सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Wednesday, April 2, 2014

सरसंघचालकांचे काय चुकले??

  २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूक काळात वार्ताहर या नात्याने मुशाफिरी करताना प्रभादेवी परिसरातील एका मराठीप्रेमी राजकीय पक्षाच्या संपर्ककेंद्रावर गेलो होतोतेथे बसलेल्या काही तरूण कार्यकर्त्यांपैकी एकाकडून त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची आणि मतदारांच्या प्रतिसादाची वास्तपुस्त करून तेथून निघालोसायंकाळी माहीम मच्छीमार वसाहतीत भटकंती सुरू असताना तेथे आणखी एका मराठीप्रेमी पक्षाचे मतदार संपर्ककेंद्र होतेहा पक्ष नव्यानेच स्थापन झाल्यामुळे आणि त्या निवडणुकीत या पक्षाची बऱ्यापैकी हवा असल्यामुळे साहजिकच त्या केंद्रावर कार्यकर्ते आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होतीमी सुद्धा त्या गर्दीत सामील होऊन आत शिरल्यावर दुपारी प्रभादेवीला भेटलेला तो तरूण कार्यकर्ता येथे सुद्धा दिसला.
           ते दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्या युवकाला दोन्ही केंद्रांवर सक्रिय असल्याचे पाहून मला मोठा धक्का बसला होतात्यानेही मला ओळख दाखविल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याशी बातचीत सुरू झालीराजकीय विश्लेषणासाठी पुरेशी माहिती मिळाल्यावर मी दबकतच माझ्या मनात असलेली शंका त्याला विचारलीएकाच वेळी दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या प्रचारात तू कसा काय सामील होऊ शकतोसया माझ्या प्रश्नावर त्याने माझ्या डोळ्यात वास्तवाचे अंजन घालणारे उत्तर दिलेतो म्हणाला कीमी सध्या माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतो आहेया दोन्ही पक्षांच्या विद्यार्थी शाखा माझ्या महाविद्यालयात देखील असूनमाझे अनेक मित्र त्यांच्यात सक्रिय आहेतनिवडणूक काळात या सर्वच पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते हवे असतातत्यासाठी ते आम्हाला एकवेळचे चमचमीत जेवण आणि बऱ्यापैकी  मानधन सुद्धा देतातयेथे काही दिवस काम केल्यामुळे माझ्या पुढच्या काही आठवड्यांच्या खर्चाचा प्रश्न सुटणार असल्यामुळे घरी बसून राहण्यापेक्षा मी दोन्ही ठिकाणी काम करणे पसंत करतो
          त्या युवकाने अगदी प्रामाणिकपणे माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले होतेअतिव्यस्त वेळापत्रक असलेल्या मुंबई महानगरीतल्या बहुतेक सर्वच पक्षांना अशा कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत असतोअर्थात या पक्षांमध्ये सक्रिय असलेले सर्वच कार्यकर्ते असे भाडोत्री नसलेतरी  जवळपास प्रत्येक कार्यकर्ता काहीना काही अभिलाषा बाळगूनच राजकारणात उतरलेला असतोहे वास्तव सर्वपक्षीय नेते खाजगीत व्यक्त करतात.
           राजकीय क्षेत्र हे समाजाच्या सर्वच अंगांना प्रभावित करणारे सर्वंकष क्षेत्र आहेसत्तेतून मिळणारा अधिकारअवाढव्य प्रशासकीय यंत्रणाविविध स्त्रोतांतून प्राप्त होणारा महसूल आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्वसाधारण जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणेनिश्चितच शक्य असतेपण वास्तव काहीसे वेगळे आहेइतिहास व वर्तमानातील काही सन्माननीय अपवाद वगळता सत्ताकेंद्राकडून बहुतेकदा जनतेचा अपेक्षाभंग होतोत्यातून अनुभवास येते ती केवळ चीड आणि हताशानक्षलवाद्यांसारखे समाजविघातक घटक स्थानिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नेमके असेच मुद्दे वापरतात.
           काही महिन्यांपूर्वी देशातील चार महत्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्याकेंद्रातील सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष आणि मुख्य विरोधी असलेला भारतीय जनता पक्ष यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची सराव परीक्षा म्हणून सर्वांचेच या निवडणुकांकडे लक्ष होतेइतर तीन राज्यांत अपेक्षेप्रमाणे लढती झाल्या असल्या तरी राजकीय अभ्यासक व सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले ते दिल्ली राज्यातील निवडणुकीच्या निकालानेदेशाचे सत्ताकेंद्र असलेल्या या राज्यात आम आदमी पक्ष नावाच्या नव्या भिडूने अनपेक्षित चमत्कार घडवून चक्क स्वतःचे सरकार स्थापन केलेया पक्षाला पहिल्याच फटक्यात मिळालेले हे नेत्रदीपक यश पाहूनकॉंग्रेसभाजपासह देशातील सर्वच जुन्याजाणत्या पक्षांचे धाबे दणाणलेया पक्षाने लोकांच्या मनातील मुद्यांना हात घालूनत्यांच्या अपेक्षा वाढविल्या होत्यासर्वसामान्यांना भेडसावणा-या समस्यांवर नेमके बोट ठेवूनत्या दूर करण्याचे वचन दिले होतेपण अनेक नाटकीय घडामोडींनंतर अवघ्या ४९ दिवसात हे सरकार कोसळले आणि त्या पक्षाकडे आशेने पाहणा-यांची घोर निराशा झाली.
                आता त्या पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभर प्रचाराची राळ उडविली आहेत्यांचा असा दावा आहे कीकॉंग्रेस-भाजपासहित देशातील सर्वच प्रस्थापित पक्ष भ्रष्ट आहेतया पक्षांची सत्तासंचालनात एकमेकांसोबत मिलीभगत असल्यामुळे जनतेची घोर फसवणूक होत आहेहे सर्वच पक्ष आपापली संस्थाने राखण्याचे काम करीत असूनआम आदमी म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या समस्यांकडे त्यांचे लक्षच नाहीतेव्हा ही भ्रष्टाचारी यंत्रणा समूळ नाहीशी करूनलोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी जनतेने आम आदमी पक्षाची निवड करावीअसे त्यांचे सांगणे असतेकेजरीवालांच्या वरील कथनातील पूर्वाध जरी खरा असला तरी उत्तरार्धाबद्दल राजकीय अभ्यासकांत सुद्धा दुमत आहेया पक्षाची स्थापना ज्या जनलोकपाल आंदोलनातून झालीत्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अण्णा हजारेंपासून अनेकांनी या पक्षाच्या ख-या उद्देशाबद्दलच शंका व्यक्त केली आहेलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जसजसा रंग भरतो आहेतसतसा आप नावाच्या या पक्षाने आम्हीही इतर पक्षांपेक्षा तसूभर देखील कमी नाहीहे सिद्ध करण्याचा जणू विडाच उचलला आहेपरिणामी विवेकी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असूनसगळेच पक्ष सारखे असल्याच्या त्यांच्या पूर्वसिद्धांतावर नव्याने शिक्कामोर्तब होत आहे.
           याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशव्यापी संघटनेचे प्रमुख असलेले सरसंघचालक डॉमोहन भागवत यांचे एक विधान गाजते आहेत्यांनी संघाच्या देशभरातील प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले कीआपण सर्व कार्यकर्ते कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हे तर देशहितासाठी काम करीत असल्याची जाणीव सतत मनात ठेवली पाहिजेनिवडणूक मोसम संपल्यानंतर आपण सर्वांनीच पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रउभारणीच्या कामाला जुंपून घ्यावयाचे आहेनिवडणूक काळात संघप्रमुखांनी केलेल्या या वक्तव्याला खमंग फोडणी देऊन काही प्रसारमाध्यमांनी सरसंघचालकांनी हे वक्तव्य भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना उद्देशून केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यामोदींच्या एककल्ली प्रचाराचा नकारात्मक प्रभाव संघ कार्यकर्त्यांवर देखील पडत असल्यामुळेच त्रस्त झालेल्या संघाने असे वक्तव्य केल्याचे तर्क यानिमित्ताने अनेक राजकीय विद्वांनानी मांडलेपण डॉभागवतांचे वरील वक्तव्य नीट वाचले तर कोणत्याही विेवेकी वाचकाला या सर्व परिस्थितीचे निराळ्या पद्धतीने आकलन व्हावे.
           राजकारण हे समाज घडणीचे मूलभूत माध्यम असूच शकत नाहीकिंबहुना सामाजिक प्रगल्भतेचे पारदर्शक व वास्तविक चित्र राजकारणाच्या पोतावरून उमटत असतेस्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संसदेत आणि महाराष्ट्र व इतर अनेक राज्यांच्या विधीमंडळाचे सदस्य असलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांतून तत्कालीन भारतीय जनतेच्या अपेक्षा लोकशाहीच्या या दालनांत मोठ्या प्रभावीपणे मांडल्यामधू लिमयेमधू दंडवतेअटलबिहारी वाजपेयीबॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळजॉर्ज फर्नांडीस आदी नेत्यांनी संसदेच्या इतिहासावर आपला अमीट ठसा उमटविला आहेमहाराष्ट्राच्या विधीमंडळानेही अशी समृद्ध व सकस नेत्यांची परंपरा जपली आहेआचार्य अत्रेरामभाऊ म्हाळगीऍडदत्ता पाटीलउल्हास पवार या नेत्यांची भाषणे ही केवळ बिनतोड युक्तीवाद किंवा उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमूना नव्हतीतर त्यात राज्यातील जनतेच्या ख-या समस्यांची सांगोपांग चर्चात्यांचे परिणामसंभाव्य उपाययोजना यावर मार्मिक भाष्य केलेले असे.
   वरील दोन्ही याद्या नीट पाहिल्या तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते कीवरील सर्व नेते कोण्या एका पक्षाचे नसूनसर्वच पक्षांनी असे नेतृत्व घडविले होतेमग गेल्या काही वर्षात असे नेते लोप पावले कायकेवळ राजकीय क्षेत्रातच असे अधःपतन घडले आहे की इतर प्रभावी क्षेत्रांतही तेच चित्र आहे़वरील प्रश्नांचा साकल्याने विचार केला तर याचे नेमके उत्तर सापडतेगेल्या काही वर्षात साहित्यशिक्षणपत्रकारिताकायदा आदी सर्वच क्षेत्रांमध्ये अशीच एक पोकळी पाहावयास मिळतेकदाचित या सर्व क्षेत्रांचे अंधपणे होणारे व्यावसायिकरणच याला जबाबदार असावेचांगली माणसे घडविण्याचीसमाजजागृती  करण्याची अथवा अपप्रवृत्तींना आळा घालण्याची आपली पूर्वापार यंत्रणा क्षीण झाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे.

