सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, February 18, 2016

धरले तर चावते.... तरीही !!



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्याबद्दल, चांगले अगर वाईट बोलावे, असे काहीही नाही. रशियाशी पूर्वीचे असलेले घट्ट संबंध गेल्या काही वर्षात उतरणीला लागले आहेत. तेव्हा पंतप्रधानांच्या या औपचारिक भेटीतून खूप काही साधेल, असे नाही.एखाद्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकाने अशी प्रतिक्रिया दिली असती तर इतके नवल वाटले नसते. मात्र ही विधाने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील उप-विरोधीपक्षनेते आनंद शर्मा यांनी मोदी रशिया दौऱ्यावर असताना दिल्लीत झालेल्या दैनंदिन पत्रपरिषदेत केली होती. अर्थात राजकीय धक्कातंत्रात तरबेज असलेल्या मोदींनी शर्मा यांना आपल्यावर टीका करण्याची संधी पुढील दोनच दिवसात देऊ केली. रशियातून मोदी रवाना झाले ते अफगाणिस्तानची राजधानी काबूलकडे. तेथे भारताच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या अफगाणिस्तानच्या नव्या संसदभवनाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तान संसदेच्या दोन्ही सदनातील सदस्यांना एका संयुक्त सभेत संबोधित करताना भारत-अफगाणिस्तान दरम्यान असलेले मधुर संबंध काही जणांना पाहवत नसले तरी, सर्व अडचणींवर मात करून आम्ही आमचे चांगले संबंध टिकवून ठेवू, असे प्रतिपादित केले. यातील काही जणांनाहा उल्लेख अर्थातच पाकिस्तानला उद्देशून केला गेला होता.

यानंतर काही वेळातच मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केले की, काबूलहून दिल्लीला परतत असताना मी पाकिस्तानातील लाहोर येथे पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटणार आहे. पुढील २ तासात मोदी खरोखरीच लाहोरमधील शरीफ यांच्या हवेलीवर त्यांच्याशी दोस्ताना वाढवत असल्याचे संपूर्ण जगणे पाहिले. पुढील महानाट्य आणि राजकीय क्रिया-प्रतिक्रिया आपण सर्वांनीच ऐकल्या-वाचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील पठाणकोट येथे असलेल्या भारतीय हवाईदलाच्या तळावर झालेला हल्ला आणि त्याचे होणारे विश्लेषण सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. 

पठाणकोट हवाईतळ हा पाकिस्तानजवळच असलेल्या आंतराष्ट्रीय सीमेवर असल्यामुळे त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. १९६५ च्या भारत-पाक युद्धात सुद्धा पाक लष्कराने या तळावर हल्ले केले आहेत. मात्र गेल्या ६ महिन्यांत पंजाबात झालेला हा दुसरा अतिरेकी हल्ला असून, तो साधारण एकाच पद्धतीने झाला आहे. यापूर्वीचा हल्ला गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर झाला. त्यावेळी २४ तासांच्या आतच पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई करून हा हल्ला आटोक्यात आणला होता. पठाणकोट हल्ल्यापूर्वी
 याच दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाचे अपहरण करून त्यांना पुन्हा २४ तासांच्या आत सुखरूप सोडले होते. पाठोपाठ याच अतिरेक्यांनी पठाणकोट  हवाईतळावर हल्ला केल्याचे बोलले जाते. जवळपास ४८ तास उलटून गेल्यावर हा लेख लिहून होईपर्यंत या परिसरात धुमश्चक्री सुरूच आहे. केंद्रिय गृहमंत्री ते लष्करी अधिकारी अनेकदा पत्रकारांना सामोरे जात असून, कारवाई जवळपास संपली असून, आता कोणी दहशवादी या तळावर नाहीत ना, याची छाननी सुरू असल्याचे सांगत असतानाच नवीन चकमकीला तोंड फुटल्याचे वृत्त येऊन धडकते आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत ७ लष्करी जवान मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात असून, दहापेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. याउलट अधिकृत माहितीनुसार केवळ ४ अतिरेकीच तब्बल ४८ तासानंतर ठार झाल्याचे समजते.

गेल्या २ दिवसात अफगाणिस्तानमधील भारतीय दुतावासावर देखील २ आत्मघातकी हल्ले झाले आहेत. दोन्ही हल्ले यशस्वीपणे परतवून लावले गेले असले तरी सर्वसामान्य नागरिक देखील या एकूण घटनाक्रमामुळे अत्यंत उद्विग्न झाले आहेत. स्वाभाविकच सोशल मीडियामध्ये याचे प्रतिबिंब उमटले असून, केंद्र सरकार, विशेषत: पंतप्रधान मोदी सर्वांचे लक्ष्य ठरले आहेत. लालूप्रसाद यादव या इतरवेळी वाचाळ असलेल्या नेत्याचा अपवाद सोडला तर जवळपास सर्व विरोधी पक्ष आणि शिवसेना, अकाली दलासारखे मित्रपक्ष देखील या निमित्ताने केंद्राच्या धोरणांवर टीका करीत आहेत. मोदींनी नुकत्याच केलेल्या पाकिस्तान यात्रेचे हे फलित असण्यावर बहुतांश सामान्यजन आणि विशेषज्ञ यांचे एकमत आहे. हा किंवा असा हल्ला होणार हे पूर्वीपासून ठावूक असल्याचे व त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजल्यामुळे हल्ल्याचे मूळ लक्ष्य अतिरेकी यशस्वी करू शकले नसल्याचेही बोलले जाते. मग या घटनाक्रमाकडे आपण कसे बघायचे?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्तापर्यंत मिळालेल्या सज्जड पुराव्यांवरून हे सिद्ध होते आहे की, पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर संस्था आय.एस.आय. यांनी संयुक्तपणे हे भारतविरोधी अभियान राबविले आहे. या हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट भारत आणि विशेषत: पाक सरकारला हा इशारा देणे आहे की, पाक लष्कराच्या मर्जीशिवाय तुम्हा दोन्ही देशांचे संबंध कसे असावेत, हे ठरणार नाही. अफगाणिस्तान हल्ल्यातून तर हे स्पष्टच होते की, भारत- अफगाणिस्तान एकत्र येणे हे पाक लष्कराला अजिबात मान्य होणारे नाही. थोडक्यात पाक लष्कराने जे ठरवले असेल तेच होईल. अर्थात हे सगळे अजिबात आश्चर्य वाटण्याजोगे नाही. हे यातील सर्वच घटकांना अपेक्षितच होते. मात्र यातील तीन कंगोरे आपल्या नजरेतून सुटता कामा नयेत. पठाणकोट हल्ल्याच्या दिवशीच पाक लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी २०१६ अखेरपर्यंत पाकिस्तान संपूर्ण दहशवादमुक्त झाले असेल, असे विधान केले आहे. तर याच सुमारास पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया देताना दक्षिण आशियातील दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी इतर देशांना (अप्रत्यक्षपणे भारताला देखील) आम्ही सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर भारतीय गृह, संरक्षण व विदेश मंत्रालयांनी पठाणकोट हल्ल्यासाठी थेट पाकिस्तानला (म्हणजे देश या अर्थी) जबाबदार न ठरवता पाकिस्तानी लष्कर व आय.एस.आय. चा या हल्ल्यातील सहभाग अप्रत्यक्षपणे बोलून दाखवला आहे आणि निदान आत्तापर्यंत तरी पाकिस्तानी लोकनियुक्त सरकारशी आपल्या अधिकृत चर्चा सध्या तरी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण या घटनाक्रमांत प्रत्येकाने आपापल्या भूमिका ठामपणे मांडल्या असून, भविष्यातील भारतीय उपखंडातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याची ही नांदीच आहे. भारत सरकार गेल्या वर्षभरात अनेक आघाड्यांवर आपली सामरिक भूमिका निर्णायकपणे अमलात आणत आहे. त्यात भारतीय उपखंडातील आपल्या शेजाऱ्यांशी असलेले संबंध सुधारून त्यांना चीनच्या आहारी जावू न देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. श्रीलंका, म्यानमार, भूतान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशांचा आपल्याला अद्याप तरी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असूनआपल्या कूटनीतीचे हे ठळक यश आहे. मालदीव मात्र अजूनही आपल्या नियंत्रणात नसून नेपाळशी आपले संबंध भूकंप आणि मधेशी आंदोलनामुळे पणाला लागल्याचे दिसत आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून ते संबंध पुन्हा सुरळीत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. थोडक्यात या आघाडीवर आपली कूटनीती निदान काठावर तरी उत्तीर्ण होत आहे. पाकिस्तानबाबत मात्र यातील कोणताही निष्कर्ष घाईने काढता येणार नाही.

