडो जातीचे पक्षी यामुळे या परिसरातून परत जाताना एक वेगळीच अनुभूती लाभते.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरचे विमान असल्यामुळे गुवाहाटीत देखील लवकर पोहोचलो. आवरून सगळेच आदीशक्तीचे प्रख्यात पीठ असलेल्या कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलो. आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. त्याची राजधानी असलेल्या गुवाहाटी (दिसपूर) जवळच असलेले कामरूप जिल्ह्यातील कामाख्या मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. कामरूप जिल्हा हा इतिहासकालापासून तंत्रपूजेसाठी ज्ञात आहे. कामाख्या देवीचे हे मंदिर म्हणजे तांत्रिक व शाक्त उपासकांचे माहेरघरच समजले जाते. या ठिकाणी उपासनेचे फल लवकर प्राप्त होते, या ख्यातीमुळे देशभरातील तांत्रिक-मांत्रिक साधना करण्यासाठी याच ठिकाणी येणे पसंत करतात.

दक्षयज्ञाचे आमंत्रण नसतानाही शिवशंकराची प्रथम पत्नी सती आपल्या पित्याच्या घरी गेली. दक्षाच्या मनात मात्र शंकराविषयी राग असल्यामुळे त्याने सतीला अपमानास्पद वागणूक दिली. परिणामी अपमानित झालेल्या सतीने स्वतःला यज्ञकुंडातच झोकून देऊन जीवन संपविले. ही बातमी समजताच क्रुद्ध झालेल्या भोलेनाथाने तडक दक्षयज्ञाचे ठिकाण गाठून सृष्टीसंहार आरंभला. प्रजापती दक्षाचा वध करूनही शंकराचे दुःख कमी होईना. त्याने सतीचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करायला सुरूवात केली. परिणामी सृष्टीचा अंत होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी भगवान विष्णूंनी हस्तक्षेप करून आपल्या सुदर्शन चक्राने सती देवीच्या शरिराचे 52 तुकडे केले. सतीच्या दिव्य शरिराचे तुकडे ज्या ठिकाणी पडले, त्या जागा आज शक्तीपीठे म्हणून ओळखल्या जातात. देवी इकडे चैतन्यरूपात अस्तित्वात असल्याची श्रद्धा आहे. सती देवीचे जननांग ज्या ठिकाणी पडले ते आजचे कामाख्या मंदिर होय. एका अर्थाने या ठिकाणी सृजनाची आराधना केली जाते. देवीचे जननांग या ठिकाणी असल्यामुळे देवीला मासिक धर्म येतो असेही मानले जाते. त्याचे प्रतीक म्हणून या मंदिरात येणार्‍या भक्तांना लालभडक कुंकू प्रसाद म्ङणून दिले
कामाख्या मंदिराच्या प्रांगणातील नटराजाचे शिल्प 
जाते. या मंदिराच्या आवारातच असलेले नटराजाचे भव्य शिल्प व नटराजाच्या पायांखाली सृष्टीच्या रक्षणाचा भार वाहणारे विष्णू हे अत्यंत जिवंत शिल्प पाहण्यास मिळाले. संपूर्ण मंदिर हे अत्यंत प्राचीन असल्यामुळे या मंदिराच्या भिंतींवर असलेली कोरीव शिल्पे देखील डोळ्यांचे पारणे फेडतात.