 केवळ क्रांती घडल्यामुळे समाजाची सर्व स्वप्ने साकारत नसतातत्यासाठी पक्की यंत्रणा उभारण्याची व ती सक्षमपणे राबविण्याची नितांत गरज असतेएखादा नेताराजकीय पक्ष किंवा आंदोलन यांच्या माध्यमातून आपली सगळी स्वप्ने पूर्ण होतील असा भाबडा अंधविश्वास बाजूला ठेवून समाजालाच आपल्याला अपेक्षित सुधारणांचा कृती आराखडा आखणे गरजेचे बनतेयंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी आपापल्या मतदारांना गोंडस स्वप्ने दाखविली आहेतउद्या ही स्वप्ने पूर्ण करणे या पक्षांना अपयश आल्यास जनतेचा मोठा भ्रमनिरास होऊ शकतोत्यातून नैराश्य येऊन परिस्थिती आणखी चिघळू शकतेया देशाची आणि समाजाची चिंता असलेल्या प्रत्येकालाच हे जाणवत असेलतेव्हा सरसंघचालकांनी त्याला उघड वाचा फोडली हे बरेच झाले.


संघ भाजपात खरेच हस्तक्षेप करतो का??

 आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाल्यावर इतरवेळी आपल्याला साध्या वाटणा-या बातम्यांमध्येही आपल्याला राजकारणाचा वास येऊ लागतो त्यातूनच आपण संबंधित वृत्ताची सजग चिकित्सा करू पाहतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशव्यापी हिंदुत्ववादी संघटनेचे २००० कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय करण्याचे घाटत असल्याचे एक वृत्त सध्या देशाच्या राजकीय क्षेत्रात वावटळ बनून आले आहे. वस्तुतः संघाचे लाखो कार्यकर्ते यापूर्वीही भाजपात सक्रिय झाले आहेत. ही काही पहिलीच घटना नाही. परंतु नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, भाजपा नेत्यांचे पक्षांतर्गत संघर्ष आणि मुख्य म्हणजे या पक्षाला केंद्रीय सत्तेत येण्याची असलेली नामी संधी या घटकांमुळे या बातमीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. त्याचे बातमीमूल्य लक्षात घेऊन प्रसारमाध्यमे आणि बुद्धीजीवी वर्तुळाने याची तावातावाने चर्चा सुरू केली असली तरी यानिमित्ताने दोन्ही बाजुंची पूर्ण माहिती घेऊन मगच वस्तुस्थितीबद्दल निष्कर्ष काढणे शक्य होईल.

            संघ व्यावहारीकदृष्ट्या भाजपाची मातृसंघटना असली तरी दोघांच्या उद्दिष्टात, कार्यक्षेत्रात आणि कार्यशैलीत ठळक फरक आहे. संघ आपला उद्देश भारतमातेचे पुनरूत्थान किंवा भारताला विश्वगुरूपदी प्रतिष्ठापित करणे असल्याचे सांगतो. त्यासाठी भारतातील सर्वात मोठा समाज असलेल्या हिंदूंना संघटित, संस्कारित आणि प्रेरित करण्याचे कार्य संघ १९२५ पासून करतो आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने कुतुहलजनक बाब म्हणजे संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे तत्कालीन कॉंग्रेसचे विदर्भातील एक प्रमुख कार्यकर्ते होते. अनुशीलन समितीसारख्या सशस्त्र क्रांतीकार्यातही त्यांनी काही काळ सहभाग घेतला. पण पारतंत्र्यांची नेमकी कारणे, तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि त्या अनुषंगाने स्वतंत्र भारताचे भवितव्य पाहता त्यांना समाजाला संघटित आणि संस्कारित करण्याची अधिक गरज वाटल्यामुळेच त्यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली.

            पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे भारतीय जनता पक्षात स्थित्यंतर होत असताना गांधीवादी समाजवादाचा स्वीकार भाजप नेत्यांनी केलेला दिसतो. अर्थात हे करीत असताना त्यांनी संघप्रणित हिंदुत्व नाकारले नाही आणि त्यामुळे गांधीतत्वज्ञानाला धक्का बसल्याचे आजवरच्या कोणत्याही विद्वानाने पारदर्शकपणे सिद्ध केलेले नाही.