कारण पाकिस्तान आणि भारतात (निदान दाखविण्यापुरता ) असलेला संघर्ष काश्मीरवरून आहे आणि त्यावर निर्णायक भूमिका घेणे दोन्ही देशांना सोयीचे नाही. त्यामुळे भारतीय गोटातून पाकिस्तानविषयी बहुपदरी रणनीती ठरविण्यात आल्याचे जाणवते. त्यात एकीकडे पाकिस्तानमधील लोकशाही तत्वांशी चर्चा करून त्यांना वादग्रस्त मुद्यांशिवाय इतर समान मुद्यांवर एकत्र काम करायला लावण्यास  राजी करण्याची खटपट सुरू आहे. मोदींचा ताजा दौरा त्याच अनुषंगाने असल्याचे तज्ञांचे मत आहे. तर दुसरीकडे पाक लष्कराच्या नापाकहरकतींना वेसण घालण्यासाठी आंतराष्ट्रीय मंचावर त्यांची कोंडी करणे, भारतात गेल्या काही वर्षात पेरलेले आणि पोसलेले पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे डीप असेट्ससंपवणे आणि पाकिस्तानातील फुटीरतावादी गटांना त्यांच्याच लष्कराविरुद्ध चिथावणी देणे असा डावपेच आखल्याचे दिसत आहे. याशिवाय भारताची युद्धसज्जता वाढविणे, हेरयंत्रणा आणखी सक्षम करून अतिरेकी हल्ल्यांना पायबंद घालणे व पाक लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केल्यास त्यांना यथास्थित प्रत्युत्तर देणे ही सुद्धा गेल्या दीड वर्षातील आपल्या धोरणकर्त्यांची काही गणिते असल्याचे अभ्यासकांना जाणवते.

मग या  सर्व रणनीतीचे काही फलित दिसते आहे काय? याचे उत्तर अर्थातच होकारार्थी आहे. ताझीकीस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नुकताच झालेला तापीहा उर्जाकरार आपल्या रणनीतीकारांच्या पहिल्या धोरणाचे प्रातिनिधिक यश ठरावे. खरेतर ही योजना काँग्रेसप्रणित संपुआ सरकारने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात रेटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. त्या मंत्रिमंडळात अनेक पाकधार्जिणे मंत्री असूनही त्यांना असा करार करण्यासाठी पाकचे मन वळवता आले नाही, हे येथे

विशेष उल्लेखनीय ठरावे. मोदी पाकिस्तानात जाऊन आल्यावर एक अशी वदंता होती की, भारतीय पोलाद उद्योगाला अफगाणिस्तानमधील खाणींमधून काढलेले पोलाद कराची बंदरातून भारतात आणण्यास परवानगी देण्यासाठीच मोदींनी हा पाक दौरा केला. अर्थात या बातम्या मोदींना बदनाम करण्यासाठीच पेरल्या असल्या तरी याची दुसरी बाजू आर्थिक अंगानेच पाहावी लागेल. जर खरोखरीच असा करार अस्तित्वात आला तर भारतीय पोलाद उद्योगाला आणि त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेला बराच लाभ मिळू शकतो. मात्र सध्या तरी असा करार होण्याची अधिकृत बातमी नाही. थोडक्यात आर्थिक अनुनायातून दोन्ही देशांचे भले होणार असेल तर दूरदृष्टीने याचे स्वागतच केले पाहिजे. चीन आणि जापान या दोन शत्रूदेशांत सुद्धा असा व्यापार वर्षानुवर्षे व त्यांच्या संबधात कितीही तणाव असला तरी सुरू आहे, हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे.

मोदींचे परराष्ट्र दौरे हा आपल्याकडे थट्टेचा विषय असला तरी आंतराष्ट्रीय समुदाय त्यांना गंभीरपणे घेतो. मोदींनी पाकिस्तान व चीनची कोंडी करण्यासाठी आपल्या या दौऱ्यांचा यथासांग उपयोग केला असून, त्याचे दृश्यस्वरूप विवेकी व अभ्यासू लोकांच्या निदर्शनास येत आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान मिळण्यासाठी भारत विविध देशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामुळे सर्वाधिक अडचण पाकिस्तान व चीनचीच होणार असल्यामुळे हे दोन्ही देश त्यांच्या अल्ला आणि माओला (देवाला या अर्थी) पाण्यात बुडवून बसले आहेत. मात्र भारताचा हा दावा दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होताना दिसतो आहे. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला फटकारण्याची अथवा अनुल्लेखाने मारण्याची एकही संधी मोदी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सोडत नाहीत. याही बाबतीत पाक केवळ थयथयाट करतो व इतर देश त्यात हस्तक्षेप न करता हा फुकटचा तमाशा बघतात. अमेरिका, ब्रिटन, दुबई, फ्रान्स आणि जर्मनीचे लोकनिर्वाचित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि प्रमुख नेते खाजगीत व जाहीरपणे पाकिस्तानला कानपिचक्या देऊ लागले असल्याचे आश्वासक चित्र दिसते आहे. यातील दुबई व ब्रिटन दाऊदची संपत्ती गोठवत असून, अमेरिका हाफिझ सईद व हक्कानी नेटवर्कला पोखरण्याच्या मागे आहे. एकूण भारताला केवळ सहानुभूती दाखवणे, इतकीच पारंपारिक नीती या देशांनी स्वीकारली नसून, त्यांच्याकडून पाकिस्तानी लष्कराची कोंडी सुरू झाली आहे. यातूनच या देशांनी भारताला पाकिस्तानच्या लोकनियुक्त सरकारशी चर्चा सुरू ठेवून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितल्याचे बोलले जाते. तसे असेल तरी ते तार्किक आणि आवश्यकच आहे. मात्र आता पाश्चात्य सांगतील तसे आम्ही झुकणार नाही. आमच्या चिंतांचा तुम्हाला कृतीरूप विचार करावा लागेल. अन्यथा तुम्ही तटस्थ राहा. आम्ही आमचे बघतो, असे संदेश भारतीय गोटातून थेटपणे जावू लागले आहेत. अर्थात पाकिस्तान-चीनची अघोरी युती व पाश्चात्य देशांचा स्वार्थी दृष्टीकोन ही आव्हाने कायम आहेत. त्यावरही उत्तरे शोधण्याची मानसिकता आता भारतीय धोरणकर्त्यांना बाळगावी लागेल.

पाकिस्ताबाबतच्या भारताच्या धोरणाचा तिसरा कंगोरा मात्र काहीसा अस्पष्ट आहे. कारण यावर कोणताही पक्ष कधीच थेटपणे बोलून त्याची जबाबदारी स्वीकारत नसतो. त्यामुळे पाक लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केल्यावर त्यांना देण्यात येणारे जोरदार प्रत्युत्तर, पाकिस्तानने आपल्याकडे घरभेद करून उभे केलेल्या हेर यंत्रणेला उध्वस्त करणे, हुर्रियत गटांना बाजूला सारून दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची झालेली त्रयस्थ ठिकाणी भेट, संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशन सुरू असतानाच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने पाकविरुद्ध जाहीर उठाव करून, भारताच्या समर्थनार्थ घोषणा देणे व त्याला जागतिक माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी देणे, भारतीय काश्मीरमधील अलगाववाद्यांचा आवाज दिवसेंदिवस क्षीण होणे, पाकिस्तानातील बलुचिस्तान व इतर सीमाप्रांतात तालिबानचेच काही गट पाक लष्कराच्या विरोधात जाणे, हे प्रांत पाकिस्तानातून वेगळे होणार की काय अशा वावड्या पाकिस्तानाच उठणे, पाकिस्तानातील काही राजकीय पक्षांवर ते भारताच्या सांगण्यावरून काम करीत असल्याचे जाहीर आरोप होणे, दाऊद आणि सईदला अतिरिक्त सुरक्षा देऊन त्यांना भूमिगत करणे, पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतीय भूमीत जिवंत पकडणे व त्यांना आंतराष्ट्रीय समुदायांसमोर आणून पाकिस्ताला कोंडीत पकडणे, नेपाळशी संबध ताणले गेले असतानाही तेथून पाकिस्तानच्या एका प्रमुख हेराला अटक करणे, कट्टर भारतविरोधी म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान चक्क भारताच्या पंतप्रधानांची भेट घ्यायला दिल्लीत येणे, पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अजीज यांचे अधिकार अचानक कमी होऊन त्यांना केवळ विदेश धोरणांचे सल्लागार म्हणून नियुक्त करणे, नवाझ शरीफ यांनी आपल्या मंत्र्यांना भारतविरोधी वक्तव्य न करण्याची ताकीद देणे, हे सर्व योगायोग नसतात. अर्थात याची चर्चा देखील विवेकानेच झाली पाहिजे.

