सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, February 18, 2016

रोहित वेमुलाची शोकांतिका


रोहित वेमूला या विद्यार्थ्याची आत्महत्या सध्या ब्रेकिंग न्यूज झाली आहे. गेल्या दीड वर्षांत आपला देश अचानक 'असहिष्णू' होऊ लागला आहे म्हणे !! त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजपचे नेते ज्या प्रकरणात संशयित आहेत, ते प्रकरण विरोधकांना व प्रसारमाध्यमांना सापडले म्हणजे बघायलाच नको. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी नामक वाचाळांनी ही संधी कशी सोडावी? पण...
या आत्महत्येमुळे काही प्रश्न अनुत्तरीत राहू नयेत.

१. रोहित आणि त्याच्या ज्या सहकारी विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले ते कारण नेमके काय होते? त्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती हे खरे आहे का? जर असेल तर मग निलंबन चुकीचे कसे ठरू शकते?

२. रोहितवर जी कारवाई झाली ती दलित म्हणून की विद्यार्थ्यांकडून अपेक्षित अनुशासनाचा भंग झाला म्हणून?

३. तब्बल १२ दिवस रोहित उघड्यावर झोपत होता. डिप्रेशनमध्ये गेला होता, असे त्याचे मित्र आणि आंबेडकर स्टुडंट्स युनियनचे पदाधिकारी म्हणतात. मग एवढे दिवस त्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची आणि तातडीने मानसोपचार सुरू करण्याची गरज नव्हती काय? यात हलगर्जी दाखविल्याबद्दल आणि रोहितच्या मृत्यूचे भांडवल केल्याबद्दल या संघटनेवर सुद्धा कारवाई का होऊ नये? की रोहितचा वापर गिनिपिग म्हणून करायचे ठरले होते?

४. आजच आणखी एक बातमी आली आहे. गेल्या १० वर्षांत याच विद्यापीठात तब्बल ९ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या काळात केंद्रात आणि राज्यांत राहुल गांधी यांच्याच पक्षाची सत्ता नव्हती काय? त्यातही काही काळ स्वत: राहुल गांधी हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मग या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांनी काय केले हे आधी सांगावे. अन्यथा त्यांना या आत्महत्येचे राजकीय भांडवल करण्याचा अधिकारच नाही.

५. असहिष्णुता ही नेहमीच निवडणूक काळात कशी बोकाळते? केरळ आणि बंगालची निवडणूक तोंडावर असताना दलित मतपेढ्या सुरक्षित करण्यासाठी तर हा सगळा खटाटोप नव्हे ना?


- प्रणव भोंदे

No comments:

Post a Comment