            महात्मा गांधींनी कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसने जहाल राजकारणाकडून मवाळ राजकारणाकडे आपला मोर्चा वळविला. हा बदल होत असतानाच भारताच्या स्वातंत्र्यचळवळीपासून काहीसे अंतर राखून असलेल्या मुस्लिम समाजाला देखील या चळवळीत सहभागी करण्याच्या निमित्ताने कॉंग्रेसचे सुरू झालेले राजकारण हळूहळू मुस्लिमधार्जिणे बनू लागल्याची भावना कॉंग्रेसच्याच अनेक नेत्यांमध्ये बळावत होती. याशिवाय ब्रिटीशांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळ क्षीण करण्यासाठी मुस्लिम नेत्यांना हवा देऊन, त्यांना कॉंग्रेसी नेत्यांच्याच विरोधात उभे करण्याच्या चतुर राजकीय चाली देखील रचल्या होत्या. स्वाभाविकच न्यूनगंडाच्या भावनेने पछाडलेल्या हिंदू  समाजाचे दिग्दर्शन स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार आदी प्रमुख नेत्यांनी करून हिंदू समाजाला उभारी देण्याचे प्रयत्न चालविले. पण तेव्हापासूनच इंग्रजी दुष्प्रचाराला बळी पडलेल्या व स्वतःला उदारमतवादी म्हणविणार्या अनेक संभावितांनी संघाला मुस्लिमविरोधी ठरवून त्यावर विखारी टीका सुरू केली.

            स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ साली नथुराम गोडसे या हिंदुत्वावादी युवकाने महात्मा गांधी यांची हत्या केल्यावर तर या वर्गाच्या हाती आयतेच कोलीत लागले. तत्कालीन कॉंग्रेस सरकारने संघावर बंदी घालून संघ कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. कॉंग्रेसी कार्यकर्ते त्यावेळी इतके चवताळले होते की, संघाचे काम करणारा कार्यकर्ता आणि वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने ब्राम्हण जातीशी संबंधित मंडळींना टिपून त्यांची मारझोड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या परिस्थितीत संयतपणा दाखवून संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर उपाख्य गुरूजी यांनी संघ कार्यकर्त्यांना संयम बाळगायला लावून कायदेशीर मार्गे संघावरील बंदी सरकारला मागे घ्यायला लावली. तरीही भविष्यात कॉंग्रेस आणि आपल्यातील दरी रूंदावतच जाणार हे संघाच्या वरिष्ठ वर्तुळाला पूर्णपणे उमजले होते.

 नेहरूंच्याच मंत्रीमंडळातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेही कॉंग्रेसच्या व सरकारच्या राजकीय भूमिकांवरून नेहरूंशी असलेले मतभेद विकोपाला गेले होते. अखेर त्यांच्यात व गोळवलकर गुरूजींमध्ये चर्चा होऊन १९५१ साली भारतीय जनसंघ या नावाने एका हिंदुत्वावादी राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. डॉ. मुखर्जी हे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. संघाने पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, नानाजी देशमुख, बलराज मधोक आदी प्रतिभावंत कार्यकर्त्यांची एक फळीच डॉ. मुखर्जींच्या दिमतीला दिली होती. संघाचे राष्ट्रव्यापी कार्यजाल, कॉंग्रेसच्या वाढत्या अल्पसंख्यांक अनुनयामुळे भ्यायलेला हिंदू समाज आणि मुखर्जी, उपाध्याय, वाजपेयी यांच्यासारख्या राष्ट्रीय विचारसरणीच्या आणि शालीन नेत्यांच्या बळावर भारतीय जनसंघाच्या समर्थनात वाढ होऊ लागली. पुढे १९७४ साली इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी काळात जनसंघ, रा. स्व. संघ यांसह डावे, समाजवादी असे अनेक राजकीय प्रवाह जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली  एकत्र येऊन या सर्वांनी १९७७ साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीत इंदिरा गांधींचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर या सर्वच जनता सरकार आले. कॉंग्रेसच्या दमनशाहीचा धसका घेतलेले व सुदृढ लोकशाहीचे स्वप्न पाहिलेले अनेक पक्ष यानिमित्ताने स्वतःचे अस्तित्व विसरून एकत्र होऊ पाहात असले तरी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्यावरून डाव्या गटांनी जनसंघीय नेत्यांना लक्ष्य केल्यामुळे दुखावून हे नेते जनता पक्षातून बाहेर पडले व त्यांनी वाजपेयी, आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. येथवरचा इतिहास नीट समजून घेतला तर एक बाब स्पष्ट होते की, कॉंग्रेसचे  आत्मकेंद्रित राजकारणच भाजपाच्या अस्तित्वाला कारणीभूत ठरले आहे

 मग संघ भाजपात हस्तक्षेप करतो का, हे ठरविताना दोन गृहीतकांवर विचार करावा लागतो. संघाला भाजपाआडून काही राजकीय आकांक्षा पूर्ण करायची आहे. त्यासाठीच भाजपात हस्तक्षेप केला जातो. अथवा कॉंग्रेस आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारणाचे पुरस्कर्ते असलेल्यांनीच संघाला भाजपात हस्तक्षेप करण्यास बाध्य केले आहे.

            पहिल्या शक्यतेचा विचार करायचा झालाच तर संघाला आपली राजकीय आकांक्षा पूर्ण करायची असल्यास संघाला भाजपाचा आसरा घेण्याची गरज दिसत नाही. स्थापनेला ३ दशके उलटून गेल्यावरही भाजपाचे प्रभावी राजकीय अस्तित्व पूर्वोत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात दिसत नाही. याउलट संघाचे या भागातील कार्य अधिक खोलवर रूजले आहे. संघाने राजकीय क्षेत्रात उडी घेतल्यास देशाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रातील प्रस्थापित राजकीय समीकरणे बिघडविणे त्यांना शक्य व्हावे. शिवाय संघ नामक संघटनेची कार्यरचना बारकाईने पाहिली तर भाजपाशिवाय अनेक राष्ट्रव्यापी संघटना संघपरिवारात आपले वजन राखून आहेत. यातील किती जणांचा लाभ थेटपणे भाजपाला मिळतो, हा देखील संशोधनाचा विषय ठरावा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ या संघटनांच्या एखाद्या विषयावरील भूमिका आणि भाजपाचे किंवा भाजपाशासित राज्याचे त्याच विषयासंबंधीचे धोरण यात प्रचंड विरोधाभास असतो. संघ देशातील जातीप्रथेचा विरोधक आहे. तर भाजपामध्ये दलित, महिला, अल्पसंख्य यांच्यासाठी विशेष पदांची निर्मिती केली आहे. एकूणच काय तर संघ भाजपामध्ये थेट हस्तक्षेप करीत असताच तर इतके उघड विरोधाभास तरी दिसले नसते. मग प्रश्न उरतो की, तरी संघाचा ओढा भाजपाकडेच का? कॉंग्रेस किंवा इतर पक्षांना संघ पाठिंबा देईल का? संघाचेच पूर्वाश्रमीचे अनेक कार्यकर्ते भाजपात सक्रिय झाल्यामुळे संघ स्वयंसेवकांचा नैसर्गिक ओढा या पक्षाकडे असतो. तसेच संघ आणि भाजपाच्या बहुतांश भूमिका समान असल्यामुळेही या कार्यकर्त्यांना भाजपा जवळचा वाटतो. संवाद प्रक्रियेबद्दल बोलायचेच झाले तर संघाच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यात वा त्यांचा सल्ला घेण्यात भाजपा नेत्यांना कमीपणा वाटत नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रकाश करात, मुलायमसिंह यादव, मायावती, नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आदी नेत्यांना संघानी दिलेला सल्ला सोडाच, परंतु त्यांनी केलेली सूचना तरी झेपेल काय?  
           