वरील सर्व विश्लेषण नरेंद्र मोदींच्या पाकबाबतच्या धोरणाला शंभर टक्के योग्य ठरविण्यासाठी अजिबातच नाही. कारण सामरिक व परराष्ट्र धोरणे आखताना होणारी व्यूहरचना अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रवाही असते. दोन देशांबाबतचे नवे धोरण आखताना जुन्या धोरणाला संपूर्ण छेद कधीच देता येत नाही, भारताने इस्रायलशी संबंध जोडताना बाकी अरब राष्ट्रांशी असलेले संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घेणे जसे अभिप्रेत असते, तसेच आपल्या पूर्वसुरींनी पाकिस्तानविषयी घेतलेल्या भूमिका आणि आखलेली धोरणे संपूर्ण बदलण्याचा वेडेपणा कोणताही जबाबदार पंतप्रधान करणार नाही. मोदींनी देखील तसा तो केलेला नसला तरी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान बनण्यापूर्वी त्यांनीच जाहीर सभा व मुलाखतींमधून केलेली वक्तव्ये त्याचे विरोधक उद्धृत करीत असतात. अर्थात हा जरी पक्षीय राजकारणाचा अविभाज्य भाग असला तरी यापुढे मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या जाहीर वक्तव्यांबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार, हे नक्की.

पठाणकोट हल्ल्यामुळेही काही गंभीर प्रश्न उद्भवले आहेत. भारतीय लष्करातील अधिकारी व जवान इतक्या सहजपणे पाकिस्तानी हेरांच्या विविध आमिषांना बळी पडणे व त्यांना संवेदनशील माहिती पुरविणे ही चिंतेची बाब आहे. तसेच ६ महिन्यांपूर्वी झालेल्या गुरुदासपूर हल्ल्याची किंवा पठाणकोट हल्ल्यापूर्वी झालेल्या पोलीस अधीक्षकाच्या अपहरणाची चौकशी व तपास अर्धवट कसा काय राहिला? गुप्तचर विभागाने पूर्वसूचना देऊन आणि पुरेसा बंदोबस्त ठेवून देखील अतिरेकी चक्क लष्करी गणवेशात एका महत्वाच्या हवाई तळावर कसे घुसले? जेमतेम ४ अतिरेक्यांना कंठस्नान घालताना आपले ७ जवान (त्यातील एक तर गरूड कमांडो) धारातीर्थी पडणे सोयीचे आहे काय? देशाचे गृहमंत्री व संरक्षणमंत्री यांनी कारवाई संपल्याचे जाहीर केल्यावर तब्बल १२ तासांनी हवाईतळाच्या अंतर्गत क्षेत्रातच पुन्हा चकमकी होतात. यातून जनतेत काय संदेश गेला असावा?

इतक्या संवेदनशील ठिकाणी कारवाई सुरू असतानाही काही प्रसारमाध्यमे त्याची छायाचित्रे आणि चलत्चित्रे कशी मिळवू शकतात? पंजाबात सातत्याने असे हल्ले घडविणारे दहशवादी नेमके कोठून येतात? अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल या निमित्ताने केंद्र सरकारला करावी लागणार आहे. अशा हल्ल्यांना तोंड देताना केवळ बचावात्मक व्यूहरचना करण्यापेक्षा इतर पर्यायांची चाचपणी देखील करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वास्तवाचे भान ठेवून व गरज पडल्यास सर्व जागतिक दबाव झुगारून निर्वाणीच्या कारवाईसाठी आपल्या सुरक्षा यंत्रणा व अंतिमत: सामान्य जनतेची मानसिकता निर्माण करण्याचे अत्यंत अवघड आव्हान सरकारसमोर असणार आहे.

अरविंद केजरीवाल, राहुल गांधी असे पोपटपंची करणारे कुपमंडूक राजकीय नेते या देशात असले तरी विरोधी पक्षांमध्ये देखील अनुभवी व देशप्रेमी नेते शिल्लक आहेत. त्यांचा सल्ला व मदत घेणे हे आवश्यक असेल तर केंद्रातील नेत्यांनी नम्रपणा दाखवला पाहिजे. युद्ध हा अंतिम पर्याय नाही आणि दोन

अण्वस्त्रसज्ज देशांच्या बाबतीत तर नाहीच नाही. परंतु याशिवाय सुद्धा काही निर्वाणीचे मार्ग असू शकतात, याची जाणीव नरेंद्र मोदी, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अजित डोवल व आपल्या इतर धुरिणांना निश्चितच आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे व सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या नेत्यांनी देखील थोडी सबुरी दाखविली पाहिजे, हे देखील महत्वाचे.

गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या एका महान साधूला नदीच्या प्रवाहात एक विंचू गटांगळ्या खाताना दिसला. त्या साधूने विंचवाचा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या ओंजळीत घेतले. विंचवाने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे त्यांना दंश केला व त्यामुळे तो त्यांच्या ओंजळीतून निसटला. त्या साधूने मोठ्या निर्धाराने वारंवार होणारे दंश सहन करूनही विंचवाला बुडण्यापासून वाचविले. त्या प्रख्यात साधूचे नाव श्री रामकृष्ण परमहंस असे होते. अत्यंत कठीण आव्हानांना निर्धाराने सामोरे जावून त्यातून यश मिळवतात, त्यांनाच लोक भविष्यातही लक्षात ठेवतात. श्रीरामकृष्णांच्या सत्शिष्याचा वारसा सांगणारे आपले पंतप्रधान देखील आपल्या कर्तव्याला जागून आणि कावेबाज टीकेच्या भडीमाराकडे दुर्लक्ष करून आपल्या देशाच्या सुरक्षा धोरणाची फेरआखणी करण्याची जबाबदारी नियतीने व मतदारांनी सोपविली आहे. ती यशस्वीपणे निभावून ते सामान्य जनतेला दिलासा देतील, असा विश्वास आपण बाळगू.   

-          प्रणव भोंदे 





बलीप्रतिपदा : समज-गैरसमज


सम्राट बळी हा शेतकऱ्यांचा राजा कसा?

दिवाळी म्हणजे उत्साह आणि चैतन्य. पारंपारिक सणांमध्येही दीपावलीचे महत्व अनन्यसाधारण आहे. सुबत्ताशांती आणि आध्यात्मिक प्रगतीची सांगड घालणारा हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ढोबळमानाने जगातील सर्वच सण-उत्सव हे तेथील धार्मिक परंपराऐतिहासिक घटना किंवा स्थानिक संस्कृतीशी निगडीत असतात. भारतातही स्वाभाविकपणे तसेच आहे. या हिंदूबहुल देशातील बरेच सण हे हिंदू परंपरांशी निगडीत असले तरीही नाताळईद सारखे सण सर्वधर्मीय मोठ्या उत्साहाने साजरे करतात. मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेसोबत आलेले हे सण जसे बहुतांश भारतीयांनी स्वीकारले आणि आज ते देखील जणू भारतीय सण झालेतसे दुर्दैवाने हिंदू सणांच्या बाबतीत घडत नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बलीप्रतिपदा या दिवसाच्या निमित्ताने चालेला विखारी प्रचार पाहिला की विचारी माणसांना याची खंत वाटल्याशिवाय रहात नाही.

बळीराजा हा एक अत्यंत न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्याच राज्यात प्रामुख्याने शेतकरी वर्गाची भरभराट झाली. मात्र ब्राम्हण व देवांना शेतकऱ्यांची ही भरभराट व त्यांचा राजा असलेल्या बळीचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्यांनी कट करून बटू वामनाच्या मदतीने बळीराजाचा काटा काढलाअशी एक मांडणी अतिशय कल्पकतेने केली जाते आणि तिला मी-मी म्हणविणारे विद्वान सुद्धा बळी पडताना आपण बघतो.