पुढे गुवाहाटी शहरातून वाहणार्‍या ब्रम्हपुत्र नदातील उमानंद या शंकराच्या सुंदर मंदिराला भेट दिली. ब्रम्हपुत्राबद्दल ऐकून होतो, पण त्याचे पहिलेवहिले दर्शन देखील स्तिमित करणारे होते. शहरातून वाहणार्‍या या नदाचा दुसरा किनारा दुर्बिणीशिवाय पाहणे अशक्य व्हावे, इतकी प्रचंड रूंदी असलेल्या या नदातील पाणी मात्र तुलनेने संथ होते. पवित्र मानस सरोवरातून उगम पावणारा हा नद ईशान्य भारताची जीवनदायिनी आहे. तिबेटमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून अरूणाचल प्रदेशपासून हा नद भारताच्या हद्दीतून वाहतो. अरूणाचल प्रदेश, आसाम, प. बंगालचा काही भाग व पुढे बांग्लादेशाची लक्षावधी हेक्टरची जमीन सुजलाम-सुफलाम करणारा हा नद स्वभावाने मात्र काहीसा चंचल आहे. शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर तिबेटच्या पठारातील सुपीक मृदा आणि हिमालयाच्या कुशीतून येताना वाहून आणलेल्या गाळामुळे ब्रम्हपुत्र जेव्हा मैदानी प्रदेशात उतरतो तेव्हा तो सर्व गाळ साचून नदाचे प्रवाह बदलण्यास सुरूवात होते. स्वाभाविकच आजुबाजुच्या काही हेक्टर जमिनीला पोटात घेऊन हा नद सागराच्या दिशेने मार्गक्रमणा करतो. त्यामुळे या नदाच्या किनारी असलेली वस्ती, शेती, वन्यजीवन आणि नागरिक यांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते. अर्थात नदाने सतत वाहून आणलेल्या गाळामुळे आणि अमृततुल्य पाण्यामुळेच येथील सृष्टी बहरली आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गाळ नदीच्या पात्राच्या मध्यभागी साचून काही नैसर्गिक बेटे तयार होतात. उमानंद देखील त्यापैकीच एक बेट आहे.

मुंबईकरांना बाबुलनाथाची आठवण करून देणार्‍या या बेटावर हजारो वर्षांच्या भूगर्भ हालचालीतून टेकडी उभी राहिली असावी. त्या टेकडीच्या शिखरावर असलेले सुंदर शिव मंदिर आणि अवतीभवती दिसणारा ब्रम्हपुत्र नद आपले भान हरपून टाकतो. शिवशंभू हा योगीराज आहे. त्याला निसर्ग आणि शांतीच्या सहवासात राहण्यास आवडते. उमानंद येथे या दोन्ही गोष्टी उपलब्ध असल्यामुळे भगवान भोलेनाथ येथे चैतन्यरूपाने वास्तव्य करीत असावेत.

यानंतर हाजो या गुवाहाटीपासून सुमारे 24 किमी अंतरावर असलेल्या गावाला आम्ही भेट दिली. हाजो गावात असलेले हयग्रीव मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे. हयग्रीव हे विष्णूचे अश्‍वरूप समजले जाते. ऋषींच्या विनंतीवरून त्यांच्या यज्ञाच्या रक्षणार्थ उभ्या असलेल्या विष्णूने हयासुर नावाच्या दैत्याचा संहार केला. हा दैत्य घोड्याचे रूप धारण करून यज्ञाचा संहार करीत असे. मात्र याचा वध केल्यानंतर योगेश्‍वर विष्णूच्या मनात देखील सुप्त अहंकार निर्माण झाला. आपल्यामुळेच या सृष्टीचे रक्षण होते, असा विचार त्याच्या मनात येताक्षणी त्याच्याच हातात असलेल्या धनुष्याचे तोंड त्याच्या दिशेने झाले आणि प्रत्यंचेवर चढविलेला शर स्वतः विष्णूची मान उडवून गेला. यज्ञकर्मात लीन असलेल्या ऋषींना जेव्हा ही घटना कळली, तेव्हा त्यांनी विष्णू परमनियतीने नेमून दिलेले कर्तव्य करतो, हे जाणून विष्णूशेजारीच पडलेले हयासुराचे मस्तक विष्णूच्या धडावर ठेवले. अहंकार ईश्‍वरी तत्वाचा देखील घात करतो, याची आठवण राहावी, म्हणूनच जणू विष्णूने हे मस्तक आपल्या शरीरावर धारण केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा म्हणजे आजचे हाजो गाव व तेथील हयग्रीव माधव मंदिर होय. मणीकुट टेकडीवर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचणे तसे दमछाक करणारेच आहे. पण टेकडीच्या पायथ्याशी असलेला रम्य तलाव आणि टेकडीच्या शिखरावर असलेले हे पुरातन मंदिर आपल्या श्रमांचे चीज करतात. हाजो गावाजवळ असलेले सालकुची नावाचे गाव आपल्या पैठण जवळील येवल्याची आठवण करून देते. स्थानिक रेशिमापासून बनणारे तलम कापड व साड्यांची ही मोठी पेठ आहे. या गावातच हातमागावर अप्रतिम कलाकुसर असलेल्या सिल्क साड्या मिळतात. गुवाहाटी शहरात बघण्यासारखे आणखी बरेच काही आहे. शंकरदेव कला केंद्र, गुवाहाटीचे प्राणीसंग्रहालय, कामदेवाचे मंदिर, भुवनेश्‍वरी मंदिर, वसिष्ठ ऋषींचा आश्रम, आसाम राज्य वस्तूसंग्रहालय इत्यादी प्रसिद्ध ठिकाणी केवळ वेळेअभावी जाता आले नाही.