दुसऱ्या शक्यतेचा विचार करण्यापूर्वी नुकतीच घडून गेलेली काही उदाहरणे आठवतात. जगप्रसिद्ध पेंग्विन प्रकाशनातर्फे अमेरिकन लेखिका वेंडी डोनिंजर यांचे द हिंदूज : ऍन अल्टरनेटीव्ह हिस्ट्री या प्रकाशित झालेल्या विवादास्पद पुस्तकावर बंदी घालण्याबाबतची एक याचिका दिल्लीच्या न्यायालयात दाखल झाली. याचिकाकर्ते असलेल्या शिक्षा बचाव समितीने न्यायालयात या पुस्तकातून विपर्यस्त व विकृत लेखन झाल्याचा दावा केला होता. यावर भारतातील अनेक उदारमतवादी व बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवून शिक्षा वचाव समिती प्रतिगामी असल्याचा दावा केला. यातील विसंगती अशी की, या सर्व घटनाक्रमात शिक्षा बचाव समितीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याऐवजी कायदेशीर लढाई लढणे पसंत केले होते. पेंग्विन सारख्या तगड्या प्रकाशन संस्थेला तर जागतिक दर्जाचे कायदेतज्ज्ञ या प्रकरणी उतरवून आपली बाजू जगासमोर उजळपणे मांडण्याची संधी होती. निदान सच्च्या व आपल्या विचारांवर दृढ असणार्या कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने हेच केले असते. मात्र या प्रकाशन संस्थेने ते वादग्रस्त पुस्तक बाजारातून मागे घेतले. या प्रकरणी डोनिंजर यांनी तर थेट भारतीय न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांचा प्रतिवाद सरकार किंवा सनातन्यांनी बिलकूल केलेला नाही किंवा त्यांना आवश्यक ती मदत सुद्धा पुरविली नाही. गंमत म्हणजे डोनिंजर यांच्यासाठी नक्राश्रू ढाळणारे तस्लिमा नसरीन यांच्यावरील अन्यायाबाबत तोंडही उघडत नाहीत.
           
दुसरे उदाहरण नरेंद्र मोदी यांचे घेऊ. भाजपाने त्यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केल्यावर कथित धर्मनिरपेक्ष मंडळी गोध्रा दंगलीवर सतत भाष्य करून, मोदींना व पर्यायाने भाजपा आणि संघाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करतात. पण गेली सुमारे १० वर्षे कॉंग्रेसप्रणित संपुआच्या सरकारने या विषयात कोणतीही ठोस कारवाई केल्याचे स्मरत नाही. तसेच न्यायालयानेही मोंदींवर या दंगलीत त्यांचा हात असल्याचा ठपका ठेवलेला नाही. संघाचा तर या सगळ्याशी थेट संबंध सध्या तरी दिसत नाही. भाजपा व मोदी आपल्या प्रचारात हिंदूंना चिथविण्याऐवजी विकासाच्या मुद्यावर बोलत असल्याचे सकृतदर्शनी तरी दिसते. ते जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचे या काळात कोणीही सिद्ध करू शकलेले नाहीत. मग मोदींच्या विकासाच्या दाव्यांवर प्रतिहल्ले चढविण्याऐवजी हे बुद्धीजीवी व राजकीय पक्ष आपली शक्ती वाया का घालवितात? कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर आपल्या नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत संघविचारांनीच म. गांधी यांची हत्या झाल्याचे सांगून नव्या वादाला फोडणी दिली. मग याला संघ किंवा भाजपाकडून स्वाभाविक प्रतिक्रिया आली तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.
           
या सर्व घटना असोत किंवा भाजप नेत्यांच्या भूमिका आणि कृतींबाबत संघाला जाहीर जाब विचारणारे बुद्धीजीवी दुसरीकडे संघ भाजपात हस्तक्षेप करतो म्हणूनही आरोप करतात. एकूणच संघ आणि भाजप यांचे परस्पर संबंध कसे असावेत, याचे अप्रत्यक्ष दिग्दर्शन हीच मंडळी करतात.       
           
महात्मा गांधींनी कॉंग्रेस संघटनेबाबत अतिशय सखोल विचार केला होता. चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांचा पक्षाला पुरवठा व्हावा व पक्षाची वैचारिक बैठक पक्की राहावी, यासाठीच त्यांनी सेवादलाची स्थापना केली. दुर्दैवाने स्वार्थी कॉंग्रेस नेत्यांनी ही संघटना आज पूर्णतः क्षीणबल केली आहे. संघ खरे तर गांधींजींच्या या उदात्त विचारांचाच वारसा चालविताना दिसतो. आधुनिक राजकीय तज्ज्ञांनाही दबावगट ही संकल्पना मान्य आहे. तेव्हा भाजपच्या संमतीने संघाने या पक्षाच्या बाबतीत दबावगटाची भूमिका स्वीकारली तर इतरांना त्याबाबत आक्षेप का असावा?

Monday, July 1, 2013

लाच स्वीकारणारा हा ती देणाऱ्याइतकाच दोषी असतो

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे तसे फर्डे वक्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची त्यांना पुरेशी जाणीव आहे आणि या आपल्या क्षमतेचा त्यांनी राजकारणात वेळोवेळी उपयोग सुद्धा केला आहे. त्यामुळे ते कोणतेही विधान ‘चुकून’ करतील यावर भाबड्या बालकाचा सुद्धा विश्वास बसणार नाही. पण म्हणून त्यांनी निवडणूक खर्चाबद्दल केलेले वक्तव्य राजकीय अर्थानेच घेतले पाहिजे, असे मुळीच नाही. पण या निमित्ताने त्यावर सांगोपांग चर्चा करून हे सगळे कसे आणि का घडते त्याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे.

            केंद्रिय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था असून, देशातील सर्व संविधानिक निवडणुकांचे संचालन याच संस्थेमार्फत केले जाते. निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी स्वतंत्र आचारसंहिता तयार केलेली असते. यात प्रामुख्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांवर अनेक बंधने घातलेली असतात. बहुतेकदा ही बंधने नैतिकतेला धरून असली तरी ती इतकी पराकोटीची आदर्श असतात की, त्याचे शब्दश: पालन करणे कोणत्याच राजकीय पक्षाला अगर त्यांच्या उमेदवारांना शक्य होत नाही. अशाच एका त्रुटीकडे मुंडे यांनी सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; जो त्यांना बराच भोवण्याची चिन्हे आहेत. 



            विधानसभा व लोकसभेची निवडणूक लढविताना प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला स्वत:चा जोरकस प्रचार करणे भाग असते. ही प्रचार यंत्रणा राबविताना होणाऱ्या पाण्यासारख्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या स्तुत्य उद्देशाने निवडणूक आयोगाने अशा खर्चावर बंधने घातली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी कमाल मर्यादा २० लाख रुपये तर लोकसभा निवडणुकीसाठी कमाल मर्यादा ४० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा खर्च सुद्धा कसा करायचा, यासाठी देखील निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडून रीतसर प्रतिज्ञापत्राद्वारे या खर्चाचा हिशोब मागविला जातो.

            सगळेच उमेदवार या मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त खर्च करत असल्याचे उघड गुपित सर्वसामान्य जनतेला देखील माहिती असते. तरीही मुंडेंच्या सदर वक्तव्यानंतर इतर  राजकीय पक्षांचे नेते सरसावून नैतिकतेवर चर्चा करत आहेत, याहून मोठा विरोधाभास कोणता असेल?

            २००९ साली मध्यावधी आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ६ महिन्यांच्या फरकाने पार पडल्या. तज्ञांच्या अंदाजानुसार या दोन्ही निवडणूक काळात सर्व पक्षांच्या उमेदवारांनी मिळून किमान ३ हजार कोटी रुपयांची उधळण केली असावी. हा आकडा विचारात घेतला तर आपल्या राज्यातल्या काही महापालिकांच्या अर्थसंकल्पाची बेरीज त्यासमोर फिकी पडते. हा पैसा नेमका कोठे जातो, असा प्रश्न वाचकांना पडेल. त्याचे काही तपशील येथे नमूद केले पाहिजेत.