मुळात हे सगळे तर्क प्रामुख्याने आर्य-द्रविड सिद्धांताची अपत्ये आहेत. आर्य या भारताच्या बाहेरून आलेल्या प्रगत जमातीनेतुलनेने मागास अशा द्रविड या मूलनिवासींचा पराभव केला. हे आर्य म्हणजेच देव किंवा ब्राम्हण वंशीयांचे पूर्वज. ज्यांनी शेतकरीकष्टकरी म्हणजेच शूद्र समाजावर अत्याचार केलेअसे भ्रामक आणि आधुनिक इतिहास अभ्यासकांनी साफ खोटे ठरवलेले सिद्धांत दडपून सांगितले जातात. मग हिंदू पुराणेरामायण-महाभारतासारखे प्राचीन ग्रंथउपनिषदे यातील कथा-उपकथांतील सोयीस्कर भाग घेऊन अर्धवट मांडणी केली जाते. वामनपरशूराम आणि राम या ऐतिहासिक व्यक्तीमत्वांना अशा कारस्थानी वृत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे एकीकडे हिंदू पुराणे म्हणजे भाकडकथा असल्याचे ठासून सांगणारेच त्यातील कथांवर असे प्रश्नचिन्ह उभे करतात.

विष्णू हे हिंदूंच्या तीन मुख्य देवतांपैकी आणि कदाचित सर्वात लोकप्रिय दैवत असावे. या दैवताने सृष्टी कल्याणासाठी घेतलेले निरनिराळे अवतार हे दशावतार म्हणून ओळखले जातात. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताशी बऱ्यापैकी मिळतेजुळते असणारे हे अवतार हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहेत. त्यामुळे याच अवतारांना लक्ष्य करून समाजाचा बुद्धिभेद करण्याचे समाजकंटकांचे प्रयत्न असतात. दुर्दैवाने घट्ट जातीय उतरंडीमुळे हजारो वर्षे अन्याय झालेल्या दलित समाजात असे गैरसमज पसरविणे सोपे असते. दलित समाज किंवा मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याबद्दल कोणत्याही विवेकी व्यक्तीचे दुमत असू शकत नाही. मात्र त्यासाठी कथित सवर्ण समाजाविरोधात सातत्याने चिथावणी देणे सुद्धा हितावह नसते. त्यातून समाजात नेहमीच एक दरी राहतेकिंबहुना अशी दरी निर्माण व्हावी किंवा वाढावी असे वाटणारेच अपसमजांना खतपाणी घालतात.

बळी हा बहुजनांचा राजा होता असे विधान सर्रास केले जाते. मुळात वर्णव्यवस्था ही कर्माधीष्ठीत होती. राजा हा राज्याचा पालकशासक आणि संरक्षक या भूमिकेत असल्यामुळे तो कोणत्याही (अगदी रावणासारखा जन्माने ब्राम्हणवर्णाचा असला तरीही) वर्णाचा असला तरी त्याला क्षत्रिय समजले जाई. जर बहुजन म्हणजे शूद्र हेच अभिप्रेत असेलतर क्षत्रिय वर्णाचा राजा हा बहुजन समाजाचा कसा ठरू शकतोअर्थात मराठा चळवळ चालविणारे नेते बहुजनांची व्याख्या ब्राम्हणेतर समाज अशी करतात. पण तार्किकदृष्ट्या हे तरी खरे कसे मानायचेमध्ययुगीन इतिहास नीट पाहिला तर ब्राम्हण समाजाइतकीच क्षत्रिय (मराठा) समाजानेही शूद्र समाजावरील (दलित समाज) अन्यायात भागीदारी नोंदविली आहे. मुळात अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे. तो पाळणारे सगळेच दोषी इतकी परखड मांडणी सोयीची नसल्यामुळे मग इतिहास अर्धवट सांगून सत्य दडपले जाते.

मग प्रश्न उरतो की बळी कोण होताबळी हा विरोचनाचा पुत्रसुप्रसिद्ध विष्णूभक्त प्रल्हादाचा नातू आणि हिरण्यकश्यपू या असुरसम्राटाचा पणतू होता. इतकेच नव्हे तर पुढे महाभारत काळात बळीराजाचा मुलगा बाणासुर देखील दिसतो. असूर हा शब्द मूळ संस्कृत आहे. सूर (देव) या शब्दाचा विरुद्ध अर्थ असूर असा नव्हे तर असूर म्हणजे वीर्यवान किंवा प्राणशक्ती असणारा होय. वेदांमध्ये काही ठिकाणी देवराज इंद्राला देखील असूर’ म्हणून गौरविले आहे. गंमत म्हणजे देवअसुरनाग आणि मानव हे सर्वच कश्यप ऋषींचे पुत्र होते. ब्रम्हदेवाने सृष्टीनिर्मिती केल्यानंतर त्यांचे मानसपुत्र मरीचि ऋषींपासून कश्यपाचा जन्म झाला. कश्यपाने दक्ष या प्रजापतीच्या (गौरीचा पिता आणि शंकराचा सासरा) १७ मुलींशी विवाह केला. ज्यातील अदिती या पत्नीपासून आदित्य. इंद्र आणि आपल्या लेखातील वामन या विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. दिती पासून दैत्यदनु पासून दानवअनिष्ठापासून गंधर्वसुरसापासून राक्षसमुनिपासून अप्सराविनता पासून गरुड आणि अरुण (सूर्याचा सारथी)कद्रूपासून नागयाशिवाय काष्ठाइलाक्रोधवशासुरभिसरमाताम्रातिमिपतंगीयामिनी या इतर पत्नी होत. उर्वरित समस्त जीवसृष्टी यांच्यापासून निर्माण झाली असे उल्लेख वेदपुराणे आणि ब्राम्हण्ये यांमध्ये मिळतात.

थोडक्यात ही कथा सत्य मानली तर वरील सर्व वंश एकाच व्यक्तीपासून सुरू झाले असे मानावे लागेल आणि जर ही कथा मान्य नसेल तर मग त्यातील सोयीची व्युत्पत्ती घेऊन आपल्याला हवे ते कुतर्क देणे तरी थांबले पाहिजे. आता मूळ बळीराजाच्या कथेकडे वळू. बळीराजाचा वंशवृक्ष पाहिला तर त्याचे पणजोबा हिरण्यकश्यपूआजोबा सुविख्यात विष्णूभक्त प्रल्हाद आणि वडील विरोचन हे होते. बळीराजाचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा सासरा होय. म्हणजे रामायणपूर्व काळ ते महाभारत युद्धोत्तर काळ एवढ्या प्रचंड दीर्घ कालावधीत बळीराजा किंवा त्याचा वंश डोकावतो. मग हा वंश कोणीतरी वेगळाशोषित किंवा अन्यायग्रस्त होता असे कसे मानायचे?

आता थेट बळीराजाचे चरित्र पाहू. भारतीय इतिहासातील अत्यंत न्यायप्रियप्रजाहितदक्षदानशूरसत्यवचनी आणि पराक्रमी राजांमध्ये बळीची गणना होते. हिरण्यकश्यपू हा देखील अतिशय पराक्रमी सम्राट होता. तत्कालीन बहुतांश भारत देशावर त्याची सत्ता असली तरी तो अतिशय एककल्ली आणि संशयी होता. प्रल्हाद आख्यानातून त्याचा हा संशयीपणा विशेषत्वाने डोकावतो. एवढे असले तरी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती असताना तिच्या सुरक्षेसाठी देवर्षी नारदाच्या आश्रमात हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून राहात होती. याचाच अर्थ देव आणि असुर यांच्यातील वैर हे वांशिक नव्हे तर सत्तानुषांगिक असावे. पुढे हिरण्यकश्यपूने आपलाच पुत्र प्रल्हाद याच्यावर अनेक अत्याचार केले. अखेर विष्णूने नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. यावेळी विष्णूने प्रल्हादाला वचन दिले कीयापुढे तुझ्या वंशातल्या कोणाचाही मी वध करणार नाही. विरोचनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र बळी आणि बाणासुर या दोघांनाही वामन आणि श्रीकृष्णाने विष्णूच्या वचनाचा मान राखून जिवंत ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी नातेसंबंध जोडले. 

बळी राजा आणि श्री शुक्राचार्य

बळीराजाने आपल्या कार्यकाळात तब्बल ९९ अश्वमेध यज्ञ केले. एक अश्वमेध यज्ञ सुमारे वर्षभर चालणारा असतो. याचाच अर्थ बळीने दीर्घकाळ पृथ्वीवर राज्य केले. या यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे यज्ञाची दीक्षा घेतल्यानंतर एक अश्व सोडला जायचा. हा अश्व ज्या राज्यांत जाईलत्यांनी एकतर यज्ञ करणाऱ्या सम्राटाचे मांडलिक व्हावेअथवा त्याच्या सैन्याशी युद्ध करून त्यांना पराभूत करावे. तब्बल ९९ यज्ञ करणाऱ्या बळीराजाला त्या दरम्यान कोणी आव्हान देणारे होतेअसे दिसत नाही. किंबहुना या काळात त्याचे देवांशी युद्ध झाल्याचीही नोंद नाही.

