सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, February 18, 2016

सेल्फी, सेल्फिश आणि सेल्फलेस कार्य


रमेश वाळुंज हा बांद्रा किल्ल्याजवळ एका कच्च्या घरात राहणारा आपल्यासारख्याच एक तरूण होता. वाहनचालकाचे काम करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात तो आपली पत्नी आणि तीन मुलांचे उदरभरण करीत असे. शिवाय गावाला राहणाऱ्या आपल्या आईला सुद्धा तो दरमहा पैसे पाठवत होता. बँडस्टँड येथील किल्ला किंवा समुद्रातील खडकांवर उभे राहून अनेक तरूण-तरूणी स्वतःची छायाचित्रे आणि सेल्फी काढण्यात दंग असतात आणि मग तोल जाऊन किंवा मोठ्या लाटेच्या तडाख्याने ते पाण्यात पडतात. अशा सुमारे 30 जणांचे प्राण या रमेश वाळुंजने आत्तापर्यंत वाचवले होते. परवा तीन युवती किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाच्या टोकावर उभ्या राहून सेल्फी काढताना 70 फूट उंचीवरून समुद्रात कोसळल्या आणि गटांगळ्या खाऊ लागल्या. हे पाहिल्यावर रमेशने भरतीची वेळ असल्यामुळे उधाण आलेल्या समुद्रात उडी घेऊन त्यातील 2 मुलींचे प्राण वाचवले. पण तिसरीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात रमेशवरच काळाची कुऱ्हाड कोसळली. 

रमेशचा हा अपमृत्यू मनाला चटका लावणारा आहे. त्याला मी ओळखत नव्हतो. आजच्या दै. लोकसत्तामधील 'आशुतोष सावे' यांच्या पत्रातून ही सगळी माहिती समजली. रमेशच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. आपण केवळ त्याची कल्पनाच करू शकतो. एकीकडे हजारो रूपयांचे मोबाईल विकत घेऊन कवडीमोलाच्या सेल्फी काढण्यासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणारे युवक, दुसरीकडे असे युवक आपला जीव धोक्यात घालतात याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे आपल्यासारखे सेल्फिश आणि रमेश वाळुंजसारखे स्वतःच्या जीवावर उदार झालेले दीपस्तंभ आपल्यासमोर असतात.

आज राष्ट्रीय युवा दिन आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती आपण 'युवक दिवस' म्हणून साजरी करतो. दिवस / सण / उत्सव आपण वेळोवेळी साजरे करतो, मात्र त्याचे औचित्य कधीच लक्षात घेत नाही. निदान आज तरी वरीलपैकी कोणता पर्याय निवडायचा, हे ठरवून तसा संकल्प करूया !! रमेश वाळुंज यांना मन:पूर्वक श्रद्धांजली !!


- प्रणव भोंदे

No comments:

Post a Comment