१.      उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या, सभा यांचे आयोजन
२.      भित्तीचित्रे, मोठ्या आकाराचे फ्लेक्स आदी प्रचारसाहित्य
३.      प्रसारमाध्यमांना देणग्या (लाच)
४.      कार्यकर्त्यांना भत्ता व इतर सुविधा
५.      मतदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटवस्तू अथवा आर्थिक मदत
६.      निवडणूक कार्यालय, गाड्यांचा ताफा इ. खर्च
७.      पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान करावी लागणारी त्यांची सरबराई
८.      पक्षनिधी

वर नमूद केलेले खर्च वगळता निवडणुकीपूर्वी किमान ३ वर्ष सगळेच संभाव्य उमेदवार आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळावे म्हणून, अशाच प्रकारचा खर्च करत असतात. या खर्चाचे आकडे सुद्धा इतके अगडबंब असतात की त्याचा अंदाज व्यक्त करणे सुद्धा कठीण आहे. हा पैसा प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिक, अवैध धंदे करणारे आणि सरकारी कंत्राटे पदरात पाडू इच्छिणाऱ्या मंडळींकडून उभा रहातो. या पैशांच्या बदल्यात तो उमेदवार या मंडळींची कामे शासकीय चौकटीत बसवून देत असतो. शासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराची सुरुवात होते ती येथूनच !!

खरा प्रश्न असा आहे की, एखादी निवडणूक लढविण्यासाठी (जिंकण्याची गणिते आणखी वेगळी असतात.) एवढा प्रचंड पैसा का ओतावा लागतो? हा पैसा खर्च केला नाही तर निवडणूक जिंकताच येणार नाही का? दुर्दैवाने आजचे बहुतेक राजकीय नेते, अभ्यासक आणि सामान्य जनता सुद्धा याचे उत्तर नकारार्थीच देईल. २००९ साली एक वार्ताहर या नात्याने मला निवडणूक प्रक्रियेची ही काळी बाजू खूप जवळून पाहावयास मिळाली. माझी काही निरीक्षणे पुढीलप्रमाणे.

१.      सध्याच्या राजकीय नेत्यांमधील हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेही नेते आपल्या चारित्र्य आणि  कार्याच्या जोरावर जनतेतून निवडून येऊ शकणारे नाहीत. लालबहाद्दूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी यांच्यासारखे नेते आता नामशेष झाले आहेत. 


२.      बहुतांश नेते राजकारणाला समाजसेवेचे साधन नव्हे तर एक पूर्णवेळ व अतिशय नफा देणारा व्यवसाय समजतात. अर्थातच ते त्यांच्या व्यवसायातील गुंतवणूक म्हणूनच निवडणूक निधीकडे बघतात.
३.      राजकीय कार्यकर्ता हा तर त्यांच्या नेत्यांपेक्षा वरचढ आहे. पूर्वीच्या कॉंग्रेस, जनसंघ, कम्युनिस्ट पक्षांचे नि:स्वार्थी कार्यकर्ते आता केवळ वस्तुसंग्रहालयात सापडावेत.
४.      समाजातील बुद्धीजीवी वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्ग निवडणूक प्रक्रियेबद्दल कमालीचा उदासीन असतो. वर त्याला तात्त्विक मुलामा देऊन हा वर्ग मतदान करण्याच्या दिवशी सहलींना जातो.
५.      तर देशातील बहुसंख्य मध्यमवर्गीय समाजाला विकासाभिमुख राजकारणाऐवजी भावनेला हात घालणारे विषय अधिक प्रिय असतात. त्यामुळे त्यांना आपल्या प्रभावाखाली आणण्याची धडपड सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने करत असतात.  
६.      निवडणूक काळात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि गल्लीतले गुंड हे एकाच पातळीवर उतरून सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांना वेठीस धरतात. निवडणुकीत उपयोगात येणारा काळा पैसा प्रामुख्याने हे दोन गटच वापरत असतात, हे विधान बिलकुल अतिशयोक्तीचे ठरू नये.
७.      क्रयशक्ती नसलेला (अतिशय गरीब) वर्ग हाच या उमेदवारांचा खरा मतदाता असतो. याच्या जोरावरच निवडणुकीची गणिते केली जात असल्यामुळे याला खूश ठेवणे अगत्याचे ठरते. हा वर्ग सुद्धा प्रसंगी इतका लाचार होतो की, स्थायी सुविधांपेक्षा त्याला दारूची बाटली आणि बिर्याणीचा घमघमाट जास्त सुखावतो.
८.      वर नमूद केले पांढरपेशे व्यावसायिक या प्रक्रियेतील पडद्यामागचे खरे सूत्रधार असतात. कोणता उमेदवार आपल्याला अधिक लाभ देईल, हे ओळखून व्यापारीच त्या उमेदवाराच्या नावे असा निधी वापरत असतात. 


एकूणच निवडणूक निधीतील लपवाछपवी हा केवळ राजकारण्यांचा गुन्हा नसून, या पापात आपण सगळेच कमी-अधिक प्रमाणात सामील आहोत. जोपर्यत समाज चारित्र्यसंपन्न होणार नाही, तोपर्यंत असे अपप्रकार घडतच राहणार. केवळ काही नियम या भस्मासुराला वेस घालू शकत नाहीत. तेव्हा आपण सगळ्यांनीच आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सुशासनाचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेण्यासाठी झटलो, तर रामराज्य फारसे दूर नाही !!!

Saturday, August 11, 2012

या अल्ला.. कर मदद !!!

आज आमची मुंबापुरी धन्य धन्य झाली. आमची तर शत जन्माची पुण्याई फळली. म्हणूनच हे वृत्त लिहिण्याचा योग आम्हास अनुभवता आला. 

आमच्या शहराच्या दक्षिणेस आझाद मैदान नामक तीर्थस्थान आहे. कोणे एके काळी जेव्हा आपला देश नेहरू-गांधींच्या ताब्यात नव्हता... तर ब्रिटीश नावाच्या पाकिस्तानची राजकीय गणिते जमवणाऱ्या महानुभावांच्या झेंड्याखाली होता.. तेव्हा इकडे स्वत:ला स्वातंत्र्यप्रेमी का कायसे म्हणवणारे मूढ लोक त्यांना विरोध करण्यासाठी जमायचे म्हणे.

आता या भाकडकथा इतिहासाच्या पुस्तकातील एका कधीही न उघडलेल्या पानात लपलेल्या असतात. पण हा अपवाद वगळता येथे अनेक चांगली कृत्ये सुद्धा होतातच की !!

तर अशाच एका यज्ञाचे आयोजन या पवित्र तीर्थक्षेत्री करण्यात आले होते. मुंबई आणि आसपासच्या इलाक्यामधील सुमारे ५० हजार तीर्थंकर या निमित्ताने आझाद मैदानावर आले होते. विश्वबंधुत्वाचे (सभी मुस्लीम भाई-भाई) सूत्र न समजलेल्या सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी रझा अकादमीच्या आयोजकांनी हा यज्ञ योजला होता.

बराच खल करून शेवटी असे ठरले की, साध्वी प्रज्ञासिंह नामक आसुरी महिलेला तुरुंगात डांबणारे आणि अजमल कसाब नामक फकिराला रोज बिर्याणीचा प्रसाद दाखवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा या यज्ञात सक्रिय सामील होऊ द्यायचे. आता यज्ञ म्हटला म्हणजे आहुती आलीच. तेव्हा पोलिसांनी आपल्या काही गाड्या आणि मुंबई महापालिकेने आपल्या काही बस या यज्ञात आहुती म्हणून अर्पण करून थोडेसे पुण्य संपादले.      

पुढे प्रसाद वाटपाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला तेव्हा एकच झुंबड उडाली. पण अंदाजे ३६ पोलिसांनी आणि ३ पत्रकारांनी अश्म रूपी प्रसादाचा लाभ घेतल्याचे कळले. 