शंभरावा यज्ञ करताना मात्र बळीचा उद्देश स्वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित करणे हा होता. साहजिकच त्यामुळे देवांच्या गोटात चिंता पसरली. याचाच अर्थ तोपर्यंत देव आणि असुर या दोन्ही राज्यांत निकराची लढाई करणे दोन्ही पक्षांनी टाळले होते. आधुनिक भाषेत बोलायचे तर शक्ती संतुलन करून आपापले प्रभावक्षेत्र निर्माण करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश असावा. मात्र ९९ यज्ञ करून इतर असंख्य राजांना आपल्या कवेत घेणारा बळीराजा आता सामर्थ्यवान झाला होता आणि त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता नसल्यामुळे देवांनी ब्रम्हदेव आणि पुढे विष्णूकडे धाव घेऊन हस्तक्षेपाची विनंती केली. विष्णूने आपल्या पूर्वीच्या वचनाचे स्मरण ठेवून आणि बळीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन या बटूरूपाने अवतार घेतला. नेमका हाच संदर्भ आपल्या सोयीने वापरला जातो. वामन हा ब्राम्हण होता असा कांगावा करून त्याने शेतकऱ्यांच्या राजाला मारले असे सांगतात. पण असुर काय किंवा देव काय सगळे याच कश्यपाचे वंशज होते. म्हणजे वामन हा यांच्या सोयीने नव्हे तर कर्माने ब्राम्हण होता. तसेच बळीराजा हा कर्माने क्षत्रिय होता. हे दोघेही एकाच वंशात जन्माला आले होते. इतकेच नव्हे तर बळीराजाचा यज्ञ करणारे असुर कुलगुरु श्री शुक्राचार्य आणि इतर ऋत्विज हे ब्राम्हण नव्हते कायमग आपल्याला अर्धवट इतिहास का सांगितला जातो?

पुढे वामनाने बळीच्या यज्ञस्थानी येऊन बळीकडे दान मागितले. इतक्या तेजस्वी बटूला पाहून शुक्राचार्यांना तोच विष्णू असल्याचा संशय आला. त्यांनी तसे बळीला बोलून दाखवले. मात्र बळीने शुक्राचार्यांना सांगितले की, “प्रत्यक्ष भगवान विष्णू माझ्या द्वारी याचक म्हणून आले हाच माझा मोठा सन्मान आहे. मी त्यांना नकार देणार नाही.” वामनाने तीन पदे भूमी मागितली. जिचे दान बळीने देऊ नये म्हणून ब्राम्हण शुक्राचार्य बळीने उदक सोडण्यासाठी घेतलेल्या झारीत जाऊन बसले. वामनाने झारीच्या तोटीमध्ये दर्भ घालून शुक्राचार्यांना तेथून बाजूला केले आणि आपल्या हातावर उदक घेऊन बळीला आपले वाचन पाळण्यास सांगितले. म्हणजेच पुन्हा एकदा एक ब्राम्हण ऋषी बळीचे कथित अध:पतन टाळण्यासाठी झटला. मग आता कथित बहुजन नेते शुक्राचार्यांची पूजा करणार कागंमत म्हणजे समस्त पृथ्वीचा सम्राट इतका सहजपणे एका ब्राम्हण बटूच्या कपटाला भूलेलइतका भोळा असू शकेल काकिंबहुना त्याला समोर कोण आहे याची जाणीव होतीहे आपण सोयीस्करपणे कसे विसरू शकतोआणखी एक बाब म्हणजे हा सगळा प्रसंग सुरू असताना यज्ञमंडपात केवळ वामनशुक्राचार्य आणि बळी एवढेच नसणार. इतर राजेसरदार आणि अन्य मंडळी तिकडे असलीच पाहिजेत. त्यांनी बळीला आपल्या संकल्पापासून परावृत्त का केले नाहीकी सगळे क्षत्रिय आणि बहुजन मिळून वामनाला सामील झाले आणि त्यांनी बळीसारख्या महान राजाचा काटा काढलाअसे मानायचे?
वामनाने तीन पदे भूमी मागितली 

पुढे वामनाने भव्य रूप धारण करून पहिल्या पावलाने समस्त पृथ्वीदुसऱ्या पावलाने स्वर्ग आणि इतर लोक पादाक्रांत केले. बळीचे राज्य इतके प्रचंड असताना वामनाने निमिषार्धात हे कसे काय केलेएकतर ही खरोखरच आपल्या बुद्धीला न उमजलेली दिव्य लीला असावी किंवा बळीच्या राज्यातले त्याचे उर्वरित विरोधक वामनाला मदत करीत असावेत. एवढे होऊन मग वामन बळीला जिवंत का सोडतोपाताळाचे राज्य कसे देतोतत्कालीन प्रथेप्रमाणे अशा व्यक्तीला त्याने ठार मारणे भविष्याच्या दृष्टीने अगदी आवश्यक नव्हते कायविशेषत: सर्व परिस्थिती अनुकूल असताना वामनाने तसेच करणे अपेक्षित होते. आधुनिक भाषेत सांगायचे तर क्रांतीला कारण ठरू शकणाऱ्या नेत्याचा शक्य तितक्या लवकर काटा काढला जातो.

आमचे बहुजनवादी नेते नेमके हेच तर सांगू पाहतात. वामनाने बळीला राज्य वगैरे काहीही दिले नाही. त्याला कपट करून मारले. पण संपूर्ण आख्यानात तसा संदर्भ डोकावत नाही. उलट वामनाने बळीच्या औदार्यावर खूष होऊन देवांचा विरोध असताना देखील त्याला पाताळाचे राज्य दिल्याची नोंद मूळ कथेत आहे. पुन्हा सप्तपाताळांचे राज्य हे स्वर्गापेक्षाही ऐश्वर्यसंपन्न असल्याची नोंद अनेक पुराणे आणि भागवतासारख्या ग्रंथात अतिशय ठळकपणे आहे. इतकेच नव्हे तर वामनाने बळीला स्वत:हून दिलेल्या वरदानानुसार यापुढील इंद्रपद बळीलाच त्याच्या पुण्यप्रभावामुळे व न्यायप्रियतेमुळे दिले. या वचनाची पूर्तता होईपर्यंत वामनाने बळीच्या द्वारी थांबावेअसाही करार झाला. विरोधक म्हणतील कशावरून हे वरदान बळीने मागितले असेलबळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशावरून वामनानेच हे कारस्थान रचले नसेलयाच्या अगदी उलट तर्काने विचार केला तर कशावरून बळीने वामनाकडून स्वत:ला देवांपासून सुरक्षित केले नसेलद्वारपाल हा रक्षक असतो. नेमक्या त्याच पदी वामनाची नियुक्ती कशीप्रधानकुलगुरूसेनापती किंवा तत्सम पदांवर वामन आपली वर्णी लावू शकला नसता कायबळीचा काटा काढण्यासाठी ही पदे जास्त उपयोगी ठरली असती. थोडक्यात आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. शिवाय वामनाने मारलेल्या असुराला ब्राम्हणांनी चिरंजीवपद कसे द्यावेतो युगानुयुगे जिवंत आहेहे कसे मानावे?