पुढे जगप्रसिद्ध अशा काझीरंगा अभयारण्याला भेट देण्याचा कार्यक्रम होता. एकशिंगी गेंडा या अवाढव्य शाकाहारी प्राण्याचे काझीरंगा हे मोठे निवासस्थान आहे. ब्रम्हपुत्रच्या पाण्यावर पोसलेल्या माणसापेक्षाही उंचीच्या गवतावर जगणारे गेंडे सर्वांच्याच कुतुहलाचा विषय असतात. विशेष म्हणजे ईशान्य भारत वगळता उर्वरीत भारतात गेंडा हा प्राणी आढळत नाही. काझींरगामध्ये वाघही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण आमच्या या भटकंतीत वाघोबाची आमच्यावर खप्पामर्जी असावी. पहाटे हत्तीवर बसून जंगल भ्रमंती आणि संध्याकाळी जीप सफारी दरम्यान गेंडे, रानम्हशी, रानहत्ती, रानडुक्कर, हरणे, बारशिंगा अशा अनेक प्राण्यांनी आणि पाणगरूडासारख्या सहसा न
एकशिंगी गेंडा 

नीलकंठ पक्षी  

बारशिंगा आणि रानडुक्कर 














दिसणार्‍या कित्येक पक्ष्यांनी आम्हाला दर्शन दिले. नागांव व गोलाघाट या दोन जिल्ह्यांदरम्यान तब्बल 378 चौ.कि.मी. च्या पसार्‍यात हे मुख्य संरक्षित जंगल पसरले आहे. शिवाय 450 चौ.किमी.चा पट्टा या जंगलाचा भाग समजला जातो. एकीकडे गवताळ तर दुसरीकडे सदाहरित वृक्षांचे घनदाट असे हे वैविध्यपूर्ण जंगल आहे. 2014 साली झालेल्या प्राणीगणनेनुसार सुमारे 1800 गेंड्यांचे वास्तव्य या जंगलातील पाणथळ प्रदेशात आहे. तर सुमारे 86 वाघ आणि बिबटे, अस्वल, लांडगा, तरस व कोल्ह्यासारखे हिंस्त्र प्राणी देखील या जंगलात विपूल आहेत. सोनेरी माकड हे आता जवळपास नामशेष झालेले माकड तसेच डॉल्फिनसारखा अत्यंत हुशार जलचर देखील या जंगलातून वाहणार्‍या ब्रम्हपुत्रच्या आश्रयाने राहतो. गरूड, घारी व गिधाडांसारखे शिकारी पक्षी तसेच खंड्या, सारस, नीळकंठासारखे देखणे पक्षी देखील या वनात आहेत. निसर्गप्रेमींसाठी तर रोज नवीन पैलू उलगडणारे हे जंगल खरोखरीच आसामचे वैभव आहे. आमचा मुक्काम येथे दोन दिवस होता. मात्र हे जंगल सोडताना सर्वांनाच हुरहुर वाटत होती.

पुढे जोरहाट जिल्ह्यातील माजुली बेटाला आम्ही भेट दिली. गोड्या पाण्यात असलेले जगातील सर्वात मोठे बेट असा याचा सार्थ लौकिक आहे. सुमारे 430 चौ.किमी. क्षेत्र असलेल्या या बेटाला ब्रम्हपुत्र आणि लोहित या दोन नद्यांच्या मधोमध स्थान मिळाले आहे. वैष्णव संप्रदायाचे हे आसाममधील सर्वात मोठे केंद्र समजले जाते. 100 टक्के प्रदुषणमुक्त ठिकाणी आणि लौकिक जगातील विकारांपासून दूर असलेल्या माणसांत कोणाला राहावयाचे असेल, तर माजुलीला पर्याय नाही. गेल्या 100 वर्षांत ब्रम्हपुत्रच्या सतत बदलत्या प्रवाहांमुळे हे बेट 1200 चौ.किमी. क्षेत्रफळावरून 430 चौ.किमी. पर्यंत घटले आहे. या बेटावर पोहोचल्यावर जणू इतिहासाच्या सुवर्णपानात दडलेल्या भारतात पोहोचल्यासारखे वाटले. या बेटावर साधारण 2 लाख नागरिक राहतात. मुख्य भूमीशी जोडणारा एकही रस्ता या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे फेरीबोटीनेच प्रवासी व आवश्यक सामानाची वाहतूक होते.

माजुलीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. शेती व मासेमारी हे येथील उदरनिर्वाहाचे प्रमुख व्यवसाय आहेत. बर्‍याच शाळा व महाविद्यालय असल्यामुळे शिक्षणाची चांगली सोय आहे. सरकारी रूग्णालय आणि पोलिस ठाणे देखील आहे. मात्र निसर्गपूरक जीवनशैलीमुळे व नैतिक आचरणावर भर असल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांना विशेष काम नसते. गेल्या 12 वर्षात एकही गंभीर गुन्हा या बेटावर घडला नसल्याचे पोलिसदेखील अभिमानाने सांगतात. उठसुठ धर्मावर टीका करणार्‍यांनी आदर्श धार्मिक आचरण कसे असते तो पाहण्यासाठी माजुलीला अवश्य भेट द्यावी. ऊयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मुलांना या बेटावर असलेल्या विविध मठांत (आश्रमात) शिक्षणासाठी ठेवले जाते. मात्र या ठिकाणी मदरशांसारखे केवळ धार्मिक शिक्षण मुळीच होत नाही. वेद-उपनिषदांच्या अभ्यासापासून ते इंजिनिअरिंग व मेडिकलसारखे उच्चशिक्षण घेण्यासाठी व त्या ज्ञानाचा उपयोग समाजबांधवांकरिता करण्याची शिकवण या आश्रमात राहणारे संन्यासी देतात. निर्गुण उपासक भागवत ग्रंथाची तर सगुण उपासक श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराची उपासना करतात. किमान गरजा असल्या तरी या मंडळींनी आपल्या प्रतिभेला पुरेसा वाव दिला आहे. कृष्णलीला सादर करण्याच्या निमित्ताने गायन, वादन, नृत्य, अभिनय यांची जोपासना फार लहानपणापासून केली जाते. शिवाय कृष्णलीलेच्या प्रभावी सादरकरणासाठी मुखवटेनिर्मिती व बांबूपासून इतर दर्जेदार उत्पादने या ठिकाणी तयार केली जातात.

मुखवटानिर्मिती केंद्राला भेट दिल्यावर लक्षात आले की, हे देखील एक गुरूकुल आहे. एक नया रूपयाही न घेता जिवंत मुखवटे बनविण्याचे कसब येथे शिकविले जाते. त्यासाठी केवळ आश्रमातील सहजीवनानुसार केली जाणारी कामे प्रत्येकाला करावी लागतात. मठच शिष्यांच्या उदरभरणाची काळजी घेतात. काही संन्यासी केवळ या कलेचे शिक्षण देण्याचे काम करतात. विदेशातील अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येऊन ही कला शिकून गेले आहेत. त्यामुळे सुप्रसिद्ध लंडन म्युझिअमपासून ते पॅरीसच्या वस्तूसंग्रहालयापर्यंत अनेक ठिकाणी या कलेने रसिकांची वाहवा मिळविली आहे. या बेटावर वर्णाश्रम व्यवस्था असली तरी जातीपातींना येथे थारा नाही. कर्मानुसार वर्ण ठरतो. भागवत व वेदांचे शिक्षण घेण्याची सर्वांना परवानगी आहे. फक्त त्यासाठी असलेल्या नियमांचे पालन प्रामाणिकपणे व्हावे लागते. काही मठांना, विशेषतः येथीलस सर्वात प्रसिद्ध उत्तर सत्राला आम्ही भेट दिली. प्रत्येक मठात तीन आचार्य प्रमुखपदी असतात. सर्वात प्रमुख आचार्य हे गुरूस्थानी असतात. या बेटावर त्यांचा शब्द संन्यासी व गृहस्थी सर्वांमध्येच अंतिम समजला जातो. यांच्याखालोखाल क्रमांक दोन व तीन असे आचार्य असतात. क्रमांक एकच्या मृत्यूनंतर दुसरा त्यांचे आणि तिसरा आचार्य दुसर्‍याचे स्थान घेतो. मात्र तिसर्‍या आचार्याचे रिक्त पद भरण्यासाठी सर्व गावातून मान्यवर मंडळींची एक समिती गठीत करून सामुहिक निर्णय घेतला जातो. या सर्व परंपरा अर्थातच शंकरदेवांनी निश्‍चित केलेली आहे. आद्य शंकराचार्यांइतकेच ईशान्य भारतात शंकरदेवांना मानले जाते.
 