कोणत्याही यज्ञ समारंभात कीर्तन-प्रवचन हवेच. येथेही त्यासाठी अनेक विद्वान महर्षी सादर आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सुद्धा "इस्लाम खतरे में", अशी हाळी देत आसाममध्ये सुरू असलेल्या धर्मयुद्धात शहीद झालेल्या वीरांच्या कहाण्या श्रोत्यांना ऐकवल्या. इतकेच नव्हे तर जगातील एकमेव ‘पाक’ राष्ट्राचे ध्वज येथे मोठ्या अभिमानाने मिरवत काफरांचे प्रमुख वसतीस्थान असलेल्या भारताची त्यांनी यथेच्छ निंदा करून बराच पुण्यसंचय केला. हे कीर्तन इतके रंगले की, येथे उपस्थित असलेल्या २ पीरांनी जागीच समाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील काही नास्तिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. अखेर पैगंबरांनी यातील एका पीराला खास आपला दूत पाठवून मोठ्या मिरवणुकीने जन्नतमधे प्रवेश दिल्याचे सूत्रांकडून समजते.



विशेष म्हणजे हा एवढा मोठा यज्ञ आयोजित करण्यात आल्याचे अनेकांना माहीतच नव्हते. याचा निषेध म्हणून नेहमीच नि:पक्ष आणि निर्भीड वार्तांकन करून संघ-बजरंग दलाचे कथित कारनामे लोकांसमोर आणणाऱ्या प्रसारमाध्यमांना यावेळी मोठ्या खेदाने लक्ष्य करावे लागले. पण त्या निमित्ताने आयोजकांना आपल्या बांग्लादेशी नामक सुहृदांना न्याय दिल्याचे मोठे समाधान लाभले.    

अहो.. आज आपला देश रडत-खडत का असेना; पण जगाच्या राजकारणात अतिशय महत्वाची (या वाक्यावर  मला उगाच ठसका लागला) भूमिका बजावत आहे. मात्र याच देशाच्या सुदूर पूर्वेकडे असलेल्या आसाम नामक राज्यात मोठ्या मुश्किलीने सीमा पार करून दाखल झालेल्या काही शरणार्थींना खुलेआम ठार मारण्यात येते. पण कोणाचेच तिकडे लक्ष जात नाही. सगळे वेडे त्या बोडो नामक जंगली जमातीसाठी गळे काढत असताना या विषयाकडे कोणाचे लक्ष जाणार?

पण नाही. ज्यांचा राम नसतो.. त्यांचा अल्ला असतो !! अल्लाच्या बंद्यांनी आझाद मैदानावर नेमके हेच सिद्ध  केले. पूर्वी पाकिस्तानच्या टाचेखाली चिरडलेल्या आणि आता स्वकीयांच्याच अत्याचारांना कंटाळलेले काही शरणार्थी बांगलादेश नामक नरकातून भारतात दाखल होतात. त्यांना रोजीरोटी आणि निवारा देण्याचे सोडून त्यांच्या नावाने गळे काढणारेच या देशात जास्त आहेत.

निष्पाप असे हे बांगलादेशी भारतीय चलनात थोड्याशा स्वनिर्मित चलनाचा पुरवठा करून अर्थव्यवस्थेला मजबूत करणे, युवा पिढीला अखंड दिवास्वप्ने दाखवणारी अंमली औषधे गरजूंना पुरविणे, या देशात क्रांतीकार्य करू पाहणाऱ्या नक्षलवादी आणि इतर अतिरेकी संघटनांना शस्र पुरवठा करणे आदी अनेक सत्कृत्ये करतात. भारताच्या विकासात एवढे अमूल्य योगदान देणाऱ्या या मंडळींचा पाहुणचार करणे राहिले बाजूलाच.. पण अडाणी बोडो त्यांना ठार मारत असताना मूकपणे पाहणे हे सरकारला विशेषत: महाराणी सोनिया आणि युवराज राहुल यांच्या सरकारला शोभते काय?

नेमक्या याच मुद्याचे गांभीर्य सरकारला जाणवत नव्हते. पण आजच्या या यज्ञामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मानवतावादी चळवळ पुढे जाणार आहे. गेले कित्येक दिवस मौनात असलेल्या कुमार केतकर, तिस्ता सेटलवाड, मेधा पाटकर, राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, शरद पवार, मुलायमसिंह यादव आदी मानवतावादी ऋषीजनांना जणू संजीवनी मिळणार आहे. हे एवढे पवित्र कार्य आम्हा पामर मुंबईकरांच्या दारी झाले, यातच आपण आनंद नाही का मानणार???     

 

Saturday, December 11, 2010

देशद्रोही आझमी


समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य अबू आझमी यांनी सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बेलगाम वक्तव्ये करून, आपल्या उद्दामपणाचे प्रदर्शन घडविले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आझमींच्या बिनबुडाच्या आरोपांचा समाचार प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा सहित शिवसेना आणि मनसेने देखील घेतला. इतकेच नव्हे तर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी सुद्धा आझमींना कानपिचक्या दिल्या.

आझमींची बेजबाबदार वक्तव्ये करण्याची खोड जुनीच आहे. परंतु समाजवादी पार्टीच्या एककलमी अजेंड्याप्रमाणे त्यांच्या आरोपांचा मुख्य रोख नेहमीच हिंदुत्ववादी संघटनांवर आणि प्रामुख्याने संघावर असतो; आणि अशा माकडाच्या हाती एखादे कोलीत मिळालेच तर मग विचारायलाच नको..!!

सध्या जगभर विकीलीक्स या संकेतस्थळाचे कारनामे गाजत आहेत. अमेरिकेच्या स्वार्थी आणि क्रूर परराष्ट्र धोरणांचा पर्दाफाश करणारी कागदपत्रे उघड करून, विकीलीक्सने जगभर खळबळ माजवली आहे. अमेरिका तर या धडाक्याने सुन्न झाली आहे. विकीलीक्सने आत्तापर्यंत उघड केलेल्या कागदपत्रांचा रोख प्रामुख्याने अमेरिकेच्या मध्य-पूर्व आशियातील राजकारणाकडे आहे. ओघाने पाकिस्तान, भारत, इंग्लंड आदी देशांचा जरी यात उल्लेख आलेला असला तरी या संदर्भातील महत्वाची आणि अधिक खळबळजनक कागदपत्रे विकीलीक्सने अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहेत. याच कागदपत्रात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या आजघडीच्या जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली अशासकीय संघटनेचा उल्लेख असून, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने संघ आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनेची तुलना केली असल्याचा जावईशोध पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी लावला. हे आरोप जरी बाष्कळ असले तरी एका अर्थाने 'भारतीय राष्ट्रवादा'ची थट्टा पाकिस्तानी माध्यमांनी केली होती. भारतीय परराष्ट्र खात्याने किमानपक्षी भारतीय प्रसारमाध्यमांनी तरी याची दखल घेऊन, पाकिस्तानी कांगावे हाणून पाडणे गरजेचे होते. पण सत्ताधारी काँग्रेस आणि त्यांची बटीक असलेली बहुतांश भारतीय प्रसारमाध्यमे यांनी याबाबत अळीमिळी गुपचिळी असे धोरण स्वीकारले. तथापि ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी मात्र पाकिस्तानी माध्यमांचा खोटारडेपणा उघड करताना, जगातील महत्वाच्या देशांचे संघाबाबत असले कुठलेही गैरसमज नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र अबू आझमींसारख्या विखारी राजकारण्याला हे आयतेच कोलीत मिळाले. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि तेही संघाची कर्मभूमी असलेल्या नागपुरातचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना आझमींना गरळ ओकायला संधी मिळाली. अबू आझमी यांच्या विधानसभेतील आत्तापर्यंतच्या भाषणांचा आढावा घेतला तर त्यांनी सभागृहाचा बहुतांश वेळ असे निराधार विषय घेऊन चर्चा करण्यातच घालविला आहे. ते ज्या 'भिवंडी' मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तेथील जनतेच्या समस्या आझमींनी अभावानेच मांडल्या आहेत. २००९ साली विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनात अबू आझमी यांनी मुद्दाम उर्दू भाषेत शपथ घेऊन, अकारण वादाला तोंड फोडले. त्यानंतर मनसे आणि आझमी यांच्यातील विस्तव जात नसल्याचे चित्र आहे.