रामायणाच्या काही कथांत याचे तुटक संदर्भ मिळतात. जेव्हा राम-रावण युद्धात रावणाची प्रचंड हानी झालीइंद्रजीत या त्याच्या बलशाली मुलाचा पाडाव झालातेव्हा आता मदत कोणाकडे मागायची याचा विचार रावण करू लागला. अहंकारी स्वभावाच्या रावणाने आपल्यापेक्षा कनिष्ठ राजांकडे मदत मागण्याच्या पर्यायाचा विचार न करता असुरकुळातील सर्वात महान सम्राट बळीची मदत मागायचे ठरविले. तसा तो पाताळनगरीत पोहोचला देखील. बळीच्या महालाच्या द्वारावर उभा असलेल्या वामनाने रावणाला रोखून बळीला भेटण्याचे कारण विचारले. रावणाला विष्णूशी याविषयी बोलायचे नसल्यामुळे त्याने सूक्ष्म रूप धारण करून वामनाला चकवायचा प्रयत्न केला. मात्र वामनाने रावणाच्या शरीरावर सहज आपला पायाचा अंगठा ठेवून त्याला अक्षरश: जेरीस आणला. पुढे त्यातून सुटका झाल्यावर रावण बळीसमोर आला. त्यावेळी बळी आपल्या दरबारात एकटाच बसून काही विचार करीत होता. रावणाला अचानक कोणत्याही वर्दीशिवाय आत आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वामनाने तुला आत कसे सोडलेअसे बळीने रावणाला विचारले. त्यावर रावणाने फुशारकी मारून मला कोणीही अडवू शकत नाहीअसे म्हटल्यावर बळीने वामन हा प्रत्यक्ष भगवान विष्णू असूनत्याचा कृपेशिवाय तू जिवंत देखील राहू शकणार नाहीसअसे सुनावले. पुढे रावणाने रामाशी सुरू असलेल्या युद्धाची माहिती सांगून बळीकडे मदत मागितली. त्यावर काहीवेळ समाधी लावून बळीने युद्धाचे खरे कारण जाणून घेतले व रावणाला सल्ला दिला की त्याने सीतेला तिच्या स्वगृही पाठवल्यास हे युद्धच संपुष्टात येईल. तसेच परस्रीचे हरण करणे असुर कुळाला शोभणारे नसून राम न्यायबुद्धीचा असल्याचे बळीने रावणाला समजावले. मात्र रावणाला ते पटले नाहीतो बळीची मदत न मिळवताच लंकेला परतला.

तेजपूर (आसाम) येथे उभारलेला हरि-हर युद्धाचा देखावा
जर आपण विष्णूच्या अवतारांचा क्रम पाहिला तर प्रथम वामनमग परशुरामत्यानंतर राम आणि पुढे कृष्ण असे दिसते. वामन आणि बळी हे राम अवतारापर्यंत अस्तित्वात होतेच. याशिवाय रावणाने मदत मागावीइतकी सत्ता आणि ताकद त्याकाळी देखील बळीकडे होती. इतकेच नव्हे तर परशुरामाने तब्बल २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करताना ज्या अन्यायी आणि दुष्ट राजांचा संहार केला त्यात बळीचा कदापिही उल्लेख नाही. थोडक्यात बळीच्या अस्तित्वाचे प्रमाण २ स्वतंत्र युगातील पौराणिक कथांत सापडते. त्याच्या न्यायप्रियतेबद्दलदानशूर आणि पराक्रमी स्वभावाबद्दल कोणतेही प्राण अथवा प्राचीन ग्रंथ अनुद्गार काढत नाहीत. असे काब्राम्हणांना जर खरोखरीच बळीला संपवायचे असतेतर त्यांनी त्यांच्या साहित्यातूनच त्याची हकालपट्टी केली नसती का?


पुढे महाभारतात (वस्तुत: भागवत ग्रंथात) अनिरुद्ध आणि उषेच्या विवाहाचे आख्यान आहे. अनिरुद्ध हा श्रीकृष्णाचा रुख्मिणीपासून झालेल्या प्रद्युम्न या मुलाचा पुत्र म्हणजे नातू होता. तर बाणासुर हा बळीच्या १०० पुत्रांपैकी सर्वात मोठा आणि पराक्रमी पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाची कृपा संपादित केली होती. त्यातून त्याला सहस्र बाहू आणि अपार शक्ती प्राप्त झाली होती. भगवान शंकराचा तो जणू मानसपुत्र होता. त्याची कन्या उषेने अनिरुद्धला तिच्या स्वप्नात पाहिले आणि तिने तिच्या चित्रकला या सखीकरवी अनिरुद्धला आपल्या शोणितपूर नगरीत (हे नगर आणि मंदिर अद्याप आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात पाहता येते.) आणवले. पुढे अनिरुद्ध आणि उषा यांनी गंधर्वविवाह करून त्याची वार्ता बाणासुराला दिली. ज्यामुळे खवळलेल्या बाणासुराने युद्धात अनिरुद्धाचा पराभव करून त्याला नाग्पाशात बद्ध करून ठेवले. ही बातमी नारदाकरवी कृष्ण-बलराम आणि इतर यादवांना कळताच त्यांनी शोणितपूर गाठून बाणासुराला आव्हान दिले. पुढे झालेल्या घनघोर युद्धात बाणासुराचे अतोनात नुकसान झाले. त्याचे एक सहस्र बाहू देखील कृष्णाने तोडून टाकलेपण त्याचा वध केला नाही. अखेरीस बाणासुराने कळवळून केलेल्या धाव्यामुळे स्वत: महादेव कृष्णाविरुद्ध युद्धास सज्ज झाले. तेव्हा ब्रह्मदेवांनी हस्तक्षेप करून हरि-हरांमध्ये होऊ घातलेले युद्ध टाळले. कृष्णाने शंकराला आठवण करून दिली की मी प्रल्हादाच्या वंशातील व बळीच्या पुत्रांस मारणार नाहीअसे आश्वासन दिले आहे. तसेच तुम्हीच बाणासुराला त्याचे गर्वहरण होईलअसा शाप दिला होतात. त्यानुसार मी हे कार्य केले. शंकरांनी सुद्धा हे मान्य करून बाणासुरास कृष्णाच्या खऱ्या रुपाची कल्पना देऊन त्यांस शरण जाण्यास सांगितले. पुढे बाणासुराने स्वत: अनिरुद्ध आणि उषेचे थाटामाटात लग्न लावून कृष्णाशी देखील आपला आप्तसंबंध दृढ केला.

थोडक्यात विष्णू (मग तो देव असो किंवा सृष्टीकल्याण साधणाऱ्या युगपुरुषांचा वंश अथवा उपनाम) आणि असुर यांचे काहीही वाकडे नव्हते. प्रसंगी विष्णू आणि महादेव या दोन प्रमुख दैवतांनी असुरांचे रक्षणच केले आहे. समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी कदाचित वामनाने देव-बळी यांच्यातील वाद विकोपाला जाण्यापूर्वीच हस्तक्षेप केला असेल. पण कोणत्याही पौराणिक कथांमधून बळीची दुष्ट प्रतिमा रंगवली गेली नाही अगर हे सत्य लपवले गेले नाही. किंबहुना आधुनिक अभ्यासक तर आत्ताचे तिबेट (त्रिविष्टप) हा स्वर्ग असावाभरतखंड (इराणच्या पूर्वेपासून ते आत्ताच्या इंडोनेशियापर्यंत प्राचीन अखंड भारत) हे पृथ्वी आणि आत्ताचे दक्षिण अमेरिका हे पाताळ असावेअसा सिद्धांत मांडला आहे. महान असुर संस्कृतीत्यांची सभ्यताभव्य वास्तूशिवविष्णू आणि गणपती या दैवतांची मंदिरेहत्ती व सिंहासारख्या केवळ भारत व आफ्रिकेत आढळणाऱ्या प्राण्यांचे या ठिकाणी असलेले महत्वप्राचीन मुद्रांवर अंकित असलेल्या बळीवामनबुद्ध आणि कृष्णाच्या प्रतिमा व तेलुगू भाषेशी साधर्म्य असलेली लिपी आणि उच्चार हे दक्षिण अमेरिकेतील आदिवासी समाजात आजही अनुभवता येते. हिरण्यकश्यपूची राजधानी ही सध्याच्या आंध्र प्रदेशात होतीअसेही अभ्यासक मानतातहे येथे नमूद केले पाहिजे. मयन व इंका या दक्षिण आफ्रिकेतील प्राचीन संस्कृती मयासुर आणि इतर भारतीय पात्रांशीच नाते सांगणारे असल्याचे आता सिद्ध झाले आहे. थोडक्यात पौराणिक इतिहास युरोपियन शैलीप्रमाणे एकसंध आणि मुद्देसूद नसला तरी असत्य किंवा प्रक्षिप्त नाही. जर त्याचा नीट अभ्यास केला तर आजच्या बहुतेक धारणा आपल्याला गुंडाळून ठेवाव्या लागतील. बहुजन आणि सवर्ण हा आत्ताच्या काळात नामशेष होऊ पाहणारा संघर्ष पुन्हा पेटवण्यासाठी काही समाजद्रोही बळीराजा आणि तत्सम महान विभूतींना देखील बदनाम करू पाहात आहेत. द्रविड अस्मितेच्या भोंगळ संकल्पनेने आज दक्षिण भारतात उभी केलेली सामाजिक आणि राजकीय दरी देशाला कोठे घेऊन जाणार हे आपण बघतोच आहोत. तेव्हा फुले-आंबेडकरांच्या चिकित्सक महाराष्ट्राने तरी कोणाच्या मागे जायचे हे ठरवायची वेळ आली आहे.