माजुली येथील मुखवटा निर्मिती केंद्र 


पुढे शिवसागर या ऐतिहासिक शहरात मुक्काम होता. आहोम या आसामातील सर्वात लोकप्रिय राजवंशाचे हे माहेरघर. गौरीसागर आणि शिवसागर ही दोन जुळी गावे असावीत. एका गावात पार्वतीचे खूप प्राचीन मंदिर आहे. मात्र हे मंदिर भाविकांसाठी खुले नाही. जीर्णोद्धार होण्याची गरज वाटते. शिवसागरमध्ये मात्र शंकराचे भव्य मंदिर आहे. ते मात्र पाहण्यासारखे आहे. याशिवाय आहोम राजांचे वाडा, रंगघर या नावाने असलेले क्रीडा व मनोरंजन गृह, तलातल गृह नावाचा एक आगळा किल्ला अशा अनेक ऐतिहासिक स्थळांना या शहरात भेटी देता येतात.

यातील तलातल गृह हा किल्ला जमिनीखाली 7 मजले बांधकाम असलेला आहे. जमिनीवर केवळ एक मजला असलेल्या या किल्ल्याची निर्मिती शत्रूच्या आक्रमणापासून राजवंशाचा बचाव करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात येते. अनेक फसवे रस्ते व शत्रूला खिंडीत गाठण्यासाठी असलेल्या विशेष जागा याशिवाय जमिनीखाली सातव्या मजल्यापर्यंत असलेले निवास कक्ष आजही स्थापत्यविशारदांना थक्क करते. कारण जमिनीखाली इतक्या खोल असलेले बांधकाम जवळपास तीनशे वर्षे भक्कम उभे आहे. आजही आपण जमिनीखाली तिसर्‍या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. तळघरांमध्ये देखील वायूविजनची उत्कृष्ट सोय आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अंतर्गत विहिरी असल्या तरी या पाण्यामुळे बांधकामाला अजिबात धोका पोहोचलेला नाही. भारत हा मागासांचा देश अशी धारणा आपल्या आंग्लाळलेल्या बुद्धीजीवी वर्गाने करून घेतली आहे. अशा ठिकाणांना अधूूनमधून भेटी दिल्यावर आपल्या पूर्वर्जांनी आपल्याकरिता ज्ञानाचा केवढा मोठा खजिना मागे ठेवला आहे, याचा बोध होतो.

आसामधील आमचा शेवटचा टप्पा गोलाघाट शहराचा होता. आसाममधील हे सर्वात मध्यवर्ती शहर असून, शिवसागरकडून नागालँडकडे जाताना वाटेत आम्ही काही वेळासाठी या ठिकाणी थांबलो होतो. मध्यवर्ती शहर असल्यामुळे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक वस्तू या ठिकाणी स्वस्तात विकत घेता येतात. याच शहरात असलेली कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राची शाळा देखील पाहिली. ईशान्येतील राज्यांमध्ये असलेला अलगाववाद कमी करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्‍या काही देशप्रेमी संघटनांपैकी विवेकानंद केंद्र एक अग्रणी संस्था आहे. युगपुरूष स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळी सरकार्यवाह राहिलेले एकनाथ रानडे यांच्या स्वप्नांतून साकार झालेली ही संघटना ईशान्य भारतात अनेक प्रकारची सेवाकार्ये राबविते. अगदी महाराष्ट्र-तामिळनाडूपासून या शाळेत शिकविण्यासाठी आलेले शिक्षक काही आकर्षक वेतनांमुळे या ठिकाणी आकर्षित झालेले नाहीत. तर एका उदात्त ध्येयाने भौतिक सुखे नाकारून ही मंडळी या शाळा चालवित आहेत. मिशनरीजच्या शाळांबद्दल कौतुकाचे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र अशी विद्यालये पाहिली की, आपल्या देशात हिंदूंनी देखील किती कष्टाने व अजिबात गाजावाजा न करता सेवाकार्ये चालविली आहेत, याचा साक्षात्कार होतो.  