इशरत जहां या कॉलेजवयीन 'सुसाईड बॉम्बर'चे (आत्मघातकी अतिरेकी) गुजरात पोलिसांनी केलेले एन्काऊंटर आझमींनी असेच वादग्रस्त ठरविले. इशरत 'निष्पाप' असल्याचे प्रमाणपत्र देऊन, आझमी यांनी तिच्या कुटुंबियांसमवेत नक्राश्रू ढाळून, गुजरातचे मुख्यमंत्री मोदींवर अश्लाघ्य टीका केली. इतकेच नव्हे इशरतच्या कुटुंबियांना आझमींनी सुमारे एक लाख रुपयांची मदत केली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने 'डेव्हिड हेडली' या पाकिस्तानी गुप्तचरास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. नंतर भारताच्या विशेष तपास पथकासमोर दिलेल्या कबुलीजबाबात हेडलीने इशरत जहां ही पाकपुरस्कृत दहशतवादी असल्याचे स्पष्ट केले.

योगायोगाने हेडलीने दिलेली ही महत्वाची कबुली विधानभवनाच्या २०१० सालच्या पावसाळी अधिवेशनाआधी काही दिवस प्रसिद्ध झाली. संकेताप्रमाणे प्रत्येक अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांची पत्रकार परिषद होत असते. या परिषदेत सर्व पक्ष आपली संसदीय रणनीती आणि अधिवेशनातील आपापले अजेंडे स्पष्ट करत असतात. अबू आझमींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस मी स्वत: उपस्थित होतो. त्यावेळी मनसे आमदारांचे निलंबन काँग्रेस मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा असल्यामुळे त्या आमदारांच्या निलंबनास कारण ठरलेले अबू आझमी यांना पत्रकारांनी त्याचसंदर्भात प्रश्न विचारणे पसंत केले. तर आझमींनी उर्दू भाषा, मुस्लीम समाजाच्या विकासासाठी सरकारने अधिक निधी द्यावा, अशाच मागण्या करण्यात मश्गुल होते. अखेरीस मी इशरत जहां प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तिच्याबद्दल आपल्याला अजुनही सहानुभूती वाटत असून, ती निरपराध असल्याची “री” आझमींनी ओढली. मात्र मग निर्वासित काश्मिरी पंडित, भिवंडी पोलीस ठाण्यात क्रूरपणे हत्या झालेले पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल प्रश्न विचारताच अडचणीत आलेले आझमी पत्रकार परिषसंपल्याचे जाहीर करून उठले. या सर्व घटना आणि आझमींनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांची सांगड कशी घालायची..??

खरे तर समाजवादी पार्टीचे सर्व दिग्गज नेते आझमींसारखेच खोटारडे आहेत. यांना देशाच्या विकासाची जराही चाड नाही. ज्या मुस्लीम समाजाच्या नावावर हे राजकारण करतात, त्या समाजाला विकासापासून जाणून-बुजून वंचित ठेवतात. तथापि यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवलेली परिपक्वता पाहता सपा सारख्या पक्षांचे भवितव्य काय असेल याचा अंदाज लावता येतो. खरे तर अशाच पक्षावर बंदी आणण्याची प्रकर्षाने गरज आहे. जर नियमांचे कारण पुढे करून निवडणूक आयोग तशी कारवाई करणार नसेल तर जनतेनेचं या नेत्यांना आपली जागा दाखवली पाहिजे.

Sunday, November 28, 2010

सज्जन राजा - भोळी प्रजा


२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जे.पी.सी.) नेमण्याच्या मागणीवरून भाजपा सहित सर्व विरोधी पक्षांनी गेले सुमारे दोन आठवडे संसदेचे कामकाज रोखून धरले आहे. तर सध्या एकापाठोपाठ एक प्रकरणे अंगावर शेकल्यामुळे काँग्रेसची अवस्था मात्र "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली आहे. केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारची खरी गोची जे.पी.सी.ची मागणी मान्य करण्यामुळे होणार आहे, असे वरकरणी तरी दिसत नाही. तथापि सध्या हे प्रकरण शक्यतो केवळ ए.राजांपर्यंतच ठेवून काँग्रेसला आपली कातडी वाचवायची असल्यामुळेच, काँग्रेस जे.पी.सी.ची मागणी धुडकावून लावण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा संशय घेण्यास चांगलाच वाव आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी 'जनता पार्टी'चे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान थेट पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहावर शरसंधान केल्यामुळे राजकीय क्षेत्र आणि पत्रकारिता जगतात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.

'हुजुरेगिरी' या (अव)गुणाला काँग्रेसच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. किंबहुना या पक्षात तुमची प्रगती साधायची असल्यास हुजुरेगिरीशिवाय पर्याय नसतो, असा दृढ समज आहे. अर्थात या लांगुलचालनासाठी काही निश्चित असे नियम सुद्धा असतात. त्यातील सर्वात प्राथमिक आणि त्रिकालाबाधित नियम "नेहरू - गांधी घराण्याच्या विरोधात जायचे नाही", असा आहे. त्यानंतर मग सत्तेच्या सारीपाटावरील उतरत्या क्रमानुसार सर्व माननीय-सन्माननीय नेत्यांचा 'आदर' केला जातो. २००४ साली भाजपा प्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चा पराभव करून सत्तेत आलेल्या काँग्रेस प्रणित 'संयुक्त पुरोगामी आघाडी' सरकारचे नेतृत्व काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीच करणार हे जवळपास निश्चित होते. परंतु माशी कोठे शिंकली न कळे; पण सोनिया गांधींचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अधुरेच राहिले. अर्थात त्यांनी आपल्या 'अंतर्मनाच्या आवाजाचे' कारण पुढे करीत डॉ. मनमोहन सिंहांना या पदावर बसविले.

डॉ. मनमोहन सिंह हे देशातील ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून तसेच नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. त्यांच्या राजकीय धोरणांवर यापूर्वीही वाद झाले असले तरी व्यक्तिश: त्यांच्याबद्दल विरोधी पक्षांनीही आदरच व्यक्त केला होता. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण आडवाणी यांनी मनमोहन सिंहांवर जोरदार टीकास्त्र सोडले. डॉ. सिंह हे भारताच्या इतिहासातील अत्यंत कमजोर पंतप्रधान आहेत, अशी टीका आडवाणींनी केल्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. या आरोपांमुळे डॉ. सिंह देखील डिवचले जाऊन त्यांनी अतिशय आक्रमकपणे हे आरोप फेटाळले. परंतु गेल्या २ महिन्यातील राजकीय उलथापालथी पहाता आडवाणी काय चूक बोलले? असा प्रश्न पडतो.

घटनात्मक दृष्ट्या पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. किंबहुना इतर मंत्री हे पंतप्रधानांच्या नावेच आपल्या खात्याचा कारभार पहात असतात. याचाच अर्थ प्रत्येक मंत्र्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला आणि या निर्णयाच्या परिणामाला पंतप्रधान सुद्धा संबधित मंत्र्याइतकाच जबाबदार असतो. अर्थातच २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळा, काश्मीर प्रश्न अगर नक्षलवादी समस्या हाताळताना केंद्रीय गृहमंत्रालयाला आलेले दारुण अपयश किंवा जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडणारे भाव याची अंतिम जबाबदारी ही पंतप्रधानाचीच असते. पण सध्या सोनिया गांधींपासून ते प्रणब मुखर्जींपर्यंत सर्वच काँग्रेसी नेते डॉ. मनमोहन सिंहांना 'क्लीन चिट' देण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. या कार्यात त्यांच्या दिमतीला देशातील नामांकित परंतु विकाऊ प्रसारमाध्यमांची फौज कार्यरत आहेच.