श्री बलराम
आता प्रश्न उरतो कीहा शेतकरी समाजाला आपलासा वाटणारा बळीराजा कोण असावात्याचेही उत्तर आपल्या प्राचीन इतिहासात दडलेले आहे. शेष नागाचा द्वापारयुगातील अवतारसंकर्षण या नावाने प्रसिद्ध तो कृष्णाचा ज्येष्ठ भ्राता बलराम हाच खरा बळीराजा. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्याने आपल्या नांगराने यमुनेचे पाणी ओढून नेले (कालवे बांधले)जो गोपालांमध्ये लहानाचा मोठा झाला संस्कृतातील बलरामचा भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रेमाने त्याला बळीराजा म्हणायला सुरुवात केली असावी आणि पुढे हा आणि तो बळीराजा यांच्यात गल्लत झाली (किंवा केली) असावी. याउलट बळीराजाचे आहे. कोणत्याही पुराणात किंवा कथानकात बळीराजा शेती करतोशेतकऱ्यांच्या हितासाठी अमके करतो किंवा नांगर आणि अन्य आयुधे धारण करतोअसे दाखविलेले नाही. याउलट बलराम हा उग्रसेन व वसुदेवानंतर (श्रीकृष्ण आणि बलरामाचे पिता) द्वारकेचा राजा होता. यादवांचे गणराज्य होते. ते आपला राजा किंवा नेता प्रतिनिधी सभेतून निवडत असत. विशेष म्हणजे तत्कालीन संपूर्ण भारताच्या राजकारण व समाजकारणाचे केंद्र असलेला कृष्ण हा कधीच राजा झाला नाही. त्याचा ज्येष्ठ बंधू बलराम हाच राजपदावर बसला होता. त्यामुळे बलराम हा शेतकरी व पशुपालक अशा यादव समाजाचा नेता या अर्थाने पुढे बळीराजा म्हणून मान्यता पावला असावा.         

   
थोडक्यात वामनकालीन बळीराजा हा सुद्धा एक वैदिक राजा आणि क्षत्रिय वर्णाचा होता. असुर हे देखील अंतिमत: देवांचे सहोदरच आहेत. बळीराजा 
संपन्न शेतकरी हेच आमचे स्वप्न
कोणत्याही अर्थाने शेतकरी अथवा अहिंसेचा उपासक नव्हता. त्याने आपल्या सामाज्र्यविस्ताराच्या हेतूने तब्बल ९९ अश्वमेध यज्ञ केले होते. ज्यासाठी त्याला अनेक युद्धे करावी लागली होतीचशिवाय अश्व म्हणजे घोड्याचे बळी सुद्धा द्यावे लागले होते. तत्कालीन ब्राम्हण हे यज्ञकर्म आणि शिक्षण देणे ही २ कर्मे करीत असत. सगळेच पौराणिक ऋषी हे ब्राम्हण नव्हते. ब्राम्हणांच्या दृष्टीने सर्वात पवित्र मंत्र असलेल्या गायत्री सूक्ताचे उद्गाते एकेकाळी चक्रवर्ती सम्राट असलेले विश्वामित्र ऋषी होते. बळीचे पूर्वज प्रल्हाद व विरोचन हे विष्णूभक्तहिरण्यकश्यपू हा ब्रह्मदेवाचा उपासक आणि बळीचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त होता. वामन आणि बळी हे दोघेही ब्राम्हण व उर्वरित हिंदू समाज या दोघांनाही तितकेच वंदनीय आहेत. वामनाने बळीवर अन्याय वगैरे केलेला नाही. तर त्याला स्वर्गापेक्षाही संपन्न अशा सप्तपातालांचे राज्यचिरंजीवित्व आणि भविष्यातील इंद्रपद अशी ३ वरदाने दिली आहेत. स्वत: वामन हा बळीच्या विनंतीला मान देऊन त्याच्या द्वारी उभा असतो. अशी परमभक्त आणि महान व्यक्ती इतक्या क्षूद्र वादाचे कारण होणे हेच हिंदू समाजाचे दुर्दैव नाही काय    

        



  - प्रणव भोंदे 








Wednesday, June 10, 2015

भारतीय लष्कराचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ यशस्वी !!


भारतीय लष्कराच्या इतिहासात ०९ जून २०१५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच दिवशी भारतीय लष्कराने आपल्या देशाच्या सीमा ओलांडून राबविलेले दहशतवादीविरोधी अभियान पहिलेवहिले असूनही यशस्वीपणे व या तंत्रात अनुभवी समजल्या जाणाऱ्या देशांनाही कौतुकास्पद वाटेल, अशा पद्धतीने पार पाडले. मणिपूरमध्ये लष्कराच्या छावणीवर गनिमी हल्ला करून २१ जवानांचे बळी घेणाऱ्या नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग गट) या दहशतवादी संघटनेच्या म्यानमारमधील गुप्त तळांवर भारतीय जवानांनी हल्ला चढवून, सुमारे ८० दहशवाद्यांना कंठस्नान घातले.

काही प्रसारमाध्यमांनी या ऑपरेशनचे वर्णन सूड, बदला इत्यादी शेलक्या शब्दात केले असले तरी याच संघटनेचे म्होरके पुन्हा एकदा भारतीय लष्करावर हल्ले करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त गुप्तचर संस्थांनी दिल्यामुळेच ही विशेष मोहीम आखण्यात आल्याचे लष्करी प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय लष्कर हे जगातील सामर्थ्यवान लष्करी शक्तींपैकी एक आहे. आपल्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इतके व्यापक अभियान राबविले असे म्हणून आपण या अभियानाचे महत्व कमी करतो आहोत.

मंगळवारी पहाटे भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करी सरकारला विश्वासात घेऊन हे अभियान राबविले. पण त्याची औपचारिक घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली. तोपर्यंत दिवसभर वृत्तवाहिन्यांवर २ आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडींचे वृत्त झळकत होते. दिल्लीचे कायदेमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बोगस पदवी सादर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक झाली. तसेच काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणूनबुजून त्यांच्या सहकाऱ्यांना समाजात दुही पसरविणारी विधाने करायला लावत असल्याचा आरोप केला. या दोन्ही बातम्यांचे विश्लेषण करून मोदी यांच्या प्रतिमाभंजनाचा जोरकस प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यमांना देखील लष्करी कारवाईची बातमी ऐकून मोठा धक्का बसल्याचे जाणवत होते. पोलिसांनी एका भामट्या चोराला पकडण्याचे वृत्त ज्या पद्धतीने दिले जाईल, त्याच पद्धतीने हे वृत्त सुद्धा दाखविले गेले आणि त्याची वरीलप्रमाणे संभावना केली गेली. असेच लष्करी ऑपरेशन जर काश्मीरमध्ये घडले असते, तर कदाचित उथळ माध्यमांना त्याचे महत्व लवकर उमगले असते.



गेल्या आठवड्याभरात मणिपूर आणि त्यानंतर अरुणाचलप्रदेश येथील भारतीय लष्कराच्या छावण्यांवर ईशान्य भारतातील बंडखोर संघटनांकडून हल्ले झाले आहेत. यातील मणिपूरच्या हल्ल्याच्यावेळी लष्कर देखील बेसावध होते. कारण एनएससीएन (के) या नागा बंडखोर संघटनेशी भारत सरकारचा युद्धबंदी करार झाला होता आणि गेले दशकभर दोन्ही बाजूंकडून या कराराचे पालन झाले होते. मणिपूर हल्ल्यात लष्कराचे २० जवान धारातीर्थी पडले तर १५ जवान जबर जखमी झाले. तुलनेने अरुणाचलप्रदेश येथील हल्ल्याच्यावेळी भारतीय लष्कर सावध होते. त्यामुळे आपले मोठे नुकसान होण्याऐवजी लष्कराने हल्लेखोर अतिरेक्यांनाच यमसदनी पाठविले. असेच आणखी काही हल्ले करण्याचा बेत एनएससीएन (के), उल्फा आणि इतर दहशतवादी संघटना आखत असतानाच भारतीय लष्कराने मोहीम राबवून जणू या संघटनांच्या नापाक इराद्यांवर पाणी ओतले आहे. तसेच या अभियानामुळे शत्रू देशांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

मणिपूर हल्ल्याचा तपास करताना गुप्तचर संस्थांना अनेक धक्कादायक गोष्टी लक्षात आल्या. एकतर एनएससीएन (के)  ही संघटना चर्चप्रेरित आहे. पण यंदाच्या हल्ल्यामध्ये चक्क नक्षलवादी अवलंबतात तसे तंत्र हल्ल्यासाठी योजले गेले. इतकेच नव्हे तर ज्या रॉकेट लाँचरचा या हल्ल्यासाठी वापर केला गेला ते अमेरिकन बनावटीचे आहे. अमेरिका आपली शस्रे थेट ईशान्य भारतातील दहशवादी संघटनांना विकत असल्याचे पुरावे अद्यापि समोर आले नसल्यामुळे ही शस्त्रे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पुरविली असण्याची शक्यता आहे. हा हल्ला जरी एनएससीएन (के)  या संघटनेने केला असला तरी त्यांना चिथावणी देण्याचे काम उल्फाचा म्होरक्या परेश बारूआने दिल्याचे बोलले जाते. हा बारूआ चीनच्या आश्रयाने काम करीत असल्याचा समज आहे. एकूण भारताचे सगळे हितशत्रू एकत्र येऊन असे हल्ले घडवत असण्याची शक्यता आहे.