आसाममध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. पण वेळेअभावी अनेक ठिकाणी जाता आले नाही. महाभारतकालीन अनेक स्थळे या भागात आजही आहेत. असूर सम्राट बळीचा मुलगा व महान शिवभक्त बाण याची शोणीतपूर म्हणजे आजचे तेजपूर शहर होय. याठिकाणी आजही हरि-हर युद्धाच्या स्मृती जपल्या जातात. मानस अभयारण्य देखील काझीरंगासारखे एक सुंदर ठिकाण आहे. शिवाय आसपास अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

आसाम हे हवाई, रस्ते व लोहमार्ग या तिन्ही पद्धतीने मुख्य भारताशी जोडलेले आहे. अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड ही त्याची शेजारी राज्ये असून, भूतान व बांग्लादेश हे दोन शेजारी आसामलाच लागून आहेत. मुंबईकर या ठिकाणी विमानाने गेल्यास प्रवासाचा वेळ फिरण्यासाठी वापरता येऊ शकतो. कारण रेल्वेने गेल्यास किमान तीन दिवसांचा कालावधी गुवाहाटी येथे पोहोचण्यास लागतो. आमचा दौरा पुढे मेघालय, नागालँड व मणीपूर राज्ये असा होता. पुढील काही लेखांतून याही राज्यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

-          प्रणव भोंदे









प्रिय सुजीत, आम्हाला क्षमा कर !!

उमद्या वयात तुला या जगाचा हकनाक निरोप घ्यावा लागला. आज तुझी हत्या झाली आणि त्या बातमीसोबत आलेला तुझा हसरा फोटो अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवून गेला.

तू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असणे, हीच तुझी चूक होती. आपल्या या भारतमातेसाठी जगण्याची, तिच्या उत्कर्षासाठी काही करण्याची स्वप्ने बाळगण्याचा गंभीर गुन्हा तुझ्या हातून घडला. परिणामी तुला अकाली मृत्यू पत्करावा लागला !!

अर्थात तुझ्या हत्येच्या निषेधार्थ कोणताही साहित्यिक पुरस्कार वापसी करणार नाही. कारण तू 'अखलाक' नाहीस. कोणत्याही अभिनेत्याची पत्नी त्याला देश सोडून जायचे सुचवणार नाही. कारण तुझ्या हत्येत अनैसर्गिक आणि भीती वाटावी, असे काहीच नाही. देशभर हिंसक मोर्चे निघणार नाहीत. कारण तू तथाकथित दलित नाहीस.

अरविंद केजरीवाल व राहुल गांधी तुझ्या कुटुंबाची भेट घेणार नाहीत किंवा सोनिया तुझ्या आईला सांत्वनाचे पत्रही पाठवणार नाहीत. कारण तुझ्यामुळे कोणतीही व्होटबँक त्यांना लाभणार नाही. तुझ्या नावाने कोणत्याही रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार नाहीत. कारण तू 'इशरत जहां' नाहीस. जे.एन.यू. मधील विद्यार्थी आणि शिक्षक तुझ्यासाठी संप पुकारणार नाहीत. कारण तू संसदेवर हल्ला करणारा 'अफझल गुरू' किंवा शेकडो निरपराध नागरिकांची हत्या करणारा 'याकुब मेमन' नाहीस.

पण एक नक्की की, तुझे हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. तू ज्या भारतमातेसाठी हे मरण पत्करलेस, तिच्या उत्कर्षासाठी आम्ही तन-मन-धन पूर्वक कार्यरत राहू.

Sad NEWS
A 27-year-old RSS worker was hacked to death in front of his aged parents at Papinesseri in Kannur district, police said. Sujit, who suffered serious injuries in the attack, succumbed to injuries before reaching hospital last night.


- प्रणव भोंदे


अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. खरेतर टिकेकर हे पत्रकार म्हणून आमच्या पिढीचे आजोबाच ठरतील. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचे वगैरे प्रसंग आम्ही नक्कीच सांगू शकणार नाही. पण गेल्या ५ वर्षांत अवचितपणे त्यांना भेटण्याच्या, काही वेळ त्यांच्या सहवासात राहण्याच्या संधी नक्कीच मिळाल्या होत्या.