२०१० सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार असल्याचे किमान ५ वर्षे आधीच निश्चित झाले होते. त्यावेळी केंद्रात भाजपाचे शासन सत्तारूढ होते. त्यानंतर लगोलग निवडणुका होऊन काँग्रेस सरकार सत्तेत आले. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी हे काँग्रेसचेच वजनदार नेते होते. राष्ट्रकुल स्पर्धांचे मुख्य यजमानपद असणाऱ्या दिल्ली राज्यात देखील शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसी सरकारच विराजमान होते. तरीही स्पर्धा अगदी तोंडावर येईपर्यंत, तिच्या ढिसाळ तयारीची दखल कोणीच घेतली नाही. अखेर परदेशी प्रसारमाध्यमांनी या संदर्भात बोंब ठोकल्यावर भारत सरकार आणि 'देशी' माध्यमांना जाग आली. आणि त्यानंतर 'ब्लेम गेम' ची सुरुवात झाली. यावेळी सुद्धा डॉ. मनमोहन सिंहांना विरोधक आणि सामान्य जनतेच्या रोषास तोंड द्यावे लागले. अखेरच्या क्षणी त्यांनी हस्तक्षेप करून स्पर्धा निभावून नेल्या असेच म्हणावे लागेल. स्पर्धेनंतर काँग्रेस पक्षाने स्पर्धेचे मुख्य आयोजक या नात्याने सुरेश कलमाडी यांना एकमुखाने दोषी ठरवून त्यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हकालपट्टी केली. पण गेली ५ वर्षे आमचे 'सज्जन' पंतप्रधान काय करीत होते? देशाचे प्रमुख या नात्याने त्यांनी या स्पर्धेच्या तयारीत वेळीच हस्तक्षेप का केला नाही? या प्रकरणी काँग्रेसने केंद्रीय क्रीडामंत्री गिल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित यांच्यावर कारवाई का केली नाही?

२ जी स्पेक्ट्रम घोटाळा घडून देखील आज ३ वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. या व्यवहारानंतर ३ जी स्पेक्ट्रमचा देखील लिलाव झालेला आहे. या प्रदीर्घ कालावधीत आंदीमुथू राजा यांची गैरकृत्ये अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांच्या लक्षात आली नसतील यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. विरोधी पक्षांनीही यावर अनेकदा वाच्यता केलेली होती. मग पंतप्रधानांनी एवढा मोठा कालावधी मौन बाळगण्याचे कारण केवळ राजकीय अपरिहार्यता एवढेच मानायचे का? तर मग भारत-अमेरिका अणु इंधन कराराप्रमाणे यावेळी देखील काँग्रेसच्या धुरंदर नेत्यांनी वेळीच राजकीय समीकरणे जुळवून राजा आणि त्यांच्या 'द्रविड मुन्नेत्र कळघम' पक्षाला त्यांची जागा का दाखवली नाही? तसेच राजांनी ३ जी स्पेक्ट्रम लिलावात सुद्धा काही 'घपला' केला नसेल यावर आता सामान्य जनतेने कसा विश्वास ठेवावा? देशाचे हजारो कोटींचे नुकसान राजांना केवळ मंत्रीपदावरून दूर केल्यामुळे भरून निघेल काय? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जनतेने काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत देऊन, स्थिर सरकार निर्मितीसाठी हातभार लावला. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी अतिउत्साहाच्या भरात अमेरिकन धर्तीवर १०० दिवसांचे 'मास्टर प्लान' सादर केले. सरकार स्थापना होऊन आज सुमारे ४०० दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे. आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरते आहे. सर्वसामान्य नागरिकाला तर जगण्यापेक्षा मरणे अधिक सुसह्य वाटते आहे. देशांतर्गत आणि परराष्ट्र प्रश्नाबाबत आमचे सरकार अजुनही चाचपडते आहे. एकीकडे देशविघातक शक्ती प्रबळ होत असतानाच सरकार संघ कार्यकर्त्यांना 'दहशतवादी' ठरविण्याचा आटापिटा करीत आहे आणि याच मूर्खांच्या नंदनवनात अरुंधती रॉय, गिलानींसारखे राष्ट्रद्रोही मात्र आमच्याच राज्यघटनेची ढाल करून, भाषणस्वातंत्र्याचा मुक्त उपभोग घेत आहेत. सरकारने यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी व्यक्तींना (पक्षाला नव्हे)न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात. या सगळ्याला जबाबदार कोण?




परंतु या सगळ्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून सध्या काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर असलेली प्रसारमाध्यमे थेट सर्वोच्च न्यायालायावर सुद्धा ताशेरे ओढत आहेत. सर्वोच्च न्यायालय राजकीय भूमिका घेते, असे बाष्कळ आरोप करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पण सर्वोच्च न्यायालयावर ही वेळ कोणी आणली? आणि या सगळ्या घोटाळ्याच्या मागे असलेले लागेबंधे उघड होत असताना सर्वोच्च न्यायालयाने नाही बोलायचे तर मग कोणी बोलायचे, हे तरी काँग्रेसने स्पष्ट करावे. खरे तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी ज्या मोजक्या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांची कंत्राटे दिली गेली त्यात युवराज राहुल गांधी यांचे काही सुहृद असल्याचे बोलले जाते. तर २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात थेट सोनिया गांधींच्या २ बहिणीच सामील असल्याचे सज्जड पुरावेच सुब्रमण्यम स्वामींनी सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवले आहेत. पण या गोष्टी जनतेसमोर आल्या तर सगळ्याच कॉंग्रेसी नेत्यांची 'गोची' होणार असल्यामुळेच संसदेचे कामकाज रोखण्यावरून भाजपावर ठपका ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. खरे तर सरकारचे प्रमुख या नात्याने सर्वपक्षीय चर्चेचे आयोजन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीच केले पाहिजे. अशावेळी त्यांच्या सज्जनपणाची आणि राजकीय मुत्सद्देगिरीची खरी कसोटी लागेल. पण सभागृह नेते अर्थमंत्री प्रणब मुखर्जी असल्यामुळे तेच अशा बैठकांचे आयोजन करतात. ही एकप्रकारची राजकीय कुचेष्टाच नव्हे काय? पण काँग्रेस नेतृत्वाला आपला पंतप्रधान 'कोणावर तरी' अवलंबून आहे, हीच प्रतिमा निर्माण करण्यात जास्त स्वारस्य आहे. त्याचमुळे डॉ. मनमोहन सिंह यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतं असावा.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून अशोक चव्हाण यांची उचलबांगडी असो किंवा रोसाय्यांना हटवून आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी रेड्डी यांची नियुक्ती असो. यातील कोणतीही नियुक्ती ही जनतेला विश्वासात घेण्यासाठी झालेली नाही. केवळ काँग्रेसचा मुखवटा टरकावून तो उघडा पडू नये, याच करिता पक्षनेतृत्व अशा प्रकारचे मामुली बदल घडवीत असते. कदाचित याच्या पुढच्या काळात डॉ. मनमोहन सिंह हे वयपरत्वे अगर व्यथित होऊन किंवा अन्य काही करण सांगून राजकीय संन्यास घेतील. त्यांच्या पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी युवराज राहुल गांधी गुढघ्याला बाशिंगे बांधून विंगेत उभे आहेतच. सहा वर्षांपूर्वी सोनिया गांधींच्या अंतर्मनाने दिलेला कौल नियती मनमोहन सिंहांच्या मदतीने साकारेल. आणि केवळ कळसूत्री बाहुले ठरलेला आमचा सज्जन राजा रामायणातील भरताप्रमाणे भोळ्या जनतेच्या मनात अढळ स्थान प्राप्त करील.