आता सर्वसामान्य भारतीयांना प्रश्न पडेल की, हे सगळे एकत्र येऊन काश्मीरऐवजी ईशान्य भारतात का हैदोस घालत असावेत? तर त्याचे उत्तर ईशान्य भारताच्या आशियाच्या पूर्व भागातील सामरिक स्थानात दडले आहे. भारताची छोटी छोटी सात राज्ये असलेल्या या अत्यंत दुर्गम प्रदेशाला लागून बांग्लादेश, म्यानमार, चीन, तिबेट, भूतान आणि नेपाळ या देशांची सीमा आहे. आग्नेय आशिया आणि भारत यांच्यातील हा प्रदेश दुवा आहे. पेट्रोल, थोरियमसारखे मौल्यवान नैसर्गिक साठे येथे विपूल प्रमाणात आहेत. विपूल नैसर्गिक वरदान लाभलेला हा प्रदेश पूर्व आशियावर सामरिक नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याचा ठरतो. मग हा प्रदेश भारतात असावा, असे भारताच्या हितशत्रूंना वाटेल काय? अर्थातच नाही. म्हणूनच या भागातील जनजातींमध्ये संघर्ष घडवून किंवा त्यांना भारताविरोधात लढायला लावून भारताला कमजोर करणे किंवा शक्य झाल्यास हा प्रदेश गिळंकृत करण्याचे षड्यंत्र गेली ५० वर्षे रचले जात आहे.

यातील दुर्दैवाचा भाग म्हणजे अपवाद वगळता भारत सरकार देखील या प्रदेशाबद्दल अनास्था बाळगूनच काम करते. या प्रदेशाचा विकास व्हावा, देशाच्या उर्वरित भागांशी या प्रदेशाचे नाते अतूट राहावे, म्हणून आपल्या सरकारने फारसे काही केले नाही. याउलट ख्रिश्चन मिशनरीजनी या प्रदेशाला १९४० च्या सुमारास लक्ष्य करून तिथे आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. परिणामी येथील फुटीरतावाद एवढा बळावला की या ७ राज्यांचे ४९ देशांत रुपांतर होते काय इतकी भीषण स्थिती निर्माण झाली. अखेर भारतीय लष्कराने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले म्हणून हा प्रदेश आपल्याकडे अजूनही आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संलग्न संघटनांनी तसेच रामकृष्ण मिशनने या प्रदेशात शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणा इत्यादी क्षेत्रात व्यापक कार्य उभे करून तेथील लोकांच्या मनातील भारतीयत्व अखंड जपण्याचे कार्य केले. गंमत म्हणजे आपल्या देशातील कथित बुद्धीजीवी संघ परिवाराच्या या कामगिरीकडे आणि चर्च व फुटीरतावादी संघटनांच्या देशद्रोही कार्यपद्धतीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. अर्थात असे करणे म्हणजेच ‘सेक्युलरिझम’ असल्यामुळे यावर किती लिहायचे !!

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आपल्या सीमेपल्याड जाऊन केलेली ही कामगिरी ऐतिहासिकच म्हणावी लागेल. कारण ही कारवाई भारतीय लष्कर, वायुदल, गुप्तचर संस्था आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच यशस्वी होऊ शकली. यातील एकजरी बाजू कमी पडली असती, तरी या अभियानाची छी-थू ठरलेलीच होती. मोदींच्या विदेश दौऱ्यांवर तोफ डागणारे अपरिपक्व राहुल गांधी आणि त्यांची तळी उचलणारी भारतीय प्रसारमाध्यमे यांना याचे महत्व लक्षात येणे अवघड आहे. कारण म्यानमार जरी आपला पारंपारिक मित्र देश असला तरी अशी अभियाने राबविताना दोन्ही देशांची विश्वासार्हता आणि समन्वय यांची कसोटी असते. पाकिस्तान हा अमेरिकेचा मित्रदेश समजला जातो किंबहुना तो अमेरिकेचा बटीक देश आहे. तरीही ओसामा बिन लादेनवरील कारवाईच्यावेळी या दोन्ही देशांचे संबंध तुटण्यापर्यंत ताणले गेले होते. याउलट म्यानमारच्या सरकारला भारतीय विदेश सचिव आणि तेथील आपल्या राजदूताने संपूर्ण विश्वासात घेतले. म्यानमारने आपल्याला केवळ ही कारवाई करण्यापुरती अनुमती दिली नाही तर त्यासाठी लागणारी लॉजिस्टिक मदत देखील पुरविली.

भारतीय गुप्तचर संस्थांचे देखील कौतूक झाले पाहिजे. कारण या मोहिमेसाठी लागणारी सूक्ष्मस्तराची माहिती देखील जमवून या अभियानाच्या अचूकतेत गुप्तचर संस्थांचा मोठा सहभाग राहिला. केवळ ४५ मिनिटांत हे अभियान यशस्वी झाले. अतिरेक्यांच्या गुप्त छावण्यांचे नेमके स्थान, तेथील सज्जता आणि मनुष्यबळ यांची नेमकी माहिती भारतीय गुप्तचरांनी जमवलीच. परंतु हे अतिरेकी भारतावर पुन्हा हल्ला करण्याचे नियोजन करीत असतानाच त्यांना कायमचा धाक घालणारी प्रतिबंधात्मक कारवाई भारतीय लष्कर करू शकले. एवढी मोठी मोहीम राबविताना भारतीय लष्कराच्या एकही जवानाला साधे खरचटले नाही, हे सुद्धा उल्लेखनीय नाही काय?



इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तचर संघटनेची असे अभियान राबविण्यात मातब्बरी आहे. भारतीय लष्करानेही आपली ही क्षमता सिद्ध केल्यामुळे आपल्या शत्रूंचे धाबे दणाणले असेल. परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून बांग्लादेश, म्यानमार, भूतान आणि नेपाळ या देशांशी भारत सरकार व्यापक संरक्षण भागीदारी करीत आहे. त्याचे हे दृश्यस्वरूप म्हणावे लागेल. कारण ईशान्य भारतातील सुमारे ४५ फुटीरतावादी संघटनांच्या कारवाया याच देशांच्या भूमीच्या आश्रयाने सुरू आहेत. मोदींनी नुकत्याच झालेल्या बांग्लादेश दौऱ्यात सीमानिश्चिती करार करून अतिरेकी संघटनांच्या चोरवाटा बंद करण्याकडे पाऊल टाकले आहे. तर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी गेल्या वर्षभरात भारतीय सुरक्षा संस्थांमधील बिघडलेला समन्वय ठीक केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे येत्याकाळात पाकिस्तानने देखील आपल्या देशाची खोड काढायचा प्रयत्न केल्यास त्यांना सुद्धा जबर धडा शिकवण्याचा आत्मविश्वास देशाचे परराष्ट्रमंत्री मनोहर पर्रिकर, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह व्यक्त करीत आहेत आणि तो अनाठायी नाही.

एकूणच भारतीय लष्कराची म्यानमार मोहीम सर्वच अर्थाने विलक्षण असून, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा आणि भारतीय जवानांचा आत्मविश्वास वाढावा, अशीच आहे. म्यानमारने देखील मैत्री निभावली असून, आता आगामी काळात भूतान, नेपाळ आणि बांग्लादेशाला सुद्धा याविषयी निश्चित भूमिका घ्यावी लागणार आहे. भारत आता नेहरू-गांधींच्या राजवटीतील ‘सॉफ्ट स्टेट’ नाही, याची जाणीव चीनने सुद्धा ठेवावी.