पुण्यातील 'प्रबोधन मंच' नावाच्या संस्थेने प्रसारमाध्यम विषयावर एक परिषद आयोजित केली होती. संस्थेचे प्रमुख हरिभाऊ मिरासदार आणि त्यांचे सहकारी व हिंदुस्थान समाचारचे तत्कालीन ब्यूरो चीफ अरुण करमरकर असे दोघे जण टिकेकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बांद्र्याच्या घरी जाणार होते. अरूणजींनी मला सोबत येतोस का विचारले. मी आनंदाने त्यांच्यासोबत टिकेकरांच्या घरी गेलो. आम्ही पोचलो तेव्हा त्यांचे अभ्यासिकेत काहीतरी काम सुरू असावे. थोड्याच वेळात ते बाहेर आले. प्रत्येकाची ओळख करून काहीना काही मिश्कील टिपण्णी केली. हरिभाऊंचे बंधू म्हणजे प्रख्यात विनोदी लेखक द.मा.मिरासदार. त्यामुळे पुढचा काही वेळ द.मा.यांच्या आठवणी जागवण्यात गेल्या. पुढे हरिभाऊ यांनी 'प्रबोधन मंच' आयोजित परिषदेची माहिती सांगितली. टिकेकरांनी त्यातील प्रत्येक विषय व इतर वक्त्यांची माहिती घेऊन, त्या प्रत्येक विषयावर काही सूचना केल्या. अर्थातच त्यांनी त्या परिषदेत बीजभाषण करण्याचे आमंत्रण स्वीकारले.

पुढे त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. अर्थात गाडी त्यांची, चालकही त्यांच्यासोबत होताच आणि माझ्यापेक्षाही पुण्याची माहिती त्यांनाच अधिक होती. थोडक्यात मी त्यांना नव्हे तर ते मला घेऊन पुण्याला जाणार होते. आदल्या दिवशी त्यांना फोन करून घाबरतच विचारले की, माझ्यासोबत आणखी एक तरूण पत्रकार (संकेत सातोपे) पुण्याला येणार आहे. तो आपल्यासोबत आला तर चालेल ना? "आमच्या गाडीत मावणारा असेल तर काहीच हरकत नाही," असा मिश्कील होकार समोरून मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी पोहोचलो आणि आमचा प्रवास सुरू झाला.

प्रवासाची आठवण म्हणजे टिकेकर यांचे अखंड धुम्रपान (त्यामुळे आमची झालेली घुसमट), बालभारतीमधील निवडक कवितांची त्यांनी बनवून घेतलेली सीडी सोबतीला होतीच. प्रत्येक कविता ऐकल्यानंतर आमची परीक्षा व्हायची. ही कविता कोणाची? कितवीच्या पुस्तकात होती? इत्यादी प्रश्न विचारून त्याची उत्तरे सुद्धा तेच देत होते. सोबत कवितेचे सार्थ रसग्रहण सुरू होतेच. दरम्यान लोणावळ्याजवळ फूड मॉलमध्ये विश्रांती थांबा झाला. त्यांनी फक्त चहाच घेतला तरी आम्हाला मात्र पोटभर नाश्ता करायला लावले. परिषदेच्या आयोजकांनी अशा वरखर्चासाठी दिलेले पैसे काढल्यावर आम्हाला चांगलाच ओरडा पडला. पुढचा प्रवास पत्रकारिता विषयक धड्यांचा होता. त्यात टिकेकरांच्या विविध आठवणी, काही मोठ्या राजकीय नेत्यांबाबतचे प्रसंग, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेली संपादकीय जुगलबंदी इत्यादी अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

संपादक म्हणजे वातानुकुलीत खोलीत बसून आपल्याला वाटेल ते लिहिणारा व्यक्ती नव्हे, तर अत्यंत अभ्यासू, समाजातील प्रत्येक सूक्ष्म प्रवाहांची बित्तंबातमी असलेला आणि त्याविषयी तटस्थ मत असलेला मान्यवर असतो, हे ऐकले होते. टिकेकरांच्या रूपाने असा साक्षेपी संपादक प्रथमच पाहात होतो. एका विद्वान व्यक्तीबरोबर प्रवास करण्याची, सलग ३-४ तास सोबत राहण्याची आमची पहिली वेळ होती. स्वाभाविकच आमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण त्यांना जाणवला असावा. ज्या सहजतेने, एका मित्राप्रमाणे त्यांनी आमच्याशी संवाद साधला तो खरोखरीच संस्मरणीय होता.

पुढील काळातही २-३ प्रसंगांत टिकेकरांना भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक भेटीची स्वतंत्र आठवण आहे. अशा व्यक्ती होणे नाही हेच खरे. मन:पूर्वक श्रद्धांजली.


- प्रणव भोंदे