सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, February 18, 2016

अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. खरेतर टिकेकर हे पत्रकार म्हणून आमच्या पिढीचे आजोबाच ठरतील. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचे वगैरे प्रसंग आम्ही नक्कीच सांगू शकणार नाही. पण गेल्या ५ वर्षांत अवचितपणे त्यांना भेटण्याच्या, काही वेळ त्यांच्या सहवासात राहण्याच्या संधी नक्कीच मिळाल्या होत्या.

पुण्यातील 'प्रबोधन मंच' नावाच्या संस्थेने प्रसारमाध्यम विषयावर एक परिषद आयोजित केली होती. संस्थेचे प्रमुख हरिभाऊ मिरासदार आणि त्यांचे सहकारी व हिंदुस्थान समाचारचे तत्कालीन ब्यूरो चीफ अरुण करमरकर असे दोघे जण टिकेकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बांद्र्याच्या घरी जाणार होते. अरूणजींनी मला सोबत येतोस का विचारले. मी आनंदाने त्यांच्यासोबत टिकेकरांच्या घरी गेलो. आम्ही पोचलो तेव्हा त्यांचे अभ्यासिकेत काहीतरी काम सुरू असावे. थोड्याच वेळात ते बाहेर आले. प्रत्येकाची ओळख करून काहीना काही मिश्कील टिपण्णी केली. हरिभाऊंचे बंधू म्हणजे प्रख्यात विनोदी लेखक द.मा.मिरासदार. त्यामुळे पुढचा काही वेळ द.मा.यांच्या आठवणी जागवण्यात गेल्या. पुढे हरिभाऊ यांनी 'प्रबोधन मंच' आयोजित परिषदेची माहिती सांगितली. टिकेकरांनी त्यातील प्रत्येक विषय व इतर वक्त्यांची माहिती घेऊन, त्या प्रत्येक विषयावर काही सूचना केल्या. अर्थातच त्यांनी त्या परिषदेत बीजभाषण करण्याचे आमंत्रण स्वीकारले.

पुढे त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. अर्थात गाडी त्यांची, चालकही त्यांच्यासोबत होताच आणि माझ्यापेक्षाही पुण्याची माहिती त्यांनाच अधिक होती. थोडक्यात मी त्यांना नव्हे तर ते मला घेऊन पुण्याला जाणार होते. आदल्या दिवशी त्यांना फोन करून घाबरतच विचारले की, माझ्यासोबत आणखी एक तरूण पत्रकार (संकेत सातोपे) पुण्याला येणार आहे. तो आपल्यासोबत आला तर चालेल ना? "आमच्या गाडीत मावणारा असेल तर काहीच हरकत नाही," असा मिश्कील होकार समोरून मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी पोहोचलो आणि आमचा प्रवास सुरू झाला.

प्रवासाची आठवण म्हणजे टिकेकर यांचे अखंड धुम्रपान (त्यामुळे आमची झालेली घुसमट), बालभारतीमधील निवडक कवितांची त्यांनी बनवून घेतलेली सीडी सोबतीला होतीच. प्रत्येक कविता ऐकल्यानंतर आमची परीक्षा व्हायची. ही कविता कोणाची? कितवीच्या पुस्तकात होती? इत्यादी प्रश्न विचारून त्याची उत्तरे सुद्धा तेच देत होते. सोबत कवितेचे सार्थ रसग्रहण सुरू होतेच. दरम्यान लोणावळ्याजवळ फूड मॉलमध्ये विश्रांती थांबा झाला. त्यांनी फक्त चहाच घेतला तरी आम्हाला मात्र पोटभर नाश्ता करायला लावले. परिषदेच्या आयोजकांनी अशा वरखर्चासाठी दिलेले पैसे काढल्यावर आम्हाला चांगलाच ओरडा पडला. पुढचा प्रवास पत्रकारिता विषयक धड्यांचा होता. त्यात टिकेकरांच्या विविध आठवणी, काही मोठ्या राजकीय नेत्यांबाबतचे प्रसंग, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेली संपादकीय जुगलबंदी इत्यादी अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

संपादक म्हणजे वातानुकुलीत खोलीत बसून आपल्याला वाटेल ते लिहिणारा व्यक्ती नव्हे, तर अत्यंत अभ्यासू, समाजातील प्रत्येक सूक्ष्म प्रवाहांची बित्तंबातमी असलेला आणि त्याविषयी तटस्थ मत असलेला मान्यवर असतो, हे ऐकले होते. टिकेकरांच्या रूपाने असा साक्षेपी संपादक प्रथमच पाहात होतो. एका विद्वान व्यक्तीबरोबर प्रवास करण्याची, सलग ३-४ तास सोबत राहण्याची आमची पहिली वेळ होती. स्वाभाविकच आमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण त्यांना जाणवला असावा. ज्या सहजतेने, एका मित्राप्रमाणे त्यांनी आमच्याशी संवाद साधला तो खरोखरीच संस्मरणीय होता.

पुढील काळातही २-३ प्रसंगांत टिकेकरांना भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक भेटीची स्वतंत्र आठवण आहे. अशा व्यक्ती होणे नाही हेच खरे. मन:पूर्वक श्रद्धांजली.


- प्रणव भोंदे

No comments:

Post